बाराभाटी परिसरातील शेतकरी धडकले आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयावर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० मे २०२१

बाराभाटी परिसरातील शेतकरी धडकले आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयावर

बाराभाटी परिसरातील शेतकरी धडकले आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयावर


धान खरेदी साठी अखेर संतप्त शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.20 मे:-
बाराभाटी परिसरातील रब्बी हंगामाची धान खरेदी करण्यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू व्हावे. या मागणीसाठी आज (दि.20 मे)येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर बाराभाटीपरिसरातील संतापाचा उद्रेक झालेल्या शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. बाराभाटी परिसरातील रब्बी हंगामामध्ये उत्पादित झालेला धान हा मळणी होऊन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. मधातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. काही शेतकऱ्यांच्या घरात अंगणात तर काहींच्या शेतात उघड्यावर पडून आहेत. शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होण्याची गेल्या महिन्याभरापासून वाट बघत आहे. अवकाळी पावसाचे वातावरण आहे.त्यामुळे शेतकरी नुकसानीच्या भीतीने चिंताग्रस्त झाले आहेत. अशातच शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. त्याचचीच परिणीती संतापाच्या उद्रेकाने आंदोलनाच्या रूपाने पहायला मिळत आहे. परंतु भरडाईच्या प्रश्नावर तोडगा काढून लवकरात लवकर रब्बी हंगामातील पिकांची खरेदी लवकरात लवकर कशी सुरु करता येईल. याकडे शासनस्तरावर विलंब होत असल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. परंतु भरडाई च्या प्रश्नावरून राईस मिलर्स खरीप हंगामातील गोदामात साठवून ठेवलेला धान उचल करत नसल्यामुळे गोदामे हाऊसफुल असल्यामुळे, धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होत आहे. गेल्या महिन्याभरापासून धान मळणी होऊन पडून आहे. मात्र आधारभूत धान खरेदी केंद्र आदिवासी विकास सहकारी संस्था बाराभाटी येथे सुरु न झाल्यामुळे, शेतकऱ्यांचा संताप अनावर होत आहे. त्याची परिणीती म्हणून आज 20 मे रोज गुरुवारला बाराभाटी येथील शेतकऱ्यांनी सकाळी 11 वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलनाच्या तयारीत बाराभाटी परिसरातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर धानाची पोते भरून आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयाकडे
येत होते. कार्यालया पासून थोड्या अंतरावर अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ ठाणेदार जनार्दन हेगडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कार्यालयाकडे जाणारे ट्रॅक्टर अडवले. त्यामुळे शेतकरी आणखी संतप्त झाले. संचार बंदी सुरू असल्यामुळे व कोरोना काळात गर्दी करणे उचित नसल्यामुळे आपणास आंदोलन करता येणार नाही. अशी समजूत त्यांनी शेतकऱ्यांची घातली. त्यामुळे शेतकऱ्यांचे तीन प्रतिनिधी यांनी उपप्रादेशिक व्यवस्थापकांची भेट घ्यावी व चर्चा करावी. अशी अनुमती त्यांनी शेतकऱ्यांना दिली. त्यानुसार माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, भोजराज बेलखोडे उपसरपंच बाराभाटी, लैलेश शिवणकर उपाध्यक्ष सहकारी संस्था, बबरु भंडारी माजी सरपंच कुंभीटोला यांच्या शिष्टमंडळाने उपप्रादेशिक व्यवस्थापक गणेश सावळे यांच्याशी चर्चा केली. भरडईसाठी धान्याची उचल झाली नाही. सर्व गोदामे हाऊसफुल्ल आहेत. व शासनाचे अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश नाही. उघड्यावर धानाची खरेदी करता येणार नाही. त्यामुळे धान्य खरेदीची कुठली व्यवस्था आपण करू शकत नाही. आपल्या भावना आपण शासन स्तरावर वरिष्ठांना कळवू त्यांचे आदेश आले की लवकरात लवकर खरेदी केंद्र कसे सुरु करता येईल, यासाठी आपण प्रयत्नशील राहू. परंतु ताबडतोब धान खरेदी केंद्र सुरू करण्यास असमर्थता त्यांनी व्यक्त केली. तर आधारभूत धान खरेदी केंद्राच्या समोर असलेल्या जागेवर धान खरेदी केंद्र सुरू करावे व त्वरित भरडाई साठी (डीओ)धान उचलण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी संतप्त शेतकरी करीत होते. आपल्या तीव्र भावना आपण शासनास निश्चित कळवू असे आश्वासन दिले. परंतु संतप्त शेतकरी हे मान्य करायला तयार नसल्यामुळे व रस्ता रोको आंदोलन करणारच असा निश्चय करुन चर्चेअंती संतप्त शेतकरी कार्यालयाबाहेर अर्जुनीमोरगाव- कोहमारा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याच्या तयारीत असतानाच उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी जालंदर नालकुल, अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव तोंदले, ठाणेदार हेगडकर यांनी, कोरोना ची परिस्थिती व संचारबंदी नियम लागू असल्यामुळे आपले आंदोलन करणे उचित होणार नाही. यासाठी शेतकऱ्यांची समजूत घातली. त्यांची शिष्टाई यशस्वी झाली. शेतकऱ्यांनी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयापुढे रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय मागे घेऊन,उपप्रादेशिक व्यवस्थापक सावळे यांना निवेदन देऊन,कार्यालयासमोर धानाची पोती रिकामे करून, भोजराज तुळशीराम बेलखोडे, तेजराम डोंगरवार,भारत बेलखोडे,किशोर येरणे,सुखराम हातझाडे,आनंदराव डोंगरवार,बबरु भंडारी,शीसुपाल बेलखोडे,महादेव प्रधान सरपंच बाराभाटी यांनी खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन न मिळाल्यामुळे, आम्हाला न्याय न मिळाल्यामुळे शेवटी आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयापुढे ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र रूप धारण करू नये, आंदोलन चिघळू नये व काही अनुचित घडू नये तसेच कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला होता. देवरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जालंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर, अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार महादेव तोंदले, पोलीस उपनिरीक्षक अशपाक शेख, पोलीस उपनिरीक्षक माने देवरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांढरे डुग्गीपार, यांच्यासह 75 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आंदोलनस्थळी करण्यात आला होता.नवेगावबांध पोलीस ठाणे यांच्या वतीने अर्जुनी मोरगाव, देवरी, डुग्गीपार येथील पोलीस कर्मचारी व गोंदिया येथून दंगा नियंत्रण पथकाचे दोन गट बंदोबस्तासाठी मागविण्यात आले होते.