विपरीत परिस्थितीमध्ये "त्यांनी" सुरू केला यशस्वी उद्योग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ जुलै २०२१

विपरीत परिस्थितीमध्ये "त्यांनी" सुरू केला यशस्वी उद्योग


कोणताही उद्योग करण्यासाठी त्या उत्पादनाचे सखोल ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे. उद्योगामध्ये स्पर्धा ही असतेच. संयम, अथक परिश्रम, चिकाटी आणि जोखीम घेणे याला पर्याय नाही. ग्रामायण उद्यमगाथा मध्ये हिंगणघाट चे यशस्वी उद्योजक श्री निलेश लालचंद भूतडा यांनी आपले अनुभव या कार्यक्रमात सांगितले.श्री निलेश यांना उद्योगाचे बाळकडू लहानपणीच मिळाले. यांचे संपूर्ण कुटुंबच उद्योग करीत असे. लहानपणी नीळ, मसाले, तिखट अशा गोष्टी आणून त्या पॅकेट मध्ये भरून त्या घरोघरी जाऊन ते विकत असत. १६ व्या वर्षापासून डिश वॉश, हॅन्ड वॉश, उदबत्त्या, कापूर आणून ते घरोघरी विकू लागले. त्यामध्ये नफ्यापेक्षा नुकसानच जास्त होत असे. बरेचदा माल खराब असल्यामुळे विकला जात नसे. हा माल घेण्यासाठी ते अनेक कारखान्यात जात असत व तेथेही त्यांची अभ्यासू वृत्तीने कसा बनतो याकडे लक्ष देत असत. त्यानंतर त्यांनी एमगिरी वर्धा येथे काही कोर्स करून फिनाईल, कापूर, हॅंडवॉश बनविण्याचे प्रशिक्षण घेतले, व स्वतः माल बनवून विकणे सुरू केले. एम आय डीसी येथे प्लॉट घेण्यासाठी स्टेट बँकेतून सोळा लाख कर्ज उचलले. यासाठीही त्यांना बऱ्याच खेटा घालाव्या लागल्या व वाट पहावी लागली. बऱ्याच खटपटी नंतर त्यांचे कर्ज मंजूर झाले. कापूर बनविण्यासाठी पंजाब मधून एक मोठी मशीन घेतली. उदबत्ती बनविण्याचीही मशीन घेतली. 

२०११ पासून दोन्ही भावांमध्ये हिस्से वाटणी झाली. श्री निलेश यांचेवर त्यावेळी १३ लाख कर्ज होते आणि उत्पन्न काहीही नव्हते. त्यावेळी केवळ मित्रांनी मदत केली म्हणूनच त्यांनी नव्याने व्यवसाय सुरू केला, असे त्यांनी सांगितले. चांगले डिशवॉशर बनवणे शिकायला त्यांना एक वर्ष लागले. अनेक प्रयोगांनी व युट्युब वरील व्हिडिओ पाहून ते बनवायला शिकले. आज त्यांच्या डिश वॉशर ला खूप मागणी आहे. कोविड पूर्वीच्या काळात हॅन्ड वाशला अजिबात मागणी नव्हती मात्र कोविंड काळामध्ये हॅन्ड वॉश चा खूप खप झाला. त्या वेळी त्यांचे सोबत पत्नीनेही रात्र रात्र मेहनत करून त्यांनी हँडवॉश बनविले. त्यानंतर मात्र ते थांबले नाहीत. धूपबत्ती, टॉयलेट क्लीनर, ग्लास क्लीनर, तांबा पितळ साफ करण्याचे लिक्विड ,अशा अनेक गोष्टी त्यांनी बनविणे सुरू केले. उदबत्ती बनविण्यात ते व्हिएटनाम मधील सुगंध वापरतात. हा सुगंध लवकर उडत नाही, खूप दिवस टिकतो. त्यामुळे ही उदबत्ती खूप लोकप्रिय होते, असे असे ते म्हणाले. व्यवसायामध्ये कच्चामाल नेहमी आधी रोख दिल्यावरच मिळतो. मात्र विकण्यासाठी त्यांना माल कमीत कमी एक महिन्याच्या उधारीवर द्यावा लागतो अशावेळी बँकेने खरेतर सीसी लिमिट वाढवून द्यायला हवी. कर्ज हप्ते नियमित भरून सुद्धा, कर्ज घेतले वेळेपासून केवळ 4 लाख 28 हजार इतकीच सीसी लिमिट त्यांचे जवळ आहे. त्यामुळे खूप हिम्मत, धीर, संयम ठेवूनच व्यवसाय करायला हवा असे त्यांचे स्पष्ट मत आहे. व्यवसाय सुरू राहण्यासाठी नफ्याचे प्रमाण खूप ठेवता येत नाही तसेच एखाद वेळी माल खराब झाला तर वापस घेऊन नुकसान सोसण्याचीही तयारी ठेवावीच लागते. सरकारी योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे त्यांची हिम्मत खचते. आज घडीला त्यांच्या गावात पन्नास ते साठ उदबत्ती बनविण्याच्या मशिन्स घेतल्या आहे. त्यापैकी जवळपास अर्ध्या मशिन्स बंद पडल्या असून त्या विकल्याही जात नाहीत. व्यवसाय करायचा असल्यास अथक परिश्रम संयम व चिकाटी या अतिशय आवश्यक गोष्टी आहेत असे ते पुढे म्हणाले.


आज श्री निलेश यांचे जवळ सहा कर्मचारी असून ते व त्यांची पत्नी ही या व्यवसायात पूर्ण लक्ष देतात. अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी हा उद्योग सुरू केला व यशस्वी केला आहे. पुढील योजनांमध्ये त्यांनी चांगले वॉशिंग पावडर स्क्रबर आणि नवनवीन उत्पादने सुरू करण्याचे ठरविले आहे. माझ्या या अनुभवाचा फायदा मी नक्कीच हा उद्योग करू इच्छिणाऱ्यांना करून देऊ शकतो. असे ते म्हणाले. उत्कृष्ट ग्रामीण उद्योग पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत आहेत. श्री प्रशांत बुजोणे यांनी श्री निलेश भुतडा यांची मुलाखत घेतली, व प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ सुरभी धोंगडी यांनी केले.