नवेगावबांध ग्रामपंचायत लक्ष देईल काय? गृह विलगीकरणामुळेच संसर्ग वाढतो आहे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१८ एप्रिल २०२१

नवेगावबांध ग्रामपंचायत लक्ष देईल काय? गृह विलगीकरणामुळेच संसर्ग वाढतो आहे

 नवेगावबांध ग्रामपंचायत लक्ष देईल काय?गृह विलगीकरणामुळेच संसर्ग वाढतो आहे
गृह विलगीकरणातील बाधित हिंडतात रस्त्यावर. संबंधितांचे दुर्लक्ष.
संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध ता.१८ एप्रिल :-

रॅपिड अँटीजन चाचणी किंवा आरटीपीसीआर चाचणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना गृह विलगीकरण ची सोयी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे, कोरोनाव्हायरस चा संसर्ग अधिक प्रमाणात वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव रुग्णाला गृह विलगीकरण केले जाते. स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय, स्वतंत्र स्नानगृह हे वेगळे असावे.मात्र अशा प्रकारची सुविधा ग्रामीण भागात बाधित व्यक्तींच्या कुटुंबाकडे नसते. त्यामुळे घरातील व्यक्ती ह्या बाधित व्यक्तीकडून संसर्गित होत असल्याचे खळबळजनक सत्य पुढे येत आहे.

गावात २९ च्या वर सक्रिय बाधित असल्याची माहितीआहे.दिवसागणिक रुग्ण संख्या वाढतच आहे,ही चिंतेची बाब आहे.

दोन किंवा तीन खोल्यात संसार करणारे बाधित व्यक्ती खऱ्या अर्थाने  गृह विलगीकरणाचे निकष पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे घरच्या घरी संसर्गाचा धोका वाढत आहे. तसेच शेजारा पाजारातही हा संसर्ग वाढत आहे. त्याच प्रमाणे बऱ्याच गावात कोरोना बाधितांची घरे मायक्रो कन्टोनमेंट झोन म्हणून स्थानिक ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने घोषित केले जात नाही. घराच्या भिंतीवर स्टीकर लावली जात नसल्यामुळे, सदर कुटुंबातील सदस्य कोरोना बाधित आहेत. हेच शेजारी-पाजारी यांना किंवा गावात माहीत नसल्यामुळे बरेच व्यक्ती जाणता अजाणता या संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येतो, त्यामुळे बाधितांची संख्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही बधितांची संख्या वाढत आहे.बधित  असलेल्या रुग्णाच्या घराच्या भिंतीवर या कुटुंबातील व्यक्ती बाधित असल्याचे स्टिकर लावायला पाहिजे, परंतु नवेगावबांध सह अनेक गावात असे स्टीकर आरोग्य विभागामार्फत लावली जात नाही, त्यामुळे अजाणतेपणे बाधित असूनही घराबाहेर न पडण्याचे सूचना संबंधिताना  देऊनही असे व्यक्ती घराबाहेर पडतात.अशी तक्रार गावकरी करीत आहेत. त्याच्या संपर्कात आल्याने शेजारीपाजारