राजोलीवासीयांनी पाळला माणुसकीचा धर्म - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२५ मे २०२१

राजोलीवासीयांनी पाळला माणुसकीचा धर्म

दि.२४/०५/२०२१
पाथरी :-
सावली तालुक्यातील गट ग्रा.पं. चिचबोडी अतर्गंत येणारे राजोली चक-१ या गावातील लोक नेहमीच सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होत असतात. मध्यप्रदेश राज्यामधून आलेल्या व गावालगत झोपड्या टाकून असलेल्या कामगारांना अन्नधान्य देवून मानवतेचा धर्म पाळत गावातील लोकांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे व याचे सर्वत्र कौतुकही होत आहे.

कोरोना महामारीची दुसरी लाट येण्यापुर्वीच मध्यप्रदेश राज्यातील काही कुटूंब स्त्रिया व त्यांची मुले घेवून कामाच्या शोधात येवून गोसी खुर्द नहराच्या कामावर आले व राजोली गावाचा आधार घेवून झोपड्या टाकून वसले आहेत. त्यांनी सोबत आणलेला अन्नधान्य साठा संपल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले.

गावात धान्य विकायला कोणी तयार नाही त्यामुळे पैसे असूनसुद्धा धान्य विकत घेता येत नाही आणि लाॅकडाऊन असल्याने ते परत आपल्या राज्यात जाऊ शकत नाही, ही बाब लक्षात येताच राजोली येथील ग्रामविकास युवा मंडळातील युवकांनी यामध्ये गावातील लोकांचा सहभाग मिळवून गावातील गहू व तांदूळ गोळा केले व त्या कामगार लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला. अशा कोरोनाच्या संकटकाळात माणसाने माणसाच्या मदतीसाठी पुढे येवून शासनाला सहकार्य करावे असे ग्रामविकास युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे. या कार्यामुळे ग्रामविकास युवा मंडळाचे पंचकृषीत कौतुक होत आहे.