आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ क्रीडा शिक्षणास प्राधान्य देणारे ठिकाण म्हणून विकसित करणार- क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२७ जून २०२१

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ क्रीडा शिक्षणास प्राधान्य देणारे ठिकाण म्हणून विकसित करणार- क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार
पुणे, दि. 26:- नवीन पिढी क्रीडा पूरक घडविण्यासाठी 'आरोग्य हीच संपत्ती' या तत्वावर आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणीवर भर आहे. राज्याचे नाव राष्ट्रीय तसेच आतंरराष्ट्रीय पातळीवर झळकविण्यासाठी या विद्यापीठातून प्रतिभावंत खेळाडू घडविण्याचा मानस आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या माध्यामातून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करुन राज्य व देशात क्रीडा शिक्षणास प्राधान्य देणारे ठिकाण म्हणून विकसित करणार असल्याचे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी केले.
ज्येष्ठ खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथे 'आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र' या विषयांवर चर्चा करण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील , पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, 'पीएमआरडीएचे' मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्यासह क्रीडा विभागातील नामवंत तज्ज्ञ, खेळाडू तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.
प्रास्ताविक भाषणात क्रीडा व युवक कल्याणमंत्री श्री. केदार म्हणाले, शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथील परिसर जगाच्या नकाशावर येण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. संशोधन, प्रशिक्षण व कौशल्य विकास यामधील गुणवत्ता वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणी करु, असा विश्वास व्यक्त करत क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी विद्यापीठ उभारणी करीता आपले मार्गदर्शनपर योगदान द्यावे, असे आवाहनही क्रीडा व युवक कल्याणमंत्री श्री. केदार यांनी केले. आर्थिकदृष्टया गरीब असलेल्या खेळाडूंना या विद्यापीठाच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खासदार शरद पवार म्हणाले, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मदत घेवून त्यांचा ज्ञानाचा उपयोग करुन घ्यावा. या विद्यापिठाचे नाव राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर येण्यासाठी प्रयत्न करावे. या सर्वांचा परिणाम म्हणून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले प्रतिभावंत खेळाडू घडविणारे केंद्र म्हणून या विद्यापीठाकडे बघितले गेले पाहिजे. उद्योग जगतातील लोकांना सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सहभागी करुन घ्यावे, असेही खासदार श्री. पवार यावेळी म्हणाले.
क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आपल्या आभारप्रदर्शन भाषणात म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हा राज्यशासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या विद्यापिठाच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे प्रतिभावंत खेळाडू घडविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 यावेळी तायक्वांदोपट्टू मृणाल वैद्य हिचा व्हियतनाम येथे झालेल्या दुसऱ्या एशियन कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशीप स्पर्धेत कास्यपदक जिकंल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
 क्रीडा विभागातील नामवंत तज्ज्ञांनी आंतराष्ट्रीय क्रीडा विद्यापिठाच्या विविध विषयांवर महत्वपूर्ण सूचना केल्या.
 प्रांरभी शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथील विविध विकास कामांची मान्यवरांनी पाहणी केली.
*****