इंदोरा ते शितलामाता चौकातील उड्डाणपूलाच्या कामाचे अधिकाऱ्यांनी पुर्नविलोकन करावे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०२ जुलै २०२१

इंदोरा ते शितलामाता चौकातील उड्डाणपूलाच्या कामाचे अधिकाऱ्यांनी पुर्नविलोकन करावेइंदोरा ते शितलामाता चौकातील उड्डाणपूलाच्या कामाचे अधिकाऱ्यांनी पुर्नविलोकन करावे

                                   -पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

            नागपूर दि.2 : इंदोरा चौक ते शितलामाता चौक दरम्यान उड्डाणपूल व रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावित आराखड्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पुनर्विलोकन करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक नरेश वडेट्टीवार, प्रकल्प संचालक एन. एल येवतकर, डागा स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका श्रीमती सीमा पारवेकर उपस्थित होत्या.

राष्ट्रीय महामार्ग 44 वरील इंदोरा ते शितलामाता चौक दरम्यान उड्डाणपूल बांधणे व रस्ता विकसीत करण्याचे काम प्रस्तावित असून त्याचे सादरीकरण आज करण्यात आले.

7.30 किलोमीटर लांबी असलेल्या या प्रकल्पातील मुख्य जंक्शन इंदोरा चौक-कमाल चौक-पाचपावली चौक-अग्रेसन चौक-अशोक चौक- रेशिमबाग चौक-सक्करदरा चौक-भांडे प्लॉट-शितलामाता चौक असा हा उड्डाणपूल  प्रस्तावित असून, त्यावरील उड्डाणपूलाची लांबी 5.065 किलोमीटर असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. या प्रकल्पाची सविस्तर माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतली.

इंदोरा चौक प्रस्तावित सबवे करतांना त्या मार्गावर असलेली फुल विक्रेत्यांचे व कमाल चौकापासून चांभारनाला या दरम्यानच्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचा ही आराखडयात समावेश करावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी पुन्हा या ठिकाणी भेट देऊन अहवाल सादर करावा. तसेच या प्रकल्पामुळे डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील जी जागा अधिग्रहीत केल्या जाणार आहे, त्यातील इमारती किंवा नेत्ररोग विभागासाठी नविन इमारत बांधण्यासाठी निधी एनएचआयने उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले.