टिकैत आड भाजपची खेळी..! | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

३१ जुलै २०२१

टिकैत आड भाजपची खेळी..! |

 टिकैत आड भाजपची खेळी..!


देश चिंतेत आहे. चितेंचे  विषय अनेक . त्यात अपेक्षाभंगही आलं.  अच्छे दिनचे स्वप्न. दोन कोटी नोकऱ्या. पाच लाख खात्यात. काहीच हाती लागलं नाही. उलट महागाईची मार. पेट्रोलची शंभरी. ठेवी व्याजात घट. मध्यमवर्गीयांचीं गळचेपी. ही सारी भाजपची ठकबाजी. त्यात कोरोनाची मार. अन् जासूसी कांड. मोदी-शहाचींही चिंता वाढली. त्याचे कारण केवळ उत्तर प्रदेश निवडणूक नाही. त्यापुढे होणारी राष्ट्रपती निवडणूकही आहे. युपीचे निकालावर ठरणार राष्ट्रपती निकालाची हारजित. उत्तर प्रदेशातील आमदारांचे मतमूल्य सर्वाधिक. वर्तमान बळात 100 आमदार घटले. तर होणार पंचाईत. त्यामुळे आतापासून विविध पक्षांना गोंजरण्यास सुरुवात झाली. एनडीएचा कुणबा घटला. अकाली दल, शिवसेना, तेलगू देशम सोबत नाही. 2022 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत बळ घटणार. ते खूप घटू नये. यासाठी खटाटोप. मोदींचा  ठाकरे, पवारांवर डोळा. त्यासाठी सुरु झाल्या गाठीभेटी. 


नो व्होट भाजप....


उत्तर प्रदेशचे निकाल ठरविणार मोदी सरकारच्या पुढच्या खेळी. 2014 ला भाजप सत्तेत आली. तेव्हा लोकांच्या  सरकारबाबत खूप अपेक्षा होत्या. त्यांच्या पदरी निराशा पडली. केवळ दहा टक्के आश्वासनांची पूर्ती. ही  देशाची वस्तूस्थिती. उत्तर प्रदेशात त्यापेक्षा वाईट स्थिती. कोरोना हाताळणीत अपयश. त्यांची प्रंचड नाराजी. योगीने मृत्यू लपविले. गंगेने त्यावर पाणी फेरले. जगात नाचक्की झाली ती वेगळीच. मोदी-योगी दोघांची गोची झाली. उरलीसुरली न्यायालयांनी जिरवली. सर्वच चव्हाट्यावर आलं. कोर्टाचा रेटा सरकारला झोडत होता. अखेर नाईलाज झाला. कोरोना लसीचे तीन भाव. कोणाला न पटणारी गोष्ट.  न्यायालयाचा नेमका त्यावर वार झाला. तेव्हा सरकारचं तोंड उघडलं. सर्वांना  कोरोना लस मोफत मिळेल. हे  सांगावे लागलं. ही घोषणाही पाच राज्यातील निवडणुकांवर डोळा ठेवून. उत्तर प्रदेश निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची. तेथूनच 'नो व्होट भाजप ' चा नारा गुंजेल. तो नारा 2024 पर्यंत तेवत राहील. त्यासाठी विरोधी पक्षांचं इंधन राहील. पश्चिम बंगाल निवडणुकीत हा प्रयोग झाला. तो शंभर टक्के यशस्वी ठरला. रणनितीकार प्रशांत किशोर यांची ती खेळी होती. ममता बॅनर्जी दिल्लीत गेल्या. पाच दिवस थांबल्या. सर्व विरोधी पक्षांना नारा दिला. नो व्होट भाजप . हिंदुत्व मागे पडलं. प्रत्येकाला पोटापाण्याची चिंता. कामधंदे बुडाले. युवकांना रोजगार नाही. होता तोही गेला. पालक हवालदिल. आरोग्य, शिक्षण बोंबलले. शेती, शेतकरी टांगणीला आहे. हे भाजपला कळले. आतापासून डावपेंच सुरु केले.


तीन पक्षांचींच दावेदारी.....


