पारंपारिक शिक्षणाला हवी आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची जोड | सुरेश वांदिले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ जुलै २०२१

पारंपारिक शिक्षणाला हवी आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची जोड | सुरेश वांदिले

पारंपारिक शिक्षणाला हवी आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची जोड : सुरेश वांदिले यांचे मार्गदर्शन नक्की वाचा  


कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेऊन सरकारला पारंपारिक शिक्षण व्यवस्थेत बदल करावे लागले. विद्यार्थी घरूनच आँनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम झाला आहे. यामुळें रोजगार निर्मिती प्रभावित झाली आहे. आज विद्यार्थी संभ्रमित आहे. संकट किती काळ चालेल याचा अंदाज नाही.परंतु पारंपरिक शिक्षण व्यवस्थेला आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची जोड दिल्यास परिस्थितीवर आपण नियंत्रण मिळवू शकतो,असे प्रतिपादन श्री सुरेश वांदिले यांनी ग्रामायण प्रतिष्ठान व्दारा आयोजित ज्ञानगाथा कार्यक्रमाचे ५० वे पुष्प गुंफतांना केले.


 श्री सुरेश वांदिले हे प्रसिद्ध पत्रकार व शिक्षण तसेच करिअर क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे म्हणून चिरपरिचित आहेत.


भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) सारख्या नामांकित संस्थांमधून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुद्धा कमी प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. अशावेळी शालेय ते पदव्युत्तर शिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षणावर भर द्यावा. पालकांनी सुद्धा यासाठी विशेष प्रयत्न करावेत. यासाठी इंग्रजी विषयाचा सखोल अभ्यास, विषयाचं सादरीकरण यासारखे मूलभूत गोष्टी आत्मसात कराव्यात. वाचन संस्कृतीचा विकास झाला पाहिजे. भविष्यात विद्यार्थ्यांना विविधांगी शिक्षणाची आवश्यकता बघून सरकारने नवीन अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. कौशल्यावर आधारित शिक्षणाचं उन्नतीकरण करावे लागेल.


कोरोनामुळे डिजिटल शिक्षण व काम यालाच महत्व आले आहे. औषधी, पुरवठा, शिक्षण, विपणन (Marketing), जाहिरात, सादरीकरण, पत्रकारिता आदी सर्वच क्षेत्रात डिजिटल व्यवस्था प्रगत होत आहे. त्यामुळे काळानुरूप त्या आत्मसात कराव्या लागतील.


प्रमुख शिक्षण संस्था, नोकरीच्या संस्था आदि सर्व ठिकाणी इंग्रजी भाषेत संभाषण, संवाद, गट चर्चा हीच प्रचलित पद्धत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचं मूलभूत ज्ञान प्राप्त करावे लागेल. त्याकरिता सर्वकष वाचन हाच आधार राहील. ज्ञान मिळवण्यासाठी यू-ट्यूब सारख्या डिजिटल माध्यमांचा सुद्धा वापर केला पाहिजे. एका निरीक्षणाप्रमाणे मागील एक वर्षात डेटा प्रणालीत ३८ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात डेटा प्रणाली वर आधारित अभ्यासक्रमाला महत्त्व आले आहे. डिजिटल प्रणाली मुळे सायबर सुरक्षितता महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे याचा अभ्यासक्रम रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा राहील.


भारत औषधी उत्पादनात एक अग्रणी देश आहे. कोरोनामुळे त्यात आणखी वाव आहे. तसेच सँनिटाईझर, हातमोजे, मास्क आदीच्या उत्पादनासाठी मागणी वाढली आहे. पर्यायाने रोजगार निर्मिती वाढली आहे.

माध्यम क्षेत्रात सुद्धा डिजिटल प्रणालीचे महत्व वाढले आहे. फेसबुक, यु-ट्यूब या माध्यमांकडे लोक आकर्षित होत आहेत. डिजिटल अध्यापन हा शिक्षणाचा अविभाज्य भाग होत आहे. त्यामळे या पद्धतीने शिकवणाऱ्या शिक्षकांना भविष्यात चांगल्या संधी आहेत.


कोरोना संकटात अडचणी असल्या तरी त्यावर मात करता येईल. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी या, ते ज्या संस्थेचे विद्यार्थी असतात, त्यावरही अवलंबून असते. त्यामुळे चांगल्या संस्थेत शिक्षण घेण्याचा बहुमोल सल्ला त्यांनी विद्यार्थी व पालकांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी परिचय श्री सौरभ वागारे यांनी केला तर आभार प्रदर्शन श्री चंद्रकांत रागीट यांनी केले.