शहीद प्रमोद कापगते यांच्यावर आज शासकीय इतमामात परसोडी येथे अंतिम संस्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२८ मे २०२१

शहीद प्रमोद कापगते यांच्यावर आज शासकीय इतमामात परसोडी येथे अंतिम संस्कार

 शहीद प्रमोद कापगते यांच्यावर आज शासकीय इतमामात परसोडी येथे अंतिम संस्कार


कुटुंबीय आणि परसोडी ग्रामवासीयांनी साश्रूनयनांनी दिला अखेरचा निरो

संजीव बडोले प्रतिनिधी.नवेगावबांध दि.27 मे:-

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील मौजा परसोडी येथील भारतीय सैन्य दलातील धारातीर्थ सैनिक शहिद प्रमोद विनायकराव  कापगते यांचा अंत्यविधी आज दि. 27 मे रोज गुरुवारला त्यांच्या जन्मगावी शासकीय इतमामात करण्यात आला.

सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत जवान प्रमोद विनायक कापगते हे दि.25 मे ला नागालँड येथे कर्तव्यावर असतांना सकाळी ५ वाजे चकमकीत गोळी लागून शहीद झाले होते.त्यांचे पार्थिव 27 मे रोज गुरुवारला त्यांचे मुळ जन्मगावी परसोडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

शासनाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या वतीने अर्जुनी मोरगाव चे प्रभारी उपविभागीय अधिकारी विनोद मेश्राम यांनी शहिद प्रमोद यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरीचे अशोक बनकर, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालदंर नालकूल,तहसीलदार उषा चौधरी,गट विकास अधिकारी एम. एस.खुणे, डुग्गीपार पोलास ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगळे तसेच माजी पालक मंत्री राजकुमार बडोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.निवासस्थानी पोलीस मुख्यालय गोंदिया येथील पोलीस चमूने सलामी दिली.त्यानंतर स्मशानभूमीत नागपूर येथील सीआर पीएफ च्या चमूने पीएसआय सांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहा 

पोलीस कर्मचाऱ्यांनी सलामी दिली. शेवटी मुलगा कुणाल कापगते, वेद कापगते व भाऊ राजेश कापगते यांनी अग्नी दिली. शहीद सैनिक प्रमोद कापगते यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला.ते केंद्रीय राखीव पोलीस दलात सन २००० मध्ये सेवेत लागले. त्यांनी त्या विभागात विविध ठिकाणी  सेवा केली होती .त्यांनी  वीस वर्षे देश सेवा केली. ती सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा दोन वर्षे सेवा वाढवून घेतली होती. येत्या ऑगस्ट २०२१ ला ते सेवानिवृत्त होणार होते.परंतु काळाने त्यांच्यावर सेवानिवृत्ती आधीच झडप घातली. त्यांच्या कुटुंबावर  दुःखाचे डोंगर कोसळले . शहीद प्रमोद यांचे कुटुंबीय, नातेवाईक, आप्तस्वकीय व परसोडी येथील हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.