पारधी समाजाची उमेद जागविणारी ग्रामायणची सेवागाथा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

३० मे २०२१

पारधी समाजाची उमेद जागविणारी ग्रामायणची सेवागाथानागपूर, २९ मे  : पारधी समाजाला आजही गुन्हेगार म्हणून पाहिले जाते. या समाजाला इतर समाजाने माणूस म्हणून बघावे म्हणून धडपडणार्‍या मंगेशी मून. भीक मागणारी, रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारी, पारधी पाड्यावरची मुले यांच्या शिक्षणासाठी, संस्कारांसाठी धडपडणाऱ्या या तरूणीचे सेवाकार्य. ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सेवागाथा या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या २० व्या भागात  मुलाखत रूपाने प्रेक्षकांसमोर आले .

पारधी समाजाची उमेद जागवणारा 'उमेद' नावाचा प्रकल्प वर्धा जिल्ह्यात रुठा या गावी त्या चालवितात. वर्धा जिल्ह्यातच राहणारी मंगेशी लग्न होऊन मुंबईला आली. तिथे रेल्वेमध्ये, प्लॅटफॉर्मवर, रस्त्यांवर, पुलाखाली सतत भीक मागत फिरणारी मुले पाहून ही मुले भीक का मागत असावी? असा प्रश्न पडला. त्यांच्याशी बोलायला गेल्यावर ती मुक्याचे सोंग घेत असत. त्यांची निवासस्थाने शोधून अतिशय चिकाटीने माहिती काढल्यावर ही स्थलांतरित मुले असून पारधी समाजातील आहेत हे कळले. त्यांचे आई-वडीलच केवळ आपले पोट भरण्यासाठी, दारू पिण्यासाठी आपल्या मुलांना भीक मागायला लावतात, हेही लक्षात आले. शिक्षण आणि संस्कारांपासून वंचित असणाऱ्या या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण काय करावे हा विचार स्वस्थ बसू देईना. आपल्या वडिलांपासून समाजकार्याची प्रेरणा घेतलेल्या मंगेशी मून यांनी तीन वर्ष प्लॅटफॉर्मवरच त्यांची शाळा घेतली, परंतु मुलांच्या जीवनात भीक मागणे, चोरी करणे यात फारसा फरक पडला नाही.

हे काम पुरेसे नाही हे लक्षात आल्यावर २०१४ ला त्या वर्धेत आल्या. रोठा या गावी वडिलांची ११ एकर शेती होती. त्यावर स्वखर्चाने वसतिगृह बांधले. मुंबई, पुणे, नगर हून अशीच भीक मागणारी मुले त्यांच्या आई-वडिलांचा प्रचंड विरोध सहन करून वसतिगृहात आणली. या स्थलांतरित मुलांचे कुठलेही आयडी नव्हते. मोठ्या प्रयासाने त्यांची जन्मतारीख शोधून त्या सर्वांची आयडी तयार केली व त्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल केले. सुरुवातीला  ४ ते १४ वयाची ३५ मुले व मुली आणलीत मात्र आज या वसतिगृहात ७० मुले राहतात. हळूहळू लोकांचा सहभाग वाढला व आर्थिक मदत व्हायला सुरुवात झाली. पारधी समाज हा इंग्रजांच्या काळापासून शिक्षण, आरोग्य याला वंचित राहिलेला असून चोरी करणे व भीक मागणे हीच यांची ओळख बनली आहे. अशा कठीण परिस्थितीत त्या मुलांना व त्यांच्या आई-वडिलांना त्यांचे हित समजावून वसतिगृहात ठेवणे फार कठीण काम असून त्यांनी ते पेलले आहे. आजही वसतिगृहात आणलेल्या वीस मुलांपैकी सात आठ मुले पुन्हा पळून जाऊन भीक मागणे सुरू करतात, परंतु निराश न होता त्या होऊन आपले काम सुरू ठेवतात.

या मुलांना स्वतःचे काम स्वतः करणे स्वच्छता व शिक्षणाबरोबर काही कौशल्येही जसे करघा चालवणे, टेलरिंग, ब्युटी पार्लर व शेतीची कामे, कुक्कुट पालन शिकवले जाते. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत या दृष्टीने त्या एक वृद्धाश्रमही तेथे सुरू करणार आहेत. जेणेकरून मुलांना आजी आजोबा व आजी-आजोबांना नातवंडे मिळतील.

पारधी समाजातील अंधश्रद्धा, बालविवाह, जातपंचायत व देवकरण प्रथा बंद झाल्या पाहिजेत असे त्यांना कळकळीने वाटते व त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. पारधी समाजातील मुले शिक्षण घेऊन संस्कारीत होऊन मोठी होतील तेव्हा तीच त्या समाजाला वर आणण्यासाठी मदत करू शकतील, असे त्या सांगतात.

 त्यांचे हे कार्य श्री मुकुंद पांडे यांनी एक अतिशय उत्कृष्ट मुलाखत घेऊन सर्वांसमोर उभे केले. प्रास्तविक व आभार प्रदर्शन सौ. श्रुती पातुरकर यांनी केले.