लसीकरण केंद्रावर गर्दी न करता शिस्तीचे पालन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ मे २०२१

लसीकरण केंद्रावर गर्दी न करता शिस्तीचे पालन

 लसीकरण केंद्रावर गर्दी न करता शिस्तीचे पालन करा

जबाबदारीचे भान ठेवूया, कोरोनाला हरवूया
चंद्रपूर, ता. २९ : चंद्रपूर शहर महापालिकेच्या वतीने 45 वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. यासाठी मनपाचे आरोग्य कर्मचारी एकही सुट्टी न घेता सेवा देत आहेत. परंतु, शहरातील काही लसीकरण केंद्रावर नागिरक शिस्तीचे पालन न करता गर्दी करताना दिसत आहेत. यासाठी
नागरिकांनी केंद्रावर गर्दी न करता कोरोना नियमावलीचे पालन तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरण अभियान राबविले जात आहे. शहरातील नागरिकांना लस देण्यासाठी चंद्रपूर शहर महापालिका कार्य करीत आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शहरातील विविध भागात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. लसीच्या उपलब्धतेनुसार लस दिली जात आहे.

लस प्रत्येक पात्र लाभार्थ्यांला दिली जाणार आहे. मात्र, काही केंद्रावर वारंवार सूचना देऊनही काही नागरिक शिस्तीचे पालन करताना दिसत नाही आहेत. तसेच काही नागरीक विनाकारण आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. तेथील सुरक्षा रक्षकाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. गर्दी करून आपणच कोरोनाला निमंत्रण देत आहोत, हे लक्षात ठेवून नागरिकांनी जबाबदारीने सुरक्षित अंतर राखून रांगेत उभे राहावे, असेही आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

तसेच कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावे, सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.