मारसिंह (कार. १०५०–७५) याच्या ताम्र पटात द्वितीय जतिगाचा मुलगा व उत्तराधिकारी गोंक याचे वर्णन असून तो करहाटक, कुण्डी, मिरिज देश यांचा अधिपती असल्याचा उल्लेख आहे. गोंकानंतर त्याचा मुलगा मारसिंह गादीवर आला. त्यावरून शिलाहारांची आरंभीची राजधानी करहाटक असावी.
शिलाहारवंशी राजकन्या चंद्रलेखा हिच्या चालुक्य राजा सहाव्या विक्रमादित्या बरोबरच्या करहाटक येथील स्वयंवराचे वर्णन बिल्हणाच्या विक्रमांकदेव चरितात आहे. तिच्या पित्याचे नाव करहाटपती असे त्यात आले आहे. राजा मारसिंह हा तिचा पिता असावा. या शाही विवाहानंतर शिलाहारांनी आपली राजधानी करहाटकहून कोल्हापुरास हलविली असे दिसते तथापि करहाटक येथे चालुक्य राजपुत्र मल्लिकार्जुन (चंद्रलेखेचा पुत्र) आणि सहाव्या विक्रमादित्याचा मांडलिक जोगम हे काही वर्षे राज्य करीत होते, असे कोरीव लेखांत उल्लेख आढळतात. कोल्हापूर व त्याच्या आसमंतात सापडलेल्या अनेक कोरीव लेखांत व वाङ्मयातही त्यांचा उल्लेख ‘करहाटाधिपती’ असाच आढळतो. शिलाहार वंशातील दुसरा भोज (कार. ११७५–१२१२) हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात १०–१२ किल्ले बांधले. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), चंदन-वंदन वगैरे काही प्रसिद्घ किल्ले होत. यादव राजा सिंघण (कार. १२१०–४६) याने भोजाचा पराभव केला. त्यानंतर हा प्रदेश यादवांच्या आधिपत्याखाली आला. या काळातील कोरीव लेखांत या प्रदेशाविषयी उल्लेख नाहीत. मात्र यादव वास्तुशिल्प शैलीतील मंदिरे फलटण (जबरेश्वर), परळी (शिवमंदिर व वीरगळ), कातरखटाव (कातरेश्वर), देऊर (विठ्ठल-रुक्मिणी), खटाव (नागनाथ), किकली (भैरवनाथ), शिंगणापूर (महादेव) इ. ठिकाणी आहेत. यांपैकी किकलीच्या भैरवनाथ मंदिरासमोर एक अस्पष्ट कोरीव लेख असून त्यातील ‘सिंघणदेव’ ही पुसट अक्षरे यादव वंशाच्या आधिपत्याचा निर्देश दर्शवितात.शिंगणापूरची स्थापना शिंगणराजे यादव (सन १२१० - ४७) या राजाने केली म्हणून यास शिंगणापूर हे नाव दिले आहे. इथल्या डोंगरमाथ्यावर एखाद्या शिरपेचाप्रमाणे शोभणारे शंभू महादेवाचे मंदिर हे माणदेशात सर्वात उंच ठिकाणी वसलेले तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते. हे देवस्थान अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते.
यादवांच्या पतनानंतर (१३१८) दक्षिण हिंदुस्थानात राजकीय अनागोंदी होती. बहमनी सत्तेखाली (१३४७–१५३८) गुलबर्गा तरफाचा सातारा भाग होता. कोकण भाग वगळता अन्य प्रदेश बहमनी साम्राज्यात होता. मुहंदशाह बहमनी (कार. १३५८–७५) याने खुद्द सातारा किल्ल्याची डागडुजी करून परिसरात अनेक किल्ले बांधून संरक्षण व्यवस्था भक्कम केली. या काळात वाई व माण ही दोन प्रमुख लष्करी ठाणी होती. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर हा प्रदेश आदिलशाही अंमलाखाली आला. याकाळात जावळीचे चंद्रराव मोरे, फलटणचे राव नाईक निंबाळकर, मलवडीचे झुंझारराव घाटगे, म्हसवडचे माने आदी मातब्बर मराठा मांडलिक घराणी वंशपरंपरेने आपल्या जहागिरीच्या ठिकाणी कार्यरत होती. त्यांच्या जीवावरच आदिलशाही सत्ता कोकणात स्थिरावली आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी आपली सत्ता दृढतर केली. याचकाळात छ.शिवाजी महाराजांनी जावळी व परिसर पादाक्रांत करून (१६५६) रायरी (रायगड) घेतला आणि पुढे अफजलखानाचा निःपात करून (१६५९) वाई देश जिंकला. शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंत व नंतरही किरकोळ अपवाद सोडता सातारा किल्ला व त्याचा परिसर मराठ्यांच्या अंमलाखाली होता. पुढे छ.राजारामांनी सातारा ही मराठ्यां ची राजधानी केली. औरंगजेबाने सातारा-परळी किल्ल्यांसह बराच भाग मोगल सत्तेखाली आणला (१६९९). त्याच्या मृत्युनंतर (१७०७) तो छ. शाहूंच्या अखत्यारीत आला आणि सातारा संस्थानची निर्मिती झाली.प्रतापसिंह भोसले (कार. १८०८–३९) यांच्या कारकीर्दीत सातारा शहर व जिल्ह्यात अनेक सुधारणा झाल्या. हा प्रदेश पेशवाईच्या अस्तापर्यंत (१८१८) मराठी सत्तेखाली होता पुढे सुरूवातीस बिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे त्यावर वर्चस्व होते. नंतर तो अव्वल इंग्रजी अंमलाखाली भारत स्वतंत्र होईपर्यंत होता. माण तालुक्यात अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर (महाराष्ट्राचे कुलदैवत), दहिवडी (श्री काशीपाते निलकंठ महाराज), जांभूळणी येथील श्री भोजलिंग व जोगेश्वरी मदिंर मोही (श्री महालक्ष्मी मंदिर), भवानी आई मंदिर (मार्डी), गोंदवले (श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज), वारुगड, म्हसवड (श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी मंदिर ) मलवडी (खंडोबा, श्री महंत शांतिगिरीजी महाराज), पांगरी (बिरोबा, सतोबा),बिजवडी , कुलकजाई (सीताबाई मंदिर), किरकसल (श्री नाथ मंदिर), कुकुडवाड (महादेव मंदिर), मंकलेश्वर (धुलोबा) मंदिर धुळदेव, नागोबा मंदिर विरकरवाडी इत्यादी. आसपास वारुळगड, महिमानगड व वर्धनगड हे काही किल्ले आहेत.