कोरोना लढा पोहचला मंत्रालयात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत११ जून २०२१

कोरोना लढा पोहचला मंत्रालयात

 आदिवासीबहुल दोन गावांचा कोरोना लढा पोहचला मंत्रालयात

पिपळधरा व शिरपुर गावाच्या एकोप्याने कोरोना हद्दपार

नागपूर दि. 11:- महाराष्ट्रात कोरोना काळात काही गावांच्या कोरोना लढ्याने वेगळा ठसा उमटवला आहे. 'गाव करी ते राव न करी' म्हणतात.. नागपूर जिल्ह्यातील अशाच अभिनव प्रयोगाची दखल मंत्रालयाने घेतली आहे. आदिवासीबहुल पिपळधरा, शिरपूर गावाने एकत्रित लढ्यातून कोरोनाला नियंत्रित ठेवले आहे.
हिंगणा तालुक्यातील पिपळधरा ग्रामपंचायतीच्या धडाडीच्या संरपच श्रीमती नलिनीताई शेरकुरे यांच्या गट ग्रामपंचायतीमध्ये  कटंगधरा, मांडवा ( मारवाडी ), नागाझरी, पिपळधरा चार गावांचा समावेश होतो. नलीनी शेरकुरे या गावच्या सरपंच आहेत… त्यांच्या शब्दांत कोरोनामुक्त गावाचा हा प्रवास…

कोरोनाच्या पहील्या लाटेत शहरात संसर्ग जास्त होता. गावामध्ये तेवढे गांर्भीय नव्हते. माझ्या गट ग्रामपंचायतमध्ये चार गावांचा समावेश होतो. त्यासाठीची तयारी म्हणून ग्रामदक्षता समितीची बैठक घेतली. गावकऱ्यांशी चर्चा करून कोरोनाला दूर ठेवण्यासाठीचा आराखडा तयार केला. खरं म्हणजे मनात साशंकता होती. मात्र चंग बांधला..

सर्वात आधी कोरोनाला प्रतीबंध लावण्यासाठी शासनातर्फे आलेल्या सुरक्षा त्रिसुत्रीच्या पालनासाठी ध्वनीक्षेपण यंत्रणेमार्फत उद्घोषणा सुरू केल्या. हे टीमवर्क असल्याचे लक्षात आले म्हणून गावातील 18 ते 25 वयोगटांतील तरूणांची एक चमू केली. सोबतच सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर करत गावनिहाय व्हॉटसअप ग्रुप तयार केले. गावात प्रवेश करणाऱ्या व गावातून बाहेर जाणाऱ्यांची नोंद ठेवली. तसेच चारही गावात ग्रामसेवक व मी वेळोवेळी दौरा करून पाहणी केली. महीन्यातून दोनदा जंतूनाशक व धुर फवारणी केली.

शासन आपल्या दारीच्या धर्तीवर सरपंच आपल्या दारी हे ब्रीद स्वीकारून वेळोवेळी भेटी, पाहणी केली. फोनव्दारे दररोज संपर्कात होते. गावात कोरोना चाचणीसाठीची व्यवस्था केली. विलगीकरणासाठी शाळांमध्ये व्यवस्था केली. विलगीकरणातील नागरीकांना सर्व आरोग्य सुविधा दिल्यात, पोषक आहार दिला, मास्क न लावणाऱ्या वर दंडात्मक कारवाई केली. वैयक्तिक स्वच्छतेवर सातत्याने जागरुकता केल्याने नागाझरीमध्ये दूसऱ्या लाटेतही रूग्ण आढळला नाही.

शासनाच्या निर्देशानुसार लग्न, धार्मिक समारंभही मर्यादित उपस्थितीत करण्यावर कटाक्ष ठेवला. या कामी गावकऱ्यांसह प्रशासनाची मोठी मदत झाली.

लसीकरणाविषयी आदीवासी गावे विशेषत: कटंगधरा व मांडवा (मारवाडी) गैरसमज होते. ते दूर करण्याविषयी  समुपदेशनासह माहिती-जागृती तर मी केलीच मात्र स्वत:पासून सुरूवात करून लोकांची भिती घालवली. स्वत:पासून सुधारणा हेच या लसीकरण  विषयक गैरसमजाला दूर ठेवते. कान्होलीबारा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला गावकऱ्यांना जाता यावे यासाठी सामान्य फंडातून वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करून निशुल्क वाहनाची व्यवस्था केली. या सगळ्या प्रयत्नामुळे लोकांमध्ये जागृती होऊन लसीकरणाचे प्रमाण वाढले व  माझी गावे कोरोनामुक्त राहीली.  संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मी व माझे गावकरी सज्ज आहोत.


शिरपूरची यशकथा


नागपूर ग्रामीणमधील शिरपूर या 848 लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीने देखील कोरोनाला गावात पाय ठेवू दिला नाही. दूसऱ्या लाटेत ग्रामीण भागात थैमान घातले होते. मात्र सामुहिक प्रयत्नांच्या जोरावर या गावाने केलेला कोरोनामुक्तीचा यशस्वी  प्रवास केला. सरपंच गौरीशंकर गजभिये यांच्या शब्दांत कोरोनामुक्त गावाचा प्रवास…

शिरपूर गटग्रामपंचायत अंतर्गत शिरपूर, खैरी व भूयारी ही गावे आहेत. यापैकी खैरी हे आदिवासी लोकसंख्येचे गाव आहे.वेणा नदीच्या काठावर वसलेल्या या गावात नागरीकांचा सक्रीय सहभाग असतो. शिरपूर जंगलालगत आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्यानेच हे गाव कोरोनामुक्त राहीले आहे. मास्कचा वापर, हात धुणे, शारीरिक अंतर पाळणे यावर गावात सातत्याने जागृती करण्यात आले. नागरीकांना ग्रामपंचायतीच्यावतीने राबविलेल्या सर्व मोहीमांमध्ये सहभागी केल्याने माझ्या गावाचा मीच रक्षक ही भावना वाढीस लागली. बाहेर गावातून येणाऱ्यांची तपासणी करूनच त्याला गावात प्रवेश दिल्याने कोरोनाच्या संसर्गाला पायबंद झाला. तसेच गावात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर ही कारवाई केल्याने सुपर स्प्रेडरला आळा बसला.

माझे कुटुंब माझी जबाबदारी’चे गावकऱ्यांनी पालन केले. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा खांब असणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका, तलाठी या सगळयांनी व जिल्हा प्रशासनानी सहकार्य केले. त्याचाच सामुहिक विजय म्हणजे शिरपूर कोरोनामुक्त राहीले व भविष्यातही राहील असा  मला विश्वास वाटतो.