कोल्हापूरचे- शिवालय- कैलासगडाची स्वारी मंदिर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० मे २०२१

कोल्हापूरचे- शिवालय- कैलासगडाची स्वारी मंदिर

 कोल्हापूरचे- शिवालय- कैलासगडाची स्वारी  मंदिर {दि. २० मे २०२१}

फेसबुक लिंक http://bit.ly/3ovdxAu
। शिवसूर्याचे दर्शन घ्यावे. सतत तयाचे मनन करावे, देव, देश अन् धर्माकारणे ।।
कोल्हापूरात अनेक मंदिरे आहेत,किंबहुना मंदिराचे शहर म्हणालात तरी चालेल,एवढी मंदिरे कोल्हापुरात आहेत.आवर्जून भेट द्यावी असं मंदिर म्हणजे कैलासगडाची स्वारी मंदिर. खासबाग मैदान (शाहु मैदान)जवळील भव्यदिव्य पाषाणच्या देखण्या कमानीमुळे लक्ष वेधून घेते. 
अंबाबाई मंदिर आणि खासबागे जवळील भोसले गल्लीत हे शिवालय आहे

कोल्हापूरचे- शिवालय- कैलासगडाची स्वारी  मंदिर

गल्लीच्या तोंडावर भव्यदिव्य पाषाणाची देखणी कमान असून त्यातून प्रवेश केल्यावर छोटय़ा बोळातून दुतर्फा असलेली घरे ओलांडून आपण या शिवालयासमोर पोहोचतो. या शिवालयाला ‘कैलासगडाची स्वारी’ हे नाव आहे. पुरातन मंदिर विचारे आणि जाधव कुटुंबीयांनी दिलेल्या जागेवर
१९७२ मध्ये मंदिराचा विस्तार वाढवून जिर्णोध्दार केलेला आहे. जिर्णोध्दार करताना मंदिर कलात्मकतेने नटवल्याने सध्य स्थितीतील हे मंदिर म्हणजे ऐतिहासिक, पौराणीक आणि आधुनिक कलेचा त्रिवेणी संगम म्हणावा लागेल. मंदिर उभारताना ज्योतिबा डोंगर येथील काळा पाषाण वापरून कलाकुसर केलेली आहे.
मंदिराच्या दक्षिणेकडे भव्यदिव्य अशी जांभ्या दगडाची कमान आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन दीड टन वजनाचे, दीपस्तंभ आहेत. सदर दीपस्तंभ सायंकाळी (२२ फूट उंचीचे पितळी) रोषणाईने प्रज्वलित केले जातात. अशा या (भव्यदिव्य) दीपमाळा गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये जाण्यासाठी संस्थेने प्रयत्न केले असून लवकरच त्याचे प्रमाणपत्र अपेक्षित आहे. मंदिराच्या डाव्या व उजव्या बाजूस ब्राँझच्या सूर्य आणि चंद्राच्या कलाकृती आहेत.            


मध्यभागी कीर्तीमुख असून शिवाची सत्यम्, शिवम्, सुंदरम् ही वचने संगमरवरी पाषाणात कोरलेली आहेत. मंदिरासमोर एक टन वजनाचा पितळी नंदी विराजमान असून त्याच्यावर आकर्षक कलाकुसर केलेली आहे.मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस जय–विजय यांच्या सुबक मूर्ती आहेत. प्रवेशद्वारावर मध्यभागी कमळामध्ये संगमरवरावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या दोन्ही बाजूंस दगडी पाषाणात बेलाची पाने, शंख कोरलेले आहेत. मुख्य दरवाजावर धनुष्यबाणाची कमान असून चौकटीमध्ये नागराज व सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या गाभाऱयावर संगमरवरी शिखर असून त्यावर सोन्याचा कळस आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस नगारखाना व डाव्या बाजूस वादनगृह आहे. त्यात घंटा व डमरू आहेत. दोघांच्या घुमटांवर सोनेरी कळस बसविलेले आहेत.


मंदिराच्या गाभाऱयात शिवलिंग असून चांदीच्या गणेश, भवानीदेवी, हनुमान, नंदी, शेषनाग अशा मूर्ती आहेत. स्वारींची सोन्याची व चांदीची काठी, चांदीच्या पादुका, पाट, त्रिशूल व राजदंड आहे.
मंदिराचे खास आकर्षण व वैशिष्टय़ म्हणजे यात आपणांस भावतील व आवडतील अशी कलायोगी  जी.कांबळे यांची भव्य पेंटिग्ज एक शिवराज्याभिषेकाचे, दुसरे रायगडावरील शिवसमाधीचे आणि तिसरे महाराजांचे भव्य तैलचित्र. सुरत लुटीच्या वेळी डच चित्रकाराने काढलेल्या मूळ चित्रावरून कलायोगी कांबळी यांनी हे तैत्रचित्र तयार केले आहे. मूळ चित्र हॉलंडमध्ये आहे. कलायोगी कांबळेच्या तैलचित्रातील राजे बोलक्या पण भेदक डोळय़ाचे, मराठमोळय़ा पेहरावाचे, गळय़ात मोजके दागिने आणि कवडय़ांची माळ घातलेले आहेत. त्यांच्या जिरेटोपाला, मोर, गरुड आणि हंसाची पिसे आहेत. १९७० साली मंदिराने या चित्राची एक प्रत शासनास बहाल केली. ती शासनदरबारी मान्यता पावली आणि पुढे याच चित्रावरून छत्रपती शिवरायांची चित्रे तयार झाली आणि ती जगभरात पोहोचली. शिवसमाधीचे चित्रही वैशिष्टय़पूर्ण असून शंभू महादेव जगदीश्वराच्या मंदिरासमोर शिवसमाधी आहे. त्यावर मेघडंबरी नसून मावळत्या सूर्याची किरणे समाधीवर पडली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची श्रीमंती आणि मराठी दौलतीचा थाट दाखणारे शिवराज्याभिषेकाचे तैलचित्र मंदिरात आहे.
याव्यतिरिक्त तांडवनृत्य करणारा आणि ध्यानस्त महादेव, श्रीगणेश नृत्य व सरस्वती वीणावादन, कुरुक्षेत्रावर अर्जुनाला उपदेश करणारा श्रीकृष्ण अशी भव्य तैलचित्रं आहेत. मंदिराच्या मध्यभागी सुंदर झुंबर आहे. महाशिवरात्र, हुताशनी पौर्णिमा, रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी हे इथले मुख्य उत्सव.
मन प्रसन्न करणाऱया व शिवकाळात घेऊन जाणाऱया या शिवालयास आवर्जून जाऊन या
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
||~ माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  ~||      
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi