दहावीच्या निकालाचा ऑनलाइन गोंधळ; चौकशी समिती गठित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१८ जुलै २०२१

दहावीच्या निकालाचा ऑनलाइन गोंधळ; चौकशी समिती गठित

शुक्रवारी 16 जुलै रोजी इयत्ता दहावी बोर्डाचा निकाल दुपारी एक वाजता जाहीर होणार होता. मात्र, संकेतस्थळावर निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे निकाल पाहण्यात विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे 5 ते 6 तासानंतर विद्यार्थ्यांना आपले निकाल संकेतस्थळावर पाहता येऊ लागले. त्यामुळे ज्या तांत्रिक त्रुटी, अडचणी काल संकेतस्थळाच्या बाबतीत समोर आल्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी शिक्षण विभागाकडून 5 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.यामध्ये शिक्षण आयुक्त हे समितीचे अध्यक्ष असतील सोबत मंत्रालयाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव, उद्योग उर्जा व कामगार विभागाचे उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे तांत्रिक सल्लागार, शिक्षण विभागाचे उपसंचालक हे या समितीमध्ये चौकशी व तपासणी करून अहवाल 15 दिवसाच्या आत सादर करणार आहेत.


नेमलेली समिती खालील बाबींची चौकशी, तपासणी करून अहवाल शासनास सादर करणार आहे.


निकालापूर्वी बोर्डाच्या अध्यक्षांनी सर्व संबंधितासोबत बैठक आयोजित केली होती का? आणि ती कशी केली होती?


निकाल घोषित करण्यासंबंधात बोर्डातील संबंधित तांत्रिक सल्लागार यांना याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती का?


संकेतस्थळाची देखभाल करणाऱ्या संबंधित कंपनीला निकाल घोषित करण्याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती का?


इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे निकाल घोषित करण्याच्या अनुषंगाने संकेतस्थळाची पूर्व तपासणी म्हणजेच ट्रायल रन करण्यात आली होती का?


निकाल घोषित करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतेच्या सर्व्हरचा वापर करण्यात आला होता का?

भविष्यात अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी उपाययोजना सूचित कराव्यात, असं सुद्धा या अहवालात ही समिती मांडणार आहे. राज्य मंडळाचे संकेतस्थळ कोलमडल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी जबाबदार संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती सूचना देणार आहे. सर्व बाबींची सखोल चौकशी, तपासणी करून समितीने आपला अहवाल पंधरा दिवसात शासनास सादर करायचा आहे.