उत्तर प्रदेशात तीन पक्ष सत्तेचे दावेदार. भाजप, सपा आणि बसपा. तिघांची हक्काची व्होट बँक 20-22 टक्क्यांच्या आसपास . जिंकण्यास किमान 30 ते 32 टक्के मतं हवीत. वाईट काळातही सपा, बसपाने 20 ते 22 टक्के मते घेतली.  ब्राह्नण समाज 11 टक्के  आहे. हा समाज 60 जागांवर निर्णायक आहे. नव्वदच्या दशकापासून त्यांचा मुख्यमंत्री नाही. सत्तेतील हिस्सेदारी  घटली. राजपूत संख्येने कमी. तरी योगी मुख्यमंत्री. त्यांचा ब्राह्मणांवर कोप. हा जागृत समाज . हवा पाहून  तिवा लावण्यात पटाईत. त्यामुळे बसपा, सपा या दोन्ही पक्षांचा त्यांच्यावर डोळा. 2017 मध्ये जाट व्होट भाजपच्या पारड्यात गेली.त्याने भाजप मताची टक्केवारी 40 वर गेली. यात 10 टक्के वाटा ब्राह्मण समाजाचा. अगोदर हा समाज कॉंग्रेस सोबत होता. कॉंग्रेसची मुस्लीम व ब्राह्मण व्होट बॅक सटकली. त्याचा कॉंग्रेसला फटका बसला. चवथ्या क्रंमाकाचा पक्ष बनला. मुस्लिम मतांमुळे सपा वीस टक्क्यावर मजल मारते. मुस्लिम समाज जिकडे दम तिकडे हमवर चालते. भाजपला हरवू शकेल. त्या पक्षाच्या पारड्यात मत टाकतो. या समाजाला चलबिचल बसपापेक्षा सपा जवळचा वाटतो. सत्तेवर कब्जा हवा. तर किमान तिस टक्के मतं हवीत. त्यासाठी सर्व पक्षांचा आटापिटा आहे.


भाजपची  टिकैत खेळी......!

उत्तर प्रदेशात भाजपने राजेश टिकैत चाल सुरू केली. यामागे जाट व्होट चोरीचा डाव दिसतो. जाट,यादव, मुस्लिम एकत्र आले. तर सत्तेची चॉबी सपाच्या हाती जाण्याचा धोक.हा धोका संघ-भाजपाने  ओळखला. तेव्हापासून गोदी मीडियाचा राकेश टिकैत यांच्यावर फोकस वाढला. अलिकडे तर भाजप प्रवक्ता व टिकैत असे शो वाढले. एकटा असेन तर चर्चेला येणार हा टिकैत यांचा आग्रह असे. त्यावर पाणी सोडले. याचा अर्थ कुठे तरी पाणी मुरत आहे. आता तर किसान युनियन  पक्ष स्थापन करणार. निवडणुका लढविणार. ही भाषा सुरु झाली. ही खेळी यशस्वी झाली. तर एका दगडात तीन पक्षी मारले जातील. सपापासून जाट मतदार दुर जाईल. त्यामुळे सपाचे आव्हान संपेल. राजकारणातील प्रवेशाने किसान युनियनची झाकली मुठ उघडी होईल. त्यातून किसान आंदेलन संपेल. सोबत सपालाही बुडवेल. भाजप नंबर एक होईल. बसपा ब्राह्मण मतं लुटू शकणार नाही. त्यामुळे बसपा वीस-बावीस टक्कावर पुन्हा थांबेल. सत्तेच्या स्पर्धेत मागे पडेल. टिकैतचा पक्ष  8 ते 10 टक्के मते घेईल. ती सर्व भाजप विरोधी मते राहतील. यासाठी  टिकैत यांना असदूद्दीन ओवैसी बनविण्याचा छुपा डाव आहे. ही खेळी सुरू झाली. टिकैत भोवती जमलेली चौकडी कामाला लागली. त्या गळात टिकैत अडकले.तर भाजपचे काम सोपे होईल.  याशिवाय ओवैसी आहेतच. ते उरलीसुरली कसर पुर्ण करुन देतील. टिकैत यांना पक्ष काढण्यास लावावयाचं. त्यांनी पक्ष काढल्यास.अडचणीतील भाजपची नाव सुरक्षित विजयी तिरावर पोहचेल. टिकैत ठरतील भाजपचे नावाडी. त्याचा लाभ उत्तरप्रदेशात मिळेल. तसाच लाभ पंजाब, हरियाणात मिळेल. यास शह देण्यास ' नो व्होट भाजप ' चा नारा कितपत प्रभावी राहील. या खेळीत तो भाजपचे किती बिघडवेल. ते निवडणूक मैदानातच कळेल.अगोदर  टिकैत जाळात अडकतात. ते बघावे लागेल. ते अडकले. तर विरोधकांमार्फत डाव साधण्याची ही खेळी असेल. ती सामान्य शेतकऱ्यांनाही कळणार नाही. तो पर्यंत हवाहवाई...!

-भूपेंद्र गणवीर

..................BG...................