स्वबळाचा नारा आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे ! मुख्यमंत्री - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१९ जून २०२१

स्वबळाचा नारा आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे ! मुख्यमंत्री
तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा ! : मुख्यमंत्री 

मराठी माणसाला स्वाभिमान दिला. स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं. तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा ! असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धध्व ठाकरे यांनी केले. 

 शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांना मार्गदर्शन करीत होते. ते म्हणाले, गेल्या दीड वर्षात आपलं काम बोलतंय. अनेकांच्या पोटात दुखतंय. सत्ता नाही म्हणून पोटात दुखतंय, ते त्यांचं त्यांनी पाहावं, त्यांना औषध मी नाही देणार. राजकीय औषध मी देईन. अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे. आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवाच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं आहे ! आघाडी टिकण्याची काळजी तुम्ही करु नका. आमचा हेतू प्रामाणिक आहे, राज्याचा विकास करणे, गोरगरिबांची सेवा करुन त्यांचा आशीर्वाद मिळवणे यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत !

महाराष्ट्राचा अनुभव घेताना अन्य राज्याचा अनुभव काही फार वेगळा नाही.अजून किती काळ हे संकट चालेल हे सांगता येत नाही.कोविड नंतर देखील पोस्ट कोविड तक्रारी आहेत.पोस्ट कोविड आरोग्यच्या तक्रारी.परिवारातील लोक निवर्तली आहेत,कर्ता माणूस गेला आहे, रोजगार गेले आहेत,अनेक रोजगार बुडाले आहेत !

प्रमोद नवलकर म्हणायचे शिवसैनिकांसाठी तीन सण आहेत, 23 जानेवारी शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस, दुसरा म्हणजे 19 जून शिवसेनेचा वर्धापन दिन आणि 13 ऑगस्ट मार्मिकचा वर्धापन दिन. हे तिन्ही दिवस आपण उत्सवासारखे साजरे करतो आणि केलेच पाहिजे ! असेही ते म्हणाले. 

आमच्या हिंदुत्वावर संशय घेतला जातो. आमचं हिंदुत्व संकुचित नाही, शिवसेनेने महाविकास आघाडी केली तर हिंदुत्व सोडलं का असं विचारलं जातं. मला या लोकांना सांगायचं आहे की, हिंदुत्व हे काही नेसण्याची आणि सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे, हिंदुत्व आमचा श्वास आहे !

शिवसेना मराठी माणसाच्या हक्काबद्दल बोलत होती तेव्हा काहीजण आम्हाला संकुचित म्हणायचे. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिल्यानंतर यातलेच काहीजण आम्हाला धर्मांध म्हणू लागले !