पुरणचंद्र मेश्राम यांनी महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय व्हावे : सर्व मान्यवरांचा सूर #nagpur #news - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२५ जून २०२१

पुरणचंद्र मेश्राम यांनी महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय व्हावे : सर्व मान्यवरांचा सूर #nagpur #news

डॉ. पुरणचंद्र मेश्राम एकसष्टीपूर्ती अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

नागपूर :- डॉ. पुरणचंद्र मेश्राम हे नवसमाजनिर्मितीच्या ध्येयाने प्रेरित होऊन सामाजिक समतेच्या प्रस्थापनेसाठी लढणारे आंबेडकरी चळवळीतील एक झुंजार कार्यकर्ते आहेत. दलित पँथरच्या पहिल्या पिढीतील युद्धसज्ज आंदोलक आहेत. विदर्भातील युवा पिढीसाठी त्यांचे सामजिक व प्रशासनिक कार्य रोल मॉडेल आहे. सामाजिक उत्तरदायित्व सांभाळण्याची तळमळ असलेल्या पुरणचंद्र मेश्राम यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन महाराष्ट्रातील राजकारणाला नवा चेहरा प्रदान करावा, असा सूर सर्व वक्त्यांनी व्यक्त केला. डॉ. पूर्णचंद्र मेश्राम यांनी ६१ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या वतीने त्यांचा २१ जून रोजी एकसष्टीपूर्ती अभिष्टचिंतन सोहळा ऑनलाइन माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रख्यात अर्थतज्ज्ञ, आंबेडकरी विचारवंत व राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, आमदार अभिजित वंजारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुबिना अंसारी यांची उपस्थिती लाभली होती.
डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या वतीने त्यांचा व त्यांच्या सहचारिणी प्रा.डॉ.राजश्री मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विचार व्यक्त करताना *डॉ. वेदप्रकाश मिश्रा* म्हणाले, पुरणचंद्र मेश्राम हे परिवर्तनाचे खरे शिखर आहेत. सर्वसामान्य माणसांच्या आशाआकांक्षाचे केंद्र आहेत. त्यांच्या माध्यमातून सामान्यांच्या आशा केंद्रित, पुष्पित आणि पल्लवित झाल्या आहेत. सामाजिक समता व सामाजिक प्रतिष्ठेचे खरे प्रारूप असलेले पुरण मेश्राम समाजाला चेतना निर्माण करण्याचे ते केंद्रस्थान आहेत. युवा पिढीसाठी ते रोल मॉडेल आहेत. त्यांनी इथेच न थांबता आपल्या ऊर्जेचा वापर समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी करावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.


या प्रसंगी *डॉ. भालचंद्र मुणगेकर* म्हणाले, नागपूरची आंबेडकरी चळवळ घडविण्यामध्ये पुरण मेश्रामसारख्या पॅंथर कार्यकर्त्याचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. त्यांनी महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीत अत्यंत निष्ठापूर्वक कार्य केले आणि आजही ते करीत आहेत. समाजासाठी आपले काही उत्तरदायित्व आहे, सामाजिक देणे आपल्याला लाभलेले आहे, ही भावना दुर्दैवाने आंबेडकरी समाजामध्ये उत्तरोत्तर कमी होत आहे. परंतु पुरण मेश्रामसारखे आंबेडकरी विचारांनी भारलेले कार्यकर्ते अत्यंत कणखरपणे अजूनही समाजाच्या उत्कर्षाकरिता लढत आहेत, याचा मला अभिमान आहे. नागपूर विद्यापीठातील झुंजार प्रशासक व आपल्या भूमिकेशी प्रामाणिक असलेला बाणेदार सामाजिक कार्यकर्ता पुरण मेश्राम यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन महाराष्ट्राला नवे सामाजिक व सांस्कृतिक वळण प्राप्त करावे करून द्यावे. आपल्या प्रशासकीय व सामाजिक चळवळीतील अनुभवाचा समाजहितासाठी उपयोग करावा,अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.


*आमदार अभिजित वंजारी* म्हणाले, डॉ. पुरणचंद्र मेश्राम दलित चळवळीच्या माध्यमातून शिखरपदावर गेले.आपल्या बुद्धीच्या बळावर विद्यापीठाच्या सर्वोच्च प्रशासकीय पदावर पोहोचले. विद्यापीठात प्रशासकीय सेवा देताना विद्यापीठाच्या विकासाकरिता त्यांनी अथक परिश्रम घेतले. सोबतच आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून मोठा लोकसंग्रह निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. मी आमदार म्हणून निवडून येण्यामागे त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी आता इथेच न थांबता चांगल्या सार्वजनिक जीवनात नव्या दमाने पुढे यावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.


*डॉ. अनिल हिरेखण* म्हणाले, डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थिदशेपासूनच पुरण मेश्राम यांचे आम्हालाआकर्षण होते. उत्तम वाद-विवादपटू, उत्कृष्ट वक्ते, तळमळीचे विद्यार्थी नेता, एक झुंजार धडाडीचे कार्यकर्ते होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू मी पाहिले आहेत. त्यांनी विद्यापीठाला सामाजिक चेहरा देण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी विद्यापीठात ऐतिहासिक प्रकल्प राबविले. विशेषतः बुद्धिस्ट स्टडी सेंटरची स्थापना, डॉ. आंबेडकर रिसोर्स सेंटर, डॉ. आंबेडकर प्रास्ताविका पार्क, डॉ.आंबेडकर गौरवग्रंथाचे प्रकाशन, तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण केंद्राची उभारणी त्यांच्या कार्यकाळात झाली. एवढेच नव्हे तर, विद्यापीठाच्या सात एकर जमिनीवरील अतिक्रमण काढून विद्यापीठात मध्यवर्ती प्रशासकीय भवनाची उभारणी करण्यात यश प्राप्त झाले. त्यांचे कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असेही ते म्हणाले.


