'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून 'म्युकरमायकोसिस' आजाराबाबत तज्ज्ञ करणार मार्गदर्शन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२८ मे २०२१

'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून 'म्युकरमायकोसिस' आजाराबाबत तज्ज्ञ करणार मार्गदर्शन

'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून 'म्युकरमायकोसिस' आजाराबाबत तज्ज्ञ करणार मार्गदर्शन
चंद्रपूर मनपाचा अभिनव उपक्रम

चंद्रपूर, ता. २७: महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून "चला करूया विविध विषयांवर 'संवाद'" या कार्यक्रमाअंतर्गत 'म्युकरमायकोसिस' आजारासंबंधी घ्यावयाची काळजी, लक्षणे आणि उपाय या विषयावर शुक्रवार, दि. २८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर ( @CMCchandrapur ) तज्ज्ञ संवाद साधणार आहेत.

सध्या राज्यात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. हा आजार अतिशय वेगाने पसरत असल्यामुळे या आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यामुळे महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून 'संवाद' कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांच्या मनातील शंका, भीती दूर करून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा तज्ज्ञांमार्फत दिली जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकांनी शुक्रवार, २८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता मनपाच्या अधिकृत फेसबुक पेज (@CMC chandrapur) ला भेट देऊन 'संवाद' या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आपल्या मनातील शंकाचे निरसन करा, असे आवाहन महापौरांनी नागरिकांना केले आहे.

शुक्रवारी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, फिजिशियन तथा मधुमेह तज्ज्ञ डॉ. अविष्कार खंडारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी तथा कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. वर्षा गट्टानी तसेच मुखरोग तज्ज्ञ आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी (म्युकरमायकोसिस) डॉ. आकाश कासटवार मार्गदर्शन करणार आहेत.