नागपुरात जादा भावात स्टँम्प पेपरची विक्री - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१७ जून २०२१

नागपुरात जादा भावात स्टँम्प पेपरची विक्री

 अधिक भावात स्टँम्प पेपर विकणाऱ्या

वेंडरवर कडक कारवाई करणार

                                     -जिल्हाधिकारी ठाकरे

 

Ø  विक्रेत्यांना ताकीद ; बेव साईटवर वितरण जाहीर करण्याचे निर्देश

Ø  पोलीस विभागाला गरज पडल्यास धाडी टाकण्याचे आदेश

 

नागपूर दि. 17 : नागपूर जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेत्यांसंदर्भात (स्टँम्प वेंडर) मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन आज नागपूर शहरातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांची एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. यापुढे मुद्रांक पेपर चढ्या भावाने, निर्धारित किंमतीपेक्षा अधिक दराने विकल्या गेल्याच्या तक्रारी आल्यास व अन्य गैरव्यवहार केल्यास मुद्रांक विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याचे व कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज येथे दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनमध्ये मुद्रांक विक्रेत्यांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी सह जिल्हानिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी आर. बी. मुळे, वरिष्ठ कोषागार अधिकारी अरविंद घोडे, पोलीस उपअधीक्षक सुधीर नंदनवार, रेखा बावरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक संतोष बकाल उपस्थित होते.

            नागपूर जिल्ह्यात सध्या 55 विक्रेते कार्यरत आहेत. या विक्रेत्यांना तीस हजारापर्यंत मुद्रांक पेपर विक्री करण्याची मर्यादा आहे. अन्य मुद्रांक विक्री मोठ्या प्रमाणात ई-चलानच्या माध्यमातून ऑनलाईन केली जाते. या छोट्या विक्रेत्यांना केवळ 100 व 500 किंमतीचे स्टॅम्प पेपर विकण्याची मुभा आहे. मात्र गेल्या काही दिवसात जास्त किंमतीने मुदांक विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे आज सर्व मुद्रांक पेपर विक्रेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बचत भवनात पाचारण केले होते. यावेळी यापुढे कुठलीही तक्रार येता कामा नये. तसेच नियमानुसार मुद्रांक विक्री करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर सध्या नागपूर शहरात उपलब्ध असणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांच्या नावापुढे त्यांना देण्यात आलेल्या स्टॅम्प पेपर साठ्याची नोंद केली जाईल, तसेच अधिक किंमतीने स्टॅम्प विक्री केल्यास पोलिस विभागामार्फत कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

            यावेळी मुद्रांक विक्रेत्यांसोबत सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी आर. बी. मुळे, वरिष्ठ कोषागार अधिकारी अरविंद घोडे तसेच पोलिस उपअधीक्षक सुधीर नंदनवार यांनी संवाद साधला. यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुद्रांक विक्रेत्यांकडून तक्रार येता कामा नये, असे त्यांना बजावण्यात आले. यावेळी मुद्रांक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सतीष पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.