कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१७ जून २०२१

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

 कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख■ कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सांभाळ योग्यरितीने होतो किंवा नाही याबाबत खात्री करा

■ दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबतची तपशिलवार माहिती समन्वयकांना उपलब्ध करुन द्यावी

■ चाईल्ड हेल्पलाईन क्र. 1098 चा माहितीफलक सर्व रुग्णालयात दर्शनी भागात असेल याची दक्षता घ्यावी

             पुणे, दि. 17 : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी  दिल्या. कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा, असे निर्देशही त्यांनी दिले. 

 जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आढावा घेताना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांच्यासह जिल्हास्तरीय कृती दलाचे सदस्य उपस्थित होते. 

 जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, कोरोनामुळे ज्या बालकांचे पालक दगावले आहेत अशा बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत मदत मिळावी म्हणून कृतीदलाची (टास्क फोर्स)ची स्थापना करण्यात आली आहे. अशा बालकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासोबतच कोरोनामुळे पालक गमावलेले अशा बालकांचा सांभाळ योग्यरितीने होतो किंवा नाही याबाबत खात्री करून घ्यावी, त्यासाठी गृहभेटी द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. 

कोवीड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबतची तपशिलवार माहिती समन्वयकांना उपलब्ध करुन देण्याबाबत देण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, चाईल्ड हेल्प लाईन क्र. 1098 चा माहिती फलक कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या बालगृहे, निरीक्षणगृहांकरीता तात्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकिय पथक नियुक्त करण्यात यावीत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण देणे ही आपली जबाबदारी आहे. बालकांची सर्वतोपरी काळजी घेण्यासोबतच बालकाचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, ज्या बालकांचे दोन्ही पालक दगावले आहेत त्या बालकाच्या पुनर्वसनासाठी भरोसा सेलची टिमही गृहभेटी देणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण देणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.