कुकडी नदी जवळचे 'रांजणखळगे,एक नैसर्गिक चमत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

११ मे २०२१

कुकडी नदी जवळचे 'रांजणखळगे,एक नैसर्गिक चमत्कार

 कुकडी नदी जवळचे 'रांजणखळगे,एक नैसर्गिक चमत्कार 

फेसबुक लिंक http://bit.ly/3y200EY
निसर्गात अनेक आश्चर्य ठासुन भरलेली आहेत,फक्त आपल्याला ती पाहायला आवड व सवड हवी.पुणे व नगर जिल्ह्यात शिरूर व पारनेर तालुक्याच्या सरहद्दी वरून कुकडी नदी वाहते. या कुकडी नदीवरच रांजण खळग्याच्या रूपात निसर्गाचा अनोखा आविष्कार पाहायला मिळतो.
नगरवरून याठिकाणी यायचे असेल, तर निघोज गावात यावे आणि पुण्यावरून यायचे असेल, तर शिरुरमार्गे टाकळी हाजी गावात यावे. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरच हे ठिकाण आहे. नदीत असणाऱ्या बेसॉल्ट खडकात रांजणाच्या आकाराचे प्रचंडमोठे खळगे पडले आहेत. त्यामुळेच या ठिकाणाला रांजणखळगे म्हटले जाते.रांजणखळगे, हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजणखळग्यांची निर्मिती होते. नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक असू शकतात. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रियेमुळे नदीच्या पात्रात रांजणखळगे तयार होतात. काही रांजणखळगे इतके जवळ आहेत, की त्यांच्या भिंती एकमेकांत मिसळून गेल्या आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे रांजण खळगे आहेत.परंतु असे असंख्य रांजणखळगे कोठेही नाहीत. या ऐतिहासिक रांजणखळग्यांची नोंद "गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस' मध्ये सुद्धा करण्यात आली आहे.हा नैसर्गिक चमत्कार पाहण्यासाठी अनेक पर्यटक, अभ्यासक येथे येतात. नदीच्या काठावरच मळगंगा देवीचे मंदिर आहे. त्यामुळे भाविकांचीही येथे गर्दी असते. हे रांजणखळगे व्यवस्थित पाहायचे असतील, तर उन्हाळ्यात याठिकाणी यावे. रांजण खळग्यातून पाणी वाहताना ते वळणदार गिरकी घेत घेत वाहते. नक्षीदार पाण्याचे दृश्य पाहायचे असेल, तर मात्र पावसाळ्यात येथे अवश्य यावे. मंदिराच्या समोर एक कुंड आहे. त्यात बाराही महिने पाणी असते. नदीच्या एका काठावर शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथे थोरली मळगंगा, तर दुसऱ्या बाजूला नगर जिल्ह्यात निघोज जवळ धाकटी मळगंगा, अशी दोन मंदिरे आहेत. नदीवर पर्यटकांच्या आकर्षणासाठी झुलता पूल बांधला आहे.

कुकडी नदी जवळचे 'रांजणखळगे,एक नैसर्गिक चमत्कार

एकवेळ अवश्य पहावे असे हे ठिकाण आहे.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498