Top News

भव्य पूजापाठ आणि रॅलीतून अयोध्येला जाणार चंद्रपूरचा लाकूड

अयोध्येतील राम मंदिर उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Temple) उभारणीत वापरलेले सागवान लाकूड (Teak Wood) महाराष्ट्रात...

ads

बुधवार, मार्च ०८, २०२३

म्हसोबा देवाची कथा mhasoba devachi katha

 म्हसोबा देवाची कथा 

म्हसोबा देव

 mhasoba devachi katha
म्हसोबा हे एक ग्रामीण दैवत आहे . महाराष्ट्रातील एक देवता. साधारणतः तेराव्या शतकापासून म्हसोबाची ठिकठिकाणी स्थापणा केल्याचे जाणकार लिहितात. ग्रामदेवता वा लोकदेवता म्हणूनही म्हसोबाचा उल्लेख केला जातो. शेंदूर लावलेला गोल किंवा उभट असा दगडाचा तांदळा, या स्वरूपात तो गावोगावी आढळतो. गावाच्या शिवेवर, शेताच्या बांधावर वा गावातील एखाद्या प्रमुख ठिकाणी त्याचे ठाणे असते. रोगराईचे संकट, वार्षिक यात्रा इ. प्रसंगी त्याला बकरा, कोंबडी, नारळ इ. अर्पण करतात.


‘महिषासुर’ या सामासिक शब्दातील ‘महिष’ या शब्दाला संत, देवता इत्यादींच्या नावांना जोडला जाणारा पितृवाचक ‘बा’ हा प्रत्यय जोडून ‘महिषोबा’ असा शब्द बनला असावा आणि त्याचा अपभ्रंश होऊन ‘म्हसोबा’ हे रूप तयार झाले असावे. म्हसोबा ही मूळची अनार्य देवता असावी इ. मते अभ्यासकांनी मांडली आहेत. विदर्भ वगैरे भागात तेलाचा घाणा सुरू करण्यापूर्वी म्हसोबाची स्थापना करतात. तसे केल्यामुळे अधिक तेल मिळते, अशी श्रद्धा आढळते. इतर घाणेवाल्यांना म्हसोबा भाड्याने देण्याच्या प्रथेचाही उल्लेख आढळतो.

म्हसोबा, वेताळ हे भुतांचे नियंत्रक देव असल्याने, त्यांना भूतयोनीत गृहीत धरता येत नाही. म्हसोबा हा भुतांचा अधिपती आहे, त्याचे सामर्थ वेताळाइतके असते इ. प्रकारच्या श्रद्धा आढळतात.

पूर्वी खेड्यात असे काही देव सापडले की म्हसोबा म्हणून संबोधत असे. खेडेगावात "म्हसोबा" हे दैवत शेताच्या बांधावर, ओढयाच्या काठाला जुने वड, चिंच, पिंपळ यांच्या सावलीत, विहिरीच्या बाजूला, डोंगराच्या कड्याला स्थापना केलेले बघायला मिळतात. शेतकरी यांना शेताचे सरंक्षण व कोणतेही भुत बाधा होऊ नये म्हणुन म्हसोबाची यथासांग पूजा करतात. शेतातील नवीन विहिरीचे खोदकाम, पेरणी, कापणी, गाड वाहन ( गाडी बैलाने कापलेले बाजरी, ज्वारी एक ठिकाणी खळ्यावर गोळा करणे ), नांगरणी, कोळपनी अशा कामाच्या अगोदर म्हसोबाला अंड, निंबु, नारळ देऊन सुरवात करतात. चैत्र अथवा वैशाख महिन्यात म्हसोबाची पूजा व मानमानता म्हणुन कोंबडा किंवा बोकडाचा बळी दिला जातो. त्याला म्हसोबाचे "कारण" केले असे म्हणतात. mhasoba devachi katha

हा स्वयंपाक व जेवण म्हसोबाच्या सानिध्यातच करावे लागते. चैत्र वैशाखा महिना व दुपारी मटणाचे जेवन, याची एक वेगळीच चव आणि स्वाद असतो. घाम गाळत, तिखट लागल्याने हुसु s s हुसुss करीत जेवण करावे लागते. यातील मनोरंजक भाग म्हणजे, मटण डेगी मध्ये बनवतात. जे लोक स्वयंपाकाची जबाबदारी घेतात, ते आपल्या साठी छोट्या बादलीत, किंवा पातल्यात मटणाचे खांड- खांड बाजूला काढून ठेवतात. बऱ्याच वेळा असे बाजूला ठेवलेले बादली किंवा पातल्यावर दुसरे लोक डल्ला मारलेले अनुभवात आहे.

महाराष्ट्रात बऱ्याच गावी म्हसोबाच्या जत्रा भरतात. काही नावाजलेलया ठिकाणचे उत्सव खाली देत आहे.

जुन्नर पासून आठ कि.मी. अंतरावर, माळशेज घाट मार्गावर असलेले भुंडेवाडी हे महसुली गाव आहे. गणेशखिंडीच्या अलीकडे डोंगरकुशीच्या सान्निध्यात वसलेले निसर्गसंपन्न गाव अशी त्याची ओळख. नवरात्रात येथे म्हसोबाचे नवरात्र असतात. नवरात्रीत म्हसोबाचा टाक गावचे पाटील यांच्या देवघरात स्थापन केली जाते. गावकुसाबाहेर असलेल्या म्हसोबा देवाच्या चांदीच्या टाकाची, नवरात्राच्या पहिल्या माळेला गावातील पाटलांच्या देवघरात स्थापना करण्याची अनेक पिढ्यांपासूनची परंपरा आहे.

अशीच ठाणे जिल्ह्यातील म्हसे (ता. मुरबाड) गावी म्हसोबाची पौष पौर्णिमेला भरणारी यात्रा ही एक प्रमुख यात्रा आहे.

म्हसोबा या देवाची देवळे खारवडे, मुळशी तालुका, पुणे जिल्हा या ठिकाणी आहेत. जेजुरीला ओकाऱ्या म्हसोबा, नकट्या म्हसोबा असे म्हसोबा आहेत. साधारणतः रस्त्यास असलेल्या घाटात(डोंगर चढाय-उतरायला केलेला वळणावळणाचा रस्ता)याची देवळे असतात. वाहनचालक घाटात त्यांच्या वाहनाला अपघात होऊ नये म्हणून याची घाटात शिरतेवेळी/निघाल्यावर पूजा करतात. म्हसोबाला पत्नी नाही. त्यावरून मराठीत ’म्हसोबाला बायको नाही आणि सटवाईला नवरा!’ अशी म्हण आहे. असा हा खास " म्हसोबा" मराठी देव आहे.

mhasoba devachi katha


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.