महावितरणकडून ५.१७ कोटींची सहायता निधीला मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० जून २०२१

महावितरणकडून ५.१७ कोटींची सहायता निधीला मदत

 महावितरणकडून ५.१७ कोटींची सहायता निधीला मदत

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्याहस्ते मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

 


नागपूर दि. १० जून २०२१: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनातील ५ कोटी १७ लाख ३४ हजार ६३१ रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री ना. श्री. उद्धव ठाकरे यांना ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते गुरुवारी (दि. १०) सुपुर्द करण्यात आले.

कोविड-19 संदर्भात राज्य शासनाच्या विविध उपाययोजनांना आर्थिक बळ म्हणून महावितरण नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यात आली आहे. सह्याद्री अतिथी गृह येथे  आयोजित छोटेखानी कार्यक्रमात महसूलमंत्री ना. श्री. बाळासाहेब थोरातसार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. अशोक चव्हाणऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारेमहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघलमहानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय खंदारेमहावितरणचे संचालक श्री. भालचंद्र खंडाईत (प्रकल्प)कार्यकारी संचालक श्री. प्रसाद रेशमे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मुख्यमंत्री सहायता निधीला केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कौतुक करीत समाधान व्यक्त केले. यावेळी महानिर्मितीच्या १ कोटी २ लाख ७१ हजार १४३ रुपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री ना. ठाकरे यांना ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्याहस्ते सुपुर्द करण्यात आला.

कोरोना विषाणूचे संकट संपविण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना सुरु आहे. मात्र कोरोनामुळे उद्भवलेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी जमा करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे. त्यास प्रतिसाद देत महावितरणच्या नियमित ५३ हजार ५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मे महिन्यातील एक दिवसाच्या वेतनापोटी ५ कोटी १७ लाख ३४ हजार ६३१ रुपयांचा मदतनिधी जमा करण्यात आला आहे.

मागील वर्षी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविडसाठी ७ कोटी ७ लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री सहायता निधीला दिली होती. त्यापूर्वी २०१९ मध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी ५ कोटी ५६ लाख तसेच २०१८ मध्ये केरळमधील महापूर संकट निवारणार्थ आर्थिक मदत म्हणून ३ कोटी ९९ लाख रुपयांची देणगी देण्यात आली होती.