अहिल्याबाई होळकर - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

सोमवार, मे ३१, २०२१

अहिल्याबाई होळकर

 अहिल्याबाई होळकर  

-

फेसबुक लिंक http://bit.ly/3p5ZO3B
 होळकर घराण्यातील अहिल्याबाईंचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. अहिल्याबाईंना ‘पुण्यश्लोक’ असेही म्हणतात. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे.इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे. त्या अहिल्याबाईंचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गाव आहे.

अहिल्याबाई होळकर

अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला.
🇦अहिल्याबाईंमधील हे गुण  पाहून मल्हारराव होळकर एवढे प्रभावित झाले कि त्यांनी त्वरित माणकोजी शिन्देंकडे आपला पुत्र खंडेराव होळकर यांच्यासाठी अहिल्येला मागणी घातली. त्यानंतर १७३३ साली वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह मल्हारराव होळकर चा पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी संपन्न झाला. आणि अश्या तऱ्हेने बालवयातच अहिल्याबाई मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध अश्या होळकर कुटुंबाच्या सुनबाई झाल्या.

लग्नानंतर काही वर्षांनी म्हणजे १७४५ साली अहिल्याबाईंना पुत्रप्राप्ती झाली, त्याचे नाव मालेराव. पुढे तीन वर्षांनी म्हणजे १७४८ ला मुक्ताबाई नावाची सुंदर कन्या झाली. अहिल्याबाई राज्यकारभारात आपल्या पतीला मदत करीत असत, शिवाय त्यांच्यातील युद्ध आणि सैन्य कौशल्य उत्कृष्ट होण्यासाठी त्यांना सतत प्रोत्साहित देखील करीत असत.
१७५४ साली जेंव्हा अहिल्याबाई फक्त २१ वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांच्या पतीला खंडेराव होळकरांना कुंभेर येथील युद्धात वीरमरण प्राप्त झाले.इतिहासकारांच्या मते आपल्या पतीवर अत्यंत प्रेम करणाऱ्या अहिल्याबाईंनी पती निधनानंतर सती जाण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांचे सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांना असे करण्यापासून रोखले. पुढे १७६६ साली मल्हारराव होळकरांचे देखील निधन झाले.पुढे मावळ प्रांताची जवाबदारी अहिल्याबाईंच्या नेतृत्वात त्यांचे चिरंजीव मालेराव होळकर यांनी आपल्या हातात घेतली. राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये १७६७ साली मालेरावांचा देखील मृत्यू झाला.
अहिल्याबाईंवर आभाळ कोसळलं. पती, तरुण मुलगा, वडिलांप्रमाणे असलेले सासरे यांच्या मृत्यू पश्चात अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार सांभाळला ते केवळ कौतुकास्पदच नव्हे तर आदर्श घेण्यासारखेच आहे.
११ डिसेंबर १७६७ रोजी त्यांनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हाती घेतली.
इतिहासातील सर्वात पराक्रमी आणि कुशल योद्धा महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी माळवा प्रांताची सूत्र हाती घेतल्यावर मल्हाररावांचे दत्तक पुत्र आणि सगळ्यात विश्वासू सुभेदार तुकोजीराव होळकर यांना सैन्याचा प्रधान सेनापती म्हणून नियुक्त केलं.आपल्या कार्यकाळात अहिल्याबाईंनी अनेकदा युद्धात प्रभावशाली रणनीती आखत सैन्याचे कुशल नेतृत्व केले.
आपल्या प्रजेच्या रक्षणार्थ अहिल्याबाई सतत तत्पर रहात असत. युद्ध प्रसंगी हत्तीवर स्वार होऊन अहिल्याबाई पराक्रमी योध्याप्रमाणे शत्रूवर बाण चालवीत असत.
ह्युआंन त्संग आणि संत नामदेव यांच्यानंतर अहिल्याबाईंएवढे भारतभ्रमण कोणीही केले नसावे. द्वारका, रामेश्वरम, बद्रीनारायण, सोमनाथ, अयोध्या, जगन्नाथ पुरी, काशी, गया, मथुरा, हरिद्वार, सारख्या अनेक मंदिरांचा अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केला व त्या ठिकाणी अनेक धर्मशाळा उभारल्या. याशिवाय बनारस येथे अन्नपूर्णा मंदिर, गया येथे विष्णू मंदिर बनविले. अहिल्याबाई होळकरांनी आपल्या शासनकाळात कलकत्ता ते बनारस या रस्त्याची निर्मिती केली…अनेक विहिरींचे निर्माणकार्य केले…घाट बांधले…रस्ते-मार्ग बनविले.
अहिल्याबाई होळकर या दानशूर आणि उदार शासक होत्या, त्यांच्यात दया, करुणा, परोपकाराची भावना ओतप्रोत भरलेली होती आणि म्हणूनच आपल्या शासनकाळात गरिबांकरता व भुकेलेल्यांसाठी त्यांनी अनेक अन्नछत्र उघडलीत…पाण्याकरता अनेक पाणपोया स्थापन केल्या.अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार? ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली.
आपल्या प्रजेच्या हितासाठी सतत कार्य करणाऱ्या आदर्श शासक अहिल्याबाई होळकर यांना १३ ऑगस्ट १७९५ साली प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे निधन झाले. परंतु त्यांच्यातील उदारता… त्यांनी समाजाकरता केलेली असंख्य कार्य… यामुळे त्या आजही सगळ्यांच्या स्मरणात आहेत आणि यापुढेही राहतील.अहिल्याबाईंनी मल्हाररावांचा निर्णय सार्थ ठरविला व होळकर घराण्याची कीर्ती सर्वदूर पोहोचविली.

               ✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9890875498 ✺
                  ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------❍--------------------