भेंडवळची घटमांडणीची भविष्यवाणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ मे २०२१

भेंडवळची घटमांडणीची भविष्यवाणी

भेंडवळची घटमांडणीची भविष्यवाणी : पाऊस, पिक परिस्थिती, कोरोनाचे संकट, राजकारणासह अनेक गोष्‍टींवर भाकितं


दि १५ मे २०२१
बुलढाणा: सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेली भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी आज (शनिवार) पहाटे सहा वाजता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराजांनी जाहिर केली. घटमांडणीच्या भ‌विष्यवाणीनुसार यावर्षी पाऊस कमी राहणार असला, तरी पिक परिस्थिती मात्र चांगली राहणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रोगराईचा सामना करावा लागणार असल्याने कोरोनाचे संकट कायम राहणार आहे. राजकीय परिस्थितीवर केलेल्या भाकितानुसार राजा कायम राहणार असून संकटांचा सामना मात्र करावा लागणार आहे. दुसरे पृथ्वीवर अनेक संकटे येणार असून राजाला त्याचा सामना करावा लागणार आहे.

मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा घटमांडणी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडली. त्याचे भाकित आज सकाळी जाहिर करण्यात आले. यावर्षी सार्वत्रिक पाऊस होणार नाही. जुलै महिन्यात मात्र सार्वत्रिक व चांगला पाऊस पडेल. या महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचे संकेत आहेत. तर ऑगस्ट महिन्यात जून-जुलै पेक्षा कमी पाऊस पडेल. सप्टेंबर महिन्यात सर्वात कमी पाऊस राहील. काही ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थितीचाही सामना करावा लागणार आहे. एकंदरीत पिक परिस्थिती चांगली राहील असा अंदाज आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पशुपालकांना चाराटंचाईचा सामना करावा लागणार आहे.घटमांडणीच्या भाकितानुसार यावर्षी पृथ्वीवर अनेक संकटे येतील. यामध्ये नैसर्गिक संकटाचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. परकीय घुसखोरी, रोगराई, अतिवृष्टीचा सामना करावा लागणार आहे.देशाचा राजा कायम राहील मात्र त्याला प्रचंड संकटाचा सामना करावा लागणार आहे. आर्थीक परिस्थिती, नैसर्गीक संकटांचा संकटांमुळे देशाची मोठ्या प्रमाणात हानी होईल. जिवीत हानी होणार असल्याने अनेकांना दु:खाचा सामना करावा लागणार आहे.

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498