जुन्नर तालुक्यातील राळेगण येथे ट्रॅक्टर अपघातात पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यु - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१८ एप्रिल २०२१

जुन्नर तालुक्यातील राळेगण येथे ट्रॅक्टर अपघातात पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यु

 जुन्नर तालुक्यातील राळेगण येथे ट्रॅक्टर अपघातात पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यु
जुन्नर तालुक्यातील राळेगन गावात ट्रॅक्टरच्या अपघातात वडील व मुलाचा मृत्यू झाला असून ड्रायवर जखमी आहे. या घटनेमुळे राळेगन गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोपान उंडे, वय ५६ सुट्टी घेवुन कुटुंबासह राळेगण या आपल्या गावी आले होते. नुकताच पाडव्याच्या दिवशी त्यांनी नवीन ट्रॅक्टर खरेदी केला होता. शनिवारी दुपारच्या वेळेस सोपान उंडे हे त्यांचा मुलगा तेजस वय २० वर्ष व घंगाळदरे येथील ड्रायवर संदेश तळपे यांना घेवुन शेतीच्या मशागतीची कामे करत होते. दुसर्या शेतात मशागतीसाठी जात असताना तिव्र उभी चढण व जागेवर वळण असल्याने ड्रायवर संदेश तळपे याचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर थेट वीस फूट खोल असलेल्या शेतात पडला ट्रॅक्टरने एक पलटी मारुन ट्रॅक्टर पुन्हा उभा झाला. यावेळी ट्रॅक्टरचे हूड चेपले जावुन त्यात सोपान उंडे व ड्रायवर अडकून बसले. मुलगा तेजस तिथेच जमिनीवर पडला. हा ट्रॅक्टर तसाच सुरु होवुन सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत चालत राहून बांधाला धडकून थांबला. यावेळी गंभीर जखमी झालेला ड्रायवरने कसेबसे ट्रॅक्टरच्या हुडातुन सुटका करून घेतली व खाली येवुन आरडाओरडा केला. परंतु दुपारची वेळ व आडबाजूला शेत असल्याने कुणीही आले नाही. ड्रायवरने त्याच्या घंगाळदरे गावातील लोकांना फोन करुन बोलावल्यानंतर घंगाळदरे व राळेगन गावातील लोक मदतीसाठी तिथे पोहचले. त्यावेळी सोपान उंडे हे ट्रॅक्टरच्या हुडात अडकून जागीच मृत झाले होते. त्याठिकाणी सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. गावकर्‍यांनी ट्रॅक्टरचे हूड बाजूला करुन त्यांचा मृतदेह बाहेर काढला. तर त्यांचा मुलगा तेजस व ड्रायवर संदेश तळपे यास दवाखान्यात नेले असता वाटेतच मुलगा तेजस मयत झाला. ड्रायवर संदेश तळपेची प्रकृती चिंताजनक असून त्यावर उपचार सुरू आहेत. 

दरम्यान ट्रॅक्टर हा छोटा असुन त्याला जोडलेल्या रोटरच्या वजनामुळे ट्रक्टरचे वळणावर नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास जुन्नर पोलीस करत असून राळेगन गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.