यवतमाळच्या निखिलेश यांनी साकारले मशीन्स आणि उपकरणे | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१६ जुलै २०२१

यवतमाळच्या निखिलेश यांनी साकारले मशीन्स आणि उपकरणे |

नागपूर : देशाच्या ग्रामीण भागात अनेक संशोधक आहेत. त्यांचे संशोधन पुढे येण्यासाठी त्यांना प्रोत्साहनासह आर्थिक आणि साधने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यवतमाळचे उद्योजक निखिलेश लाखेकर यांनी सौर उर्जेवर चालणारा चरखा, पोर्टेबल व्हर्मी कंपोस्ट बेड, कमी किमतीचे कोल्ड स्टोरेज असे अनेक मशीन्स आणि उपकरणे विकसित केलेली आहेत.


ग्रामायण प्रतिष्ठान नागपूरच्या सृजनगाथा कार्यक्रमात सुमित माईणकर यांनी निखिलेश यांची मुलाखत घेतली. सौरऊर्जा चरखा याबाबत माहिती देताना निखिलेश म्हणालेत की, हात चरख्याने सूत कातताना सूत सारखे तुटते, चरख्याचा वेग कमी-जास्त होत असल्याने सूतही सारखे कातले जात नाही; जाड - बारिक निघते. सौर चरख्यात हा दोष रहात नाही. चरख्याची गती एकसारखी राहिल्याने सूत समान जाडीचे निघते. शिवाय एक माणूस तीन चरखे हाताळू शकतो त्यामुळे उत्पादन वाढते.निखिलेश यांनी लहान शेतकऱ्यांसाठी १०० किलो भाजीपाला ठेवण्याच्या क्षमतेचे शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) तयार केले आहे. यात भाजीपाला दोन-तीन दिवस ताजा राहतो. हे शीतगृह तयार करण्यासाठी सुमारे ४५ हजार रुपये खर्च येतो. शीतगृह तयार झाल्यानंतर ते चालवण्यासाठी काहीही खर्च येत नाही !


बांबूपासून अनेक वस्तू तयार होतात पण त्यांना चमक नसते आणि त्या काही दिवसात खराब होतात. यावर उपाय म्हणून निखिलेश यांनी 'बांबू आर्टिकल कोटिंग मशीन' तयार केले आहे. या मशीनने बांबूच्या वस्तूंना कोटिंग केल्यानंतर त्या चमकतात आणि कोटिंग कायम असेपर्यंत टिकतात.
उद्योग सुरू करण्यास इच्छुक युवकांना त्यांनी संदेश दिला की, उद्योग सुरू करण्याआधी किमान दोन-तीन वर्षे त्या उद्योगात काम करा. शक्यतो कमी पैशात उद्योग सुरू करा; म्हणजे उद्योग चालला नाही तरी नुकसान कमी होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. किशोरजी केळापुरे यांनी केले.