ऐतिहासिक नद्यांना ग्रहण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत



०७ जून २०२१

ऐतिहासिक नद्यांना ग्रहण




चंद्रपूर शहराच्या शेजारून वाहणार्‍या इरई आणि झरपट नदी या प्रमुख जीवनदायिनी आहेत. या दोन्ही नद्या गोंङकालीन ऐतिहासिक प्रसंगांची आठवण करून देतात व पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने या नद्यांचे महत्वाचे आहॆ. नदीतील पाण्याच्या भरोशावर शेजारच्या गावांमध्ये शेती पिकते. शहरासाठी अनेक भागांमध्ये पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, या नद्यावर अतिक्रमण होत असल्याने चिंता निर्माण होत आहे. कोळशाचे अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वेकोलिने चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचा प्रवाहच अडवून धरला आहे.

इरई नदी ही वर्धा नदीची उपनदी असून ती चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाची नदी आहे. चिमूर तालुक्यातील कासारबोडी गावाजवळ नदी उगम पावते आणि हडस्ती गावाजवळ वर्धा नदीला मिळते. तिची एकूण लांबी 78 कि.मी. आहे. चंद्रपुरातुन इरई आणि झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदी पूर्वी या चांदागडची जीवदायिनी होती तर आता इरई नदी चंद्रपूरकरांची तहान भागवित आहे. असे असतानाही या दोन्ही नद्यांची उद्योगांनी वाट लावली आहे. इरई नदीचे तर नैसर्गिक पात्रच वेकोलिने बदलवून टाकले आहे.  वेकोलिच्या चंद्रपूर शहराला सभोवताल खुल्या व भूमिगत कोळसा खाणी आहेत. वेकोलिच्या चंद्रपूर क्षेत्रांतर्गत दुर्गापूर हे उपक्षेत्र येते. या उपक्षेत्रात पायली, भटाळी येथे खुल्या कोळसा खाणी आहेत. बल्लारपूर पेपरमील, चंद्रपूर वीज केंद्रामधील रसायनयुक्त पाणी या नदीत सोडल्यामुळे नदीचे पात्रच काही ठिकाणी विषारी झाले आहे. इरई वाचावी म्हणून पर्यावरणवाद्यांनी पुढे येण्याची गरज आहे. 


औद्योगिकदृष्टय़ा प्रगतीपथावर असलेल्या या जिल्ह्य़ात वर्धा, इरई आणि झरपट या तीन प्रमुख नद्या आहेत. यातील वर्धा नदीतून जवळपास २० प्रमुख उद्योग पाण्याची उचल करतात. वर्धा या एकाच नदीतून वर्षांकाठी हजारो ट्रॅक्टर रेतीचा उपसा केला जातो. त्यातून जिल्हा प्रशासनाला २२ कोटीचा महसूल मिळतो. त्यापाठोपाठ इरई नदीतून या शहराला, तसेच एमआयडीसी व काही छोटय़ा उद्योगांना पाणी पुरवठा होतो. झरपट नदी तर पूर्णत: नामशेष झाली असून केवळ महाकाली मंदिर परिसरात या नदीतून पाणी पुरवठा होतो. या तिन्ही प्रमुख नद्या आज अखेरच्या घटका मोजत आहेत. 


इरई वाचविण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी आवाज बुलंद केल्यामुळे अखेर शासनाला याबाबत गंभीर व्हावे लागले. त्यानंतर इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरण अजूनही अपूर्णच आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने नद्यांचा विकास झालेला नाही. मात्र दुसरीकडे याच नद्यांवर अतिक्रमण करून नद्याच गिळंकृत करण्याचा प्रकार सुरू आहे. शासनाने या नद्यांच्या भागांमध्ये पूरग्रस्त रेषा म्हणून आखली. तरीदेखील अवैध बांधकाम थांबले नाही. हा प्रकार वेळीच थांबविला पाहिजे. पावसाळ्यामध्ये पुराचे पाणी घराघरात घुसून जनजीवन विस्कळीत होत असते. अशा स्थितीतही इरई नदीवरील रामझुला दाताळा पुलापासून सिव्हरेज प्लांटपर्यंत तिथून पुढे शांतिधाम स्मशानभूमीपर्यंत, पठाणपुरा झरपट नदी व इरई नदीच्या संगमापर्यंत बेकायदेशीररीत्या अतिक्रमणधारकांनाच नुकसानभरपाईचा मोबदला मिळतो. हा प्रकार इतर नागरिकांवर अन्यायकारक आहे. 


इरई व झरपट नदी चंद्रपूरच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नद्यांचा विकास झाला पाहिजे. या नद्यांच्या पात्रांचे खोलीकरण करण्यात यावे. त्यामुळे भूजल पातळी वाढेल. चंद्रपूर शहराने 2006 रोजी पूराची भीषणाता अनुभवली आहे. जनजीवनावर झालेला परिणाम माहिती असतानाही पूरग्रस्त भागात बेकायदेशीर भूखंड पाङून घरे बांधकाम सुरू आहेत. पावसाळ्यात मोठी हानी होत असतानाही अवैध बांधकाम थांबलेले नाही. उलट पूरग्रस्त म्हणून याच बेकायदेशीर लोकांना भरपाई मिळते. 

कोरोणाच्या काळामध्ये वर्षभर प्रशासन कामात व्यस्त असताना काही असामाजिकतत्त्वातील लोकांनी नदीच्या काठावरच भूखंड पाडत आहेत. हे वेळीच थांबले पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने मोका चौकशी करून सदर लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची गरज आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूला आंबा, चिक्कू, फणस, शिसू, काटेरी बांबू, करू, कुसुम, अर्जुन, पोखर, पिंपळ, चिंच, वड, गुलमोहर सदर झाडांची लागवड करण्यात यावी यामुळे नदीपात्रात रेती थांबून राहील ज्यामुळे पाणी जमिनीत अडून राखण्यात मदत होईल. 


- https://devgandate.wordpress.com/