Top News

डिजिटल मीडियाचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश | digital media

*‘ व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश* *ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश* *मुंब...

ads

बुधवार, मे २६, २०२१

४०० हुन अधिक दिवासानंतरही कोरोनाविरुद्ध अविरत लढा

चंद्रपूर/(खबरबात):

२२ मार्च २०२० रोजी पहिल्या लॉकडाऊनपासून आज तब्बल ४०० हुन अधिक दिवासानंतरही कोरोनाशी दोनहात सुरूच आहेत. तेव्हापासून आता सुद्धा मनपाची आरोग्य यंत्रणा कोरोना विरोधात अविरत लढा देत आहे. सुरुवातीपासून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मनपा प्रयत्नशील राहिली. आणि त्यामुळेच आता कोरोनाची दुसरी लाट सुद्धा नियंत्रणात आल्याचे चित्र शहरात दिसत आहे. यासाठी मनपाच्या आरोग्य यंत्रणेने प्रभावी कार्य पार पाडले. मनपाच्या आरोग्य यंत्रणेत एकूण 315 कर्मचारी कार्यरत आहेत. यात ३७ वैद्यकीय अधिकारी, ११अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, ३५ अधिपरिचारिका, १०४ परिचारिका, ११ लॅब टेक्नेशियन, ८ फार्मासिस्ट, १ ईसीजी टेक्नेशियन, २ स्टोअर ऑफिसर, २० वॉर्डबॉय, ५५ डेटा एंट्री ऑपरेटर, २९ शिपाई, एक शहर कार्यक्रम व्यवस्थापक व एका शहर लेखा व्यवस्थापकाचा समावेश आहे. 

महापौर राखी संजय कंचर्लावार आणि मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली मनपाची आरोग्य यंत्रणा कोरोना नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.

चंद्रपूर शहर महापालिकेतर्फे सुरुवातीपासूनच विविध उपाययोजना करण्यात आल्या. प्रारंभी उपासमारी होणाऱ्या नागरिकांना जेवणाचे डब्बे पोहचविण्यात आले. गरिबांना अन्नधान्याची किट वाटप करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींच्या खात्यात ७५० रुपये दिलेत. बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी विलगीकरण व्यवस्था उभारली. २५ लसीकरण केंद्र, कोरोना चाचणी केंद्र सुरु केले. शहरच नव्हेतर जिल्ह्यातील नागरिकांसाठी कोव्हीड केअर सेंटर सुरु केले. वन अकॅडमी, सैनिक स्कुलच्या माध्यमातून रुग्णांना एक चांगली सुव्यवस्था निर्माण झाली. आता कोव्हीड रुग्णालयाच्या माध्यमातून सेवेतील एक उणीव भरून निघाली.
कोव्हिड केअर सेंटर

कोरोनाची पहिली लाट आल्यापासून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कंबर कसून उपाययोजना आखल्या. साधारणतः दीड महिना कोरोनाला थोपवून धरलं होतं. मात्र, २ मे २०२० रोजी चंद्रपूर शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर मनपा प्रशासन युद्धस्तरावर कामाला लागले. रुग्णाचा निवासी परिसर सील करण्यात आला. त्यापाठोपाठ आठवडाभराने आणखी रुग्ण सापडले. रुग्णाचा परिसर सील करुन सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करुन संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला. मूल रोड येथील वन अकादमीतील कोव्हिड केअर सेंटरच्या माध्यमातून आरोग्यसेवा कार्यान्वित झाली. दुसऱ्या लाटेत सैनिकी शाळा येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. याशिवाय कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी दूध डेअरी परिसरातील समाजकल्याण विभागाचे आदिवासी मुलींचे वसतिगृह आणि मुलांचे वसतिगृह येथे अनुक्रमे १८० आणि १२० खाटांची व्यवस्था, तसेच २५० खाटांच्या सुविधेसह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर महानगर पालिकेने सज्ज ठेवले.

