अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीजजोडणी ; अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना संधी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१६ जून २०२१

अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीजजोडणी ; अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना संधी

अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीजजोडणी

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना संधी

नागपूर,   दि१६ जून २०२१राज्य शासनाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’मधून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी अर्जदारांकडून योग्य कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त होताच महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीविजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ एप्रिलपासून ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरगुती नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी अर्जदारांना वीजजोडणीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सोय आहे. लाभार्थ्यांना या योजनेमधून घरगुती वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणकडे एकूण ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम देखील पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीजबिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

महावितरणकडून वीजजोडणीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांमध्ये वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येईल. तसेच ज्या ठिकाणी वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा तयार करावी लागणार आहे अशा ठिकाणी महावितरणकडून स्वनिधी किंवा जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी (विशेष घटक योजना तथा आदिवासी उपाययोजना सहित) किंवा कृषी आकस्मिकता निधी व इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून प्राधान्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येईल व संबंधीत लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात येईल.

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी नवीन वीजजोडणीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, वीजजोडणीच्या विहित नमून्यातील अर्जासोबत आधार कार्ड, रहिवासी कार्ड जोडावे. वीजजोडणीसाठी  अर्ज केल्याच्या ठिकाणी वीजबिलाची पूर्वीची थकबाकी नसावी. तसेच शासनमान्य विद्युत कंत्राटदाराकडून वीजसंच मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.या योजनेविषयीची अधिक माहिती www.mahadiscom.in या महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.