मृत्यू आणि दहन यातील आकडेवारीत मोठी तफावत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१० जून २०२१

मृत्यू आणि दहन यातील आकडेवारीत मोठी तफावत

 नोंदीतील कोरोना मृतापेक्षा दहनघाटावर जास्त अंत्यसंस्कार 

देशात कोरोना आल्यापासून मृत्यू पावलेल्यावर अंत्यसंस्कारासाठी नियम बांधून देण्यात आले आहेत. राज्यात कोरोनामुळे १ लाखाच्यावर मृत्युची संख्या गेली आहे. मृतांच्या संख्येची माहिती देणाऱ्या पोर्टलवर ११ हजार ६१७ मृत्यूंची नोंद अद्याप झालेली नाही. त्यामुळे नोंदीतील कोरोना मृतापेक्षा दहनघाटावर जास्त अंत्यसंस्कार असा प्रकार दिसून येत आहे. 

राज्यात कोरोनानं मृत्यू झालेल्यांच्या संख्येची माहिती देणाऱ्या पोर्टलवर अतिरिक्त ११ हजार ६१७ मृत्यूंची नोंद झालेली नसून, ती येत्या दोन दिवसांत करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी दिलेत. यासोबत नोंद न झाल्यास संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकांना कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

मृत्यूंच्या आकड्यात ११ हजार ६१७ मृत्यू वाढल्यानंतर राज्यातील मृतांच्या संख्येत किमान दहा टक्के वाढ होणार आहे. १८ सप्टेंबर २०२० ते २० मे २०२१ या काळात जिल्ह्यांच्या आरोग्य यंत्रणेने राज्याच्या आरोग्य खात्याला पाठविलेल्या अहवालात नोंदविलेले मृत्यू आणि राज्याच्या आरोग्य खात्याने दाखविलेल्या मृतांच्या संख्येत तफावत असल्याचे समोर आले आहे. राज्याचा दैनंदिन कोरोना अहवाल आणि आकडेवारी प्रशासनाकडून जारी करण्यात येतो. पण विविध जिल्ह्यांतील एकूण मृतांच्या संख्येपेक्षा कमी संख्या राज्याच्या दैनंदिन अहवालात दाखविण्यात आल्याचे दिसून आले आहे. 

असाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 83 हजार 965 वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 81 हजार 296 झाली आहे. सध्या 1 हजार 179 बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1490 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1379, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 40, यवतमाळ 51, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. एकूण मृत्यु 1490 इतकेच असताना चंद्रपूर येथील स्मशानघाटावर अंत्यसंस्कार झालेल्याची संख्या १६०० हुन अधिक आहे. मग २०० मृत्यू झालेल्याची नोंदणी जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी नाही. आरोग्य यंत्रणेने जिल्हा माहिती कार्यालयाला पाठविलेल्या अहवालात नोंदविलेले मृत्यू आणि स्मशानघाटावर अंत्यसंस्कार झालेल्याची संख्या यात तफावत आहे.