*डॉ. शैलेंद्र लेंडे* म्हणाले, डॉ. पुरण मेश्राम हे कृतिशील, समाजशील आधारस्तंभाचे प्रत्यक्ष मूर्तिमंत प्रतीक आहेत. डॉ पुरणचंद्र मेश्राम यांची सामाजिक महत्ता समजून घेण्याचा हा सोहळा आहे. अपूर्णपासून पूर्णत्वापर्यंतचा प्रवास त्यांनी केला. विद्यापीठातील सर्वांचे ते आधारस्तंभ होते. विद्यापीठाचे खरे विकास पुरुष, विद्यापीठाची खरे पोलादी पुरुष अशा शब्दांत त्यांनी गौरव केला. सामाजिक आणि राजकीय क्षेत्राला रचनात्मक वळण देणारे तरुणांचे प्रेरणास्थान असलेले पुरणचंद्र मेश्राम यांच्यात अफाट क्षमता आहेत. त्यांच्या  क्षमतांचा वापर आपण जर करणार नसू तर तो आपला करंटेपणा ठरेल. त्यांचे नेतृत्व स्वीकारून आंबेडकरी समाजानेच नव्हे तर सर्व परिवर्तनवादी विचारांच्या माणसांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. एका नवी इनिंगला त्यांनी सुरुवात करावी, असे ते म्हणाले.
*डॉ. रुबीना अन्सारी* म्हणाल्या, डॉ.पुरण मेश्राम सरांनी खेड्यापाड्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना समाजकार्य शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कामठीसारख्या मागास भागात समाजकार्य महाविद्यालयाची स्थापना केली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मागील २५ वर्षांपासून ते नि:शुल्क शिक्षण प्रदान करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे, असे त्या म्हणाल्या.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना *डॉ सुखदेव थोरात*  म्हणाले, डॉ.पुरणचंद्र मेश्राम हे केवळ विद्यापीठाचे कुलसचिव नव्हते तर त्यापलीकडे सामाजिक बांधिलकी जोपासणारे ते खरे प्रशासकीय अधिकारी होते. डॉ. आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे ते एक गुड ऍडमिनिस्ट्रेटर होते. प्रशासकीय कर्तव्य पार पाडताना गरीब, सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा तसेच सर्व समाजाचा कसा फायदा होईल, याकडे विशेष लक्ष दिले.  त्यांना कायद्याचे प्रचंड ज्ञान आहे. कोणताही नियम न मोडता नियमाला वाकवून समाजहिताचे कार्य त्यांनी केले.त्यांचे हे कसब त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक विलक्षण पैलू आहे. त्यांच्या तोडीचा चांगला प्रशासक मला अजूनतरी कोणी दिसला नाही. सामाजिक पैलू विद्यापीठात रूपांतरित करण्याची त्यांची शैल अदभुत आहे. कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता विद्यापीठात व  विद्यापीठाच्या बाहेर त्यांनी कार्य केले.  त्यांच्या रूपाने एक विलक्षण नेतृत्व पाहायला मिळाले. आपल्या बांधिलकीला नोकरीचा अडथळा येऊ दिला नाही. सामाजिक क्षेत्रातील त्यांची भूमिका फार प्रकर्षाने दिसते.अजूनही ते तरुण आहेत. समाजाला अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांची नितांत आवश्यकता आहे. त्यांनी आपले कार्य यापुढेही सुरू ठेवावे, अशा शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना *डॉ. पुरणचंद्र मेश्राम* म्हणाले,
माझ्या जीवनात मी डॉ.आंबेडकरांना अपेक्षित असलेला कार्यकर्ता व प्रशासक होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आपले ज्ञान,कौशल्य, लेखणी व अधिकाराचा उपयोग लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी केला. विद्यापीठात सर्वसमावेशक दृष्टी ठेवून व सर्वांना सोबत घेऊन कार्य केले. त्यामुळे मला माझ्या स्वप्नातील प्रकल्प पूर्ण करता आले. विद्यापीठाला सामाजिक चेहरा देण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. विद्यापीठात कार्य करताना माझ्यावर अनेक आघात झालेत; पण मी कधीही डगमगलो नाही. तसेच कधीही माझ्या मूल्यांशी व तत्त्वांशी तडजोड केली नाही. विद्यापीठात मी शंभर टक्के मागासवर्गीयांचा अनुशेष भरला. त्या वेळी  सर्वांचे सहकार्य लाभले होते. पण अलीकडे आरक्षणाच्या नावाखाली लोकांमध्ये प्रचंड दरी निर्माण होत आहे. अशा वेळी सर्वसमावेशक व व्यापक दृष्टी ठेवून सामाजिक समतेचा लढा उभा करणे ही काळाची गरज आहे. या लढ्यात एक कार्यकर्ता म्हणून मी अखेरपर्यंत कार्य करेल, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक, विविध संघटनांचे कर्मचारी, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफिसर्स फोरमचे पदाधिकारी, नागपूर विद्यापीठातील कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले.  कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन सिद्धांत मेश्राम, रचित मेश्राम डॉ. प्रवीण घोसेकर यांनी सांभाळले.