पुस्तक गुढी उभारून मराठी नूतन वर्षाचे केले स्वागत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१४ एप्रिल २०२१

पुस्तक गुढी उभारून मराठी नूतन वर्षाचे केले स्वागतसिहोरा समुह साधन केंद्राचा अभिनव उपक्रम
सिहोरा : दि. १३ तुमसर तालुक्याच्या सिहोरा समुह साधन केंद्रांतर्गत विविध शाळांमधिल विद्यार्थ्यांनी अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे निश्चित मार्ग दाखवणारा 'पुस्तक गुढी' हा प्रेरणादायी अभिनव उपक्रम उत्स्फूर्तपणे राबवून मराठी नूतन वर्षाचे स्वागत केले.
सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता शासनास नाईलाजास्तव यावर्षीच्या शैक्षणिक सत्राच्या शेवटी पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या. परंतु समुह साधन केंद्र सिहोरा अंतर्गत शाळांमध्ये शिक्षण प्रवाह सातत्याने सुरु ठेवण्यासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांच्या प्रेरणेने, केंद्र प्रमुख तथा शापोआ अधिक्षक टी. ए. कटनकार यांच्या मार्गदर्शनात, मांडवी शाळेचे उपक्रमशील शिक्षक दामोधर डहाळे यांच्या संकल्पनेतून तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या सहकार्याने 'शाळा बंद, शिक्षण सुरु' या उपक्रमांतर्गत शाळास्तरावर विद्यार्थ्यांनी घरीच राहून पालकांच्या सहकार्याने त्यांच्याकडील उपलब्ध पुस्तकांची 'पुस्तक गुढी' उभारून फुलांनी, फुलांच्या माळांनी अभिनव पद्धतीने सजवली व पुस्तक गुढी सोबतचा स्वतःचा फोटो काढून व्हाट्सअपच्या माध्यमाने पाठवले. त्याचे प्रगत सिहोरा ग्रुपवर संकलन करून टी. ए. कटनकार यांनी संबंधित विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे शब्दसुमनाने अभिनंदन करून सर्वांना प्रोत्साहित केले. तसेच मास्क वापरा, घरीच राहून सुरक्षित राहण्याचाही संदेश यावेळी सर्वांना देण्यात आला.
यात जि. प. प्राथमिक शाळा सिहोरा इ. २ री ची रिन्जेन मलेवार व लावण्य पराते, इ. ३ री चे निमिष शरणागत, उज्वल बागडे व सक्षम मोहनकर, शुश्मीत हेडाऊ (इ. ४ थी), भाग्यष सरणागत (इ. ५ वी), जि. प. हायस्कूल सिहोराचे गौरव बिसेन (इ. ८ वी), इ. ९ वी ची सलोनी गौतम व अमिषा भोरजार, सिलेगाव शाळेचे इ. ७ वी चे आयुष गौतम व दिक्षा पारधी तसेच मांडवी शाळेचे इ. ४ थी ची माही मते व इ. ५ वी चा परमानंद मते या विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.