किल्ले विलासगड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०२ मे २०२१

किल्ले विलासगड

                                                                                                                           


किल्ले विलासगड  
   ____________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_____________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/3e8fhvS
पुणे-कोल्हापूर महामार्गावर कराड नंतर पूर्वेकडे विलासगड हा एक दुर्लक्षित किल्ला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणारा हा किल्ला डोंगरावरील मल्लिकार्जुन मंदिरामुळे मल्लिकार्जुनगड म्हणूनच ओळखला जातो.पेठवडगाव पासुन विलासगड २५ किमी वर आहे. 

किल्ले विलासगड
                                                                                                 इतिहास:-                                                                                ऐतिहासीक कागदपत्रामध्ये काही किल्ल्यांचा फक्त नामोल्लेख आढळतो; विलासगड त्यापैकीच एक किल्ला. हा किल्ला नेमका कोणी बांधला हे ज्ञात नाही पण साधारण १७१७ च्या सुमारास याचा उल्लेख काही कागदपत्रात सापडतो.. मोघल व छत्रपती शाहु यांच्यात सन १७१७-१८ मधील करारानुसार दिलेले सुभे व त्यातील किल्ल्यांच्या यादीमधे विलासगडाचा उल्लेख आढळतो.
काय पहाल                                             
या किल्ल्यावर किल्ला म्हणून असणारे तटबंदी, बुरुज व दरवाजे असे कोणतेही अवशेष नसले तरीही हा गड पाहण्या सारखा आहे ते त्यावरील एक दोन जुन्या वास्तू व मल्लिकार्जुन मंदिराच्या सहा पुरातन लेण्यांमुळे.डांबरी रस्ता संपला कि गडमाथ्यावर जाण्यासाठी प्रथम काही बांधीव पायऱ्या आहेत तर नंतर चक्क खडकात खोदून तयार केलेल्या एकसंध पायऱ्यांचा मार्ग आहे.या खडकातील एकसंध पायऱ्या पाहून मन थक्क होत आणि इथेच या डोंगराच्या प्राचीनत्वाची साक्ष मिळते. पायऱ्यांची हि नागमोडी वाट साधारण अर्धा ते पाउन तासात आपल्याला गडाच्या थोडे खाली असणाऱ्या मल्लिकार्जुन मंदिराच्या तटबंदीपाशी घेऊन जाते.
मंदिराच्या तटबंदीपाशी आल्यावर प्रथम उजव्या बाजूस मंदिरापासून थोड्या वेगळ्या असणाऱ्या दोन ओवऱ्या पहाव्यात व नंतर मंदिराकडे जावे. मल्लिकार्जुन मंदिर आवाराला तटबंदी आहे व याच तटबंदीत नगारखाना असलेले एक प्रवेशद्वार आहे. आत आल्यावर मुख्य दरवाज्यासमोर एक मंदिर आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूस एक ओवारी आहे व त्याला दरवाजा आहे. या दरवाज्या मधून आत गेल्यावर कळते कि येथे दोन प्रचंड मोठाल्या लेण्या खोदलेल्या आहेत. या लेण्यांचा भार तोलुन धरण्यासाठी दोन खांब आहेत व त्यापैकी एकावर थोडे जुने नक्षीकाम आढळते. या लेण्यांना लागुनच येथील मुख्य मल्लिकार्जुनाचे मंदिर असून त्याचा दर्शनी भाग हेमाडपंती पद्धतीने बांधलेला आहे. हे मुख्य मंदिर म्हणजे एक मोठे लेणेच आहे ज्यामध्ये सहा कोरीव खांब आहेत. या खाबांच्या छताजवळ उलटा कुंभ कोरलेला आहे. या मोठ्या लेण्यामध्ये आत एक छोटा विहार असून तेथेच शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. या मोठ्या लेण्यात अजून दोन तीन छोटे विहार आहेत. मंदिराच्या प्रांगणामध्ये एक मोठी दीपमाळ, तुळशी वृंदावन व एक स्तंभ आहे. मंदिर परिसर स्वच्छ ठेवलेला असला तरी रंगरंगोटीमुळे जुने कोरीवकाम नष्ट होत आहे.
मंदिर तटबंदीच्या बाहेर डाव्या बाजूने गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी काही पायऱ्या आहेत. याच पायऱ्यांच्या जवळ चुन्याच्या घाण्याचे एक चाक अर्धे जमिनीत गाडलेले दिसते. येथून अगदी १० मिनिटात आपण गडाच्या भग्न दरवाज्यातून माथ्यावर पोहोचतो. गड माथ्यावर एक जुनी व एक नवीन मशीद आहे. जुन्या मशिदीमध्ये चक्क विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती दिसतात.कोणत्याही गडावर विठ्ठल रखुमाईचे मंदिर आढळून येत नाही पण विलासगडावर ते आढळते.याच परिसरात एक भग्न मंदिर आहेत.
मंदिरावर कृष्ण मंदिर असे लिहलेले आढळते मात्र मशिदीमध्ये असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बहुदा या जुन्या मंदिरातल्या असाव्यात. दीड मीटर उंचीच्या चौथऱ्यावर हे कृष्ण मंदिर उभे आहे. या मंदिराच्या चौथऱ्यात एक मोठा खड्डा आहे व या खड्ड्यात उतरण्यासाठी एका ठिकाणी पायऱ्या आहेत. या खड्डयामध्ये डाव्या व उजव्या बाजूला कोनाडे देखील आहेत. याचा उपयोग बहुदा मंदिराचे साहित्य ठेवण्यासाठी अथवा धान्यकोठार म्हणून केला जात असेल. मशिदीच्या पाठीमागे एक बांधीव दगडी वास्तू आहे ज्याच्या दोन्ही दरवाज्याचा कमानी अजूनही शाबूत आहेत. गडाचे गडपण शाबूत करणारी ही एकमेव वास्तू आहे आज गडावर उभी आहे. येथून थोडे पुढे पाण्याचे एक नैसर्गिक तळे आहे. गडमाथ्यावर या व्यतिरिक्त कोणतेही अवशेष नाहीत मात्र गडाच्या कोणत्याही बाजूस उभे राहिल्यास लांब पर्यंतचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.
कसे जाल                                                                     
  मल्लिकार्जुनाचे मंदिर व गडमाथा फिरण्यासाठी पायथ्यापासून तीन ते चार तास लागतात. पुणे-कोल्हापूर महामार्गावर कामेरी ते तांदुळवाडी (येथून डावीकडे) येडेनिपाणी. पेठनाका ते येडेनिपाणी हे अंतर साधारण ९ किलोमीटर आहे.तर कोल्हापूर पासून ४५ किमी आहे.
_____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
_____________________________