वाघाच्या अवयवावर अघोरी कृत्य - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ जून २०२१

वाघाच्या अवयवावर अघोरी कृत्य

जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करा : अ.भा. अंधश्रधा निर्मूलन समितीची मागणी


चंद्रपूर:- गुप्तधन आणि पैशाचा पाऊस पाडण्याच्या हव्यासापोटी मोठ्या प्रमाणात वन्यजीवांची हत्या केली जाते. सिंदेवाही जवळील जंगलामध्ये वाघाच्या अवयवांचा गुप्तधन व पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी कृत्य करणार्‍या टोळीला अटक झाल्यानंतर सदर गंभीर बाब उघडकीस आली आहे. केवळ वाघच नाही तर अंधश्रद्धेने बरबटलेल्या अशा टोळ्या गुप्तधन, पैशाचा पाऊस पाडने, असाध्य आजार बरे करणे, आदीसाठी कासव, घुबड, अस्वल, खवल्या मांजर, मांडोळ साप, आदींची मोठ्या प्रमाणात शिकार करतात तसेच पांढरा आणि पिवळा पळस या दुर्मिळ वृक्षाचा सुद्धा अघोरी कृत्यांसाठी बळी दिला जातो. अशा अघोरी कृत्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१३ साली महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायदा संमत केला. यानुसार मौल्यवान वस्तू, गुप्तधन आणि जलस्रोत शोधण्याच्या बहाण्याने करणी, भानामती च्या नावाखाली अघोरी कृत्य करीत असेल तर तो गुन्हा आहे. म्हणून सिंदेवाही येथील घटनेत अटक झालेल्या आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदयासोबतच जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच वन विभागाने वन्यजीव व अंधश्रद्धा या महत्वपूर्ण विषयाबाबत वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती करण्याची मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, जिल्हा संघटक अनिल दहागांवकर, जिल्हाध्यक्ष अॅड. गोविंद भेंडारकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे, सहसचिव अनिल लोनबले, वन्यजीव अभ्यासक यशवंत कायरकर, महिला संघटिका रजनी कार्लेकर, प्रा. बालाजी दमकोंडवार, सुजित खोजरे, प्रसिद्धीप्रमुख निलेश पाझारे यांनी केली आहे.