२ लाख २८ हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या

शहरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात सहा आर.टी. पी.सी.आर. चाचणी केंद्र तर चार अँटीजेन चाचणी केंद्र सुरु केले. आजवर शहरात २ लाख २८ हजार ६०० रुग्णांची चाचणी करण्यात आली. यातील २ लाख २ हजार ९०२ जण निगेटिव्ह आलेत. उर्वरित २४ हजार ६०० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मनपा कोव्हीड केअर सेंटरसह खासगी रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत या सर्वावर उपचार झाले. आजघडीला यातील २२ हजार ९०२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

रुग्णांसाठी पौष्टिक आहार

वन अकादमीच्या इमारतीमधील कोविड सेंटर येथे मनपातर्फे उच्च दर्जाच्या सुविधा पुरविण्यात येत आहे. जेवणाची व्यवस्था उत्तम आहे. सैनिक स्कूल चंद्रपूर येथील सुसज्य इमारतीत कोविड केअर सेंटर उभारले आहे. येथे अनेकजण उपचार घेत आहे. येथील रुग्णांना वेळेवर पौष्टिक आहार देण्यात येते. सकाळी ८ वाजता नास्ता, सकाळी ११ वाजता जेवण, सायंकाळी ४ वाजता चहा, सायंकाळी ८ वाजता जेवण दिला जातो. नाश्त्यामध्ये कडधान्ये, पोहा, चना सोबतच दररोज विविध प्रकारचा नाश्ता व पौष्टिक आहार देण्यात येतो. येथे स्वच्छतेची नियमित काळजी घेण्यात येते.


स्वतंत्र ४५ खाटांचे कोव्हीड रुग्णालय
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेने स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरु केले. अवघ्या १५ दिवसात चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या 'आसरा' कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती झाली. सुसज्ज आणि सर्वसोयीयुक्त या रुग्णालयाचे लोकार्पण मंगळवार, दि. १८ मे रोजी झाले. डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट, वॉर्डबॉयची नियुक्ती झाली. आता प्रत्यक्ष रुग्णसेवेसाठी मनपाचे आसरा कोव्हिड रुग्णालय सज्ज झाले आहे. वातानुकूलित सुविधा, ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली. डॉक्टर, परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मेच्या पहिल्या आठवड्यात औषध साठा आणि वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा झाला. वृद्ध व गंभीर रुग्णांसाठी २ व्हीलचेअर आणि स्ट्रेचर ठेवण्यात आले आहे. उपचारासाठी एकूण नऊ डॉक्टर, ६ अधिपरिचारिका, ८ परिचारिका, २ फार्मासिस्ट, १ स्टोर अधिकारी. १ डेटा एंट्री ऑपरेटर, १५ वॉर्ड बॉय सेवेत रुजू झाले.

महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्या नेतृत्वात अवघ्या १५ दिवसात कोव्हिड रुग्णांना आसरा देण्यासाठी चंद्रपूरच्या जनतेसाठी सुसज्ज आणि सर्वसोयीयुक्त असे रुग्णालय उभे झाले. आता वैद्यकीय चमू रुग्णसेवेसाठी सज्ज आहे.
रुग्णसेवेसाठी २४ तास रुग्णवाहिका

आयसीआयसीआय बँकेने देखील सीएसआर फंडातून चंद्रपूर शहर महानगरपालिका रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि पीपीई किट भेट दिली. कोरोनासंसर्गासोबत ऑक्सिजची मागणी प्रचंड वाढली आहे. ज्यामुळे, ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासतोय. ही उणीव भरून काढण्यासाठी २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णालयांत आहेत. गंभीर रुग्णांना रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका २४ तास सेवेत राहणार आहे.
मृत्यू पावलेल्यांचे विधिवत अंत्यसंस्कार
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा अंतिमसंस्कार चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत केला जात आहे. पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर शिव मोक्षधाम स्मशानभूमीत गेल्या वर्षभरात कोरोनाबाधीतांच्या मृतदेहावर त्यांच्या धर्मातील प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. महानगरपालिकेमार्फत लाकूड, डिझेल, पीपीए किट, बॉडी कव्हर आणि अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य मोफत पुरविण्यात येते. प्रत्येक मृतकाचे अंत्यसंस्कार त्यांच्या धार्मिक विधीनुसार केले जाते. त्यानंतर अस्थी गोळा करून विसर्जनसाठी नातलगाना दिले जाते. जर नातलग उपस्थित नसतील तर अस्थी पिशवीत बांधून त्यावर चिट्ठी लावून ठेवली जाते. प्रत्येक अंत्यसंस्कार नंतर जागा स्वच्छ केली जाते. मुस्लिम, ख्रिश्चन बांधवांसाठी वेगळे वाहन पाठविण्यात येते. त्यांच्या विधीनुसार त्यांचा अंत्यविधी होतो. ही प्रक्रिया दररोज केली जाते.
लसीकरण अभियान

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हाच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. लसीकरणाची सुरुवात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीना पहिली तर, फ्रंटलाईन वर्करसह ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना पहिली व दुसरी लस दिली जात आहे. आतापर्यंत शहरात एकूण सुमारे ७४ हजार जणांनी लसीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतली. यात ६४ हजार कोविशिल्ड, तर १० हजार जणांनी कोव्हॅक्सीन लस घेतली. प्रारंभी आरोग्य सेवेतील व्यक्तींना लस देण्यात आली. त्यात ७ हजार ३४५ आरोग्य सेवकांना पहिला डोस, तर ४ हजार ६३६ जणांना दुसरा डोस देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलिस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ४ हजार ४१७ जणांना पहिला डोस व २ हजार ३७६ जणांना दुसरा डोस देण्यात आला. आरोग्य सेवक व फ्रंट लाईन वर्कर मिळून ९ हजार ११६ नोंदणीकृत लाभार्थ्यांना पहिला व दुसरा असे १८ हजार ७७४ डोस देण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक व ६० वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. आतापर्यंत २८ हजार ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस तर ९ हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. तसेच ११ हजार ३०५ व्याधीग्रस्त नागरिकांना पहिला डोस, तर २६०० जणांना दुसरा डोस देण्यात आला.

शासन निर्देशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २ मेपासून १८ ते ४४ वयोगातील व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी केंद्र निर्धारित करण्यात आले होते. यात ३ हजार जणांना कोविशिल्ड तर, दीड जणांना कोव्हॅक्सीन लस देण्यात आली.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
 

शहरातील सर्वच रस्त्यावर, बाजारपेठेत सोशल डिस्टंन्स राखण्यात कोणालाच भान राहत नाही. रस्त्यावर वाहनांची गर्दी, बाजारात लोकांची गर्दी बघायाला मिळायची. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलीसांच्या मदतीने गर्दी कमी करण्यासाठी लोकांमध्ये जागृती केली. कोव्हीड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक प्रतिष्ठानावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी कोरोना चाचणी केली जात आहे. या शिवाय विनामास्क फिरणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात आली.
स्वच्छतेची काळजी:
सध्या कोरोनाच्या संकटात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय ही धोकादायक ठरू शकते. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये २०० ऐवजी १२०० रुपये दंड आकारण्याच्या कारवाईला महानगरपालिकेने प्रारंभ केला. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. असे असतानाही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. विनामास्क फिरत असतात. सध्या कोरोनाचे संकट आहे. अशावेळी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कोव्हीडचे विषाणू हवेत पसरून रोगराई पसरण्याची भीती असते. कोरोना'चा फैलाव रोखण्यासाठीच्या नियमावलीत सोशल डिन्स्टन्सिंग राखणे, हात साबणाने वारंवार धुणे आणि मास्कचा वापर या अनिवार्य गोष्टी आहेत. मास्कमुळे विषाणूचा फैलाव नियंत्रणात येईल. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या लोकांच्या सवयीला आळा घालण्यासाठी आणि मास्कची सवय लावण्यासाठी आता चंद्रपूर महानगर पालिका कठोर पावले उचलली आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.