शाळासिध्दी व युडायसने वाढवली मुख्याध्यापकांची डोकेदुखी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ एप्रिल २०२१

शाळासिध्दी व युडायसने वाढवली मुख्याध्यापकांची डोकेदुखी


📌 विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे मुदतवाढ देण्याची मागणी 
📌 लॉकडाऊन असतांना यु-डायसची माहिती कशी भरावी ?

नागपूर - राज्यात १ मे पर्यंत कडक लॉकडाऊन असतांना शाळांनी शाळासिध्दी व युडायस मध्ये २६ एप्रिल पर्यंत माहिती भरण्याचे फर्मान काढले आहे. लाॅकडाऊनची परिस्थिती पाहता ही माहिती भरण्यासाठी शाळांना मुदतवाढ देण्याची मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर तर्फे शिक्षण आयुक्तांना पत्राद्वारे   केली आहे. 
भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी विकसित केलेल्या यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती ऑनलाईन पध्दतीने  यु-डायस प्लस प्रणालीमध्ये ३० मे २०२१ पर्यंत संगणीकृत करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहे. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी २६ एप्रिल पर्यंत शाळांनी माहिती संगणिकृत करून देण्याचे आदेश दिल्याने मुख्याध्यापक व शिक्षक संभ्रमात पडले आहेत. राज्यात कडक लॉकडाऊन असल्याने सर्व सामान्यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर पडता येते. त्यामुळे माहिती संकलित करण्यासाठी शाळेत कसे पोहोचावे? असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. 
समग्र शिक्षा या योजनेचे पुढील वर्षाचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता यु-डायस प्लस प्रणालीमार्फत संगणीकृत होणाऱ्या माहितीचा उपयोग होणार आहे. असून याच माहितीच्या आधारे भारत सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांना अनुदान मंजूरी देण्यात येते. यु-डायस प्लस प्रणालीमधील माहितीचा उपयोग वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करणे, तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याकरिता तसेच राज्याचा शैक्षणिक निर्देशांक देशपातळीवर निश्चित करण्याकरिता करण्यात येतो.
सदर माहितीत जर एक वर्ग असेल तर माहिती भरण्यास अडचण येत नाही.परंतु जर एकापेक्षा जास्त वर्ग असल्यास कटलॉग, शिक्षक सर्व्हिस बुक, शिक्षक माहिती, लेखा विषयक माहिती ही शाळेत आहे. त्यामुळे घरून माहिती भरण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे शाळासिध्दी व युडायस मध्ये माहिती भरण्याला मुदतवाढ देण्याची मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) नागपूर विभाग नागपूर तर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, माध्यमिक संघटक शेषराव खार्डे, मुख्याध्यापक प्रकाश भोयर, बालकृष्ण बालपांडे (गोंदिया), मुकुंद पारधी (भंडारा), धिरज यादव, नंदकिशोर भुते, गजेंद्र नासरे, श्री चौधरी, सुरेश राऊत, राजेंद्र खंडाईत, सुशील कुळकर्णी आदी मुख्याध्यापकांनी शिक्षण आयुक्त, अप्पर शिक्षण सचिव यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.


 
शाळासिध्दी व युडायस संदर्भात निर्माण झालेल्या पेचावर शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी शिक्षण आयुक्त श्री विशाल सोळंकी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून सदर अडचणीशी अवगत करून दिले. या पेचप्रसंगात मुदतवाढ वाढवून देण्याची विनंती केली असता, हा धोरणात्मक निर्णय असून यात मुदतवाढ देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षण आयुक्त श्री विशाल सोळंकी यांनी सांगितले.