युवक काँग्रेसचा धडाडीचा कार्यकर्ता धीरज पांडे यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०६ मे २०२१

युवक काँग्रेसचा धडाडीचा कार्यकर्ता धीरज पांडे यांचे निधन

 युवक काँग्रेसचा धडाडीचा कार्यकर्ता धीरज पांडे यांचे निधन


नागपूर, ६ मे - नागपूर शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष धीरज पांडे यांचे दु:खद निधन झाले. ते ३७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनामुळे आजारी होते. त्यांचा जीवनसंघर्ष आज सकाळी संपला. 

कुटुंबातूनच काँग्रेसच्या विचाराचे संस्कार मिळालेल्या धीरज पांडे यांनी काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यात व युवकांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. उत्तर नागपुरातील युवक काँग्रेसचे जाळे विणण्यात धीरज याचे संघटन कौशल्य कारणीभूत होते. काँग्रेस पक्षाप्रती निष्ठावान असलेल्या धीरज यांनी समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही गरजूपर्यंत मदत पोहोचविण्यात धीरज अग्रेसर राहत होते. अत्यंत मनमिळावू व सर्वांना मदत करण्यासाठी तत्पर राहणारे धीरज पांडे हे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय संघटक कृष्णकुमार पांडे यांचे सुपुत्र होते. 


पालकमंत्र्यांची शोक संवेदना

धीरज पांडे हे माझ्या कुटुंबातील एक सदस्य होते. त्यांच्या निधनाने पांडे कुटुंबियांवर प्रचंड मोठा आघात झाला आहे. त्याप्रमाणे माझी व्यक्तीगत हानी झाली आहे. अत्यंत मनमिळावू व काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ असलेल्या कुटुंबाचा हा वारसा धीरज समर्थपणे पुढे नेत होता. काँग्रेसला अशा कार्यकर्त्यांची गरज असताना त्याचे अकाली निधन होण्याने काँग्रेस परिवाराचे फार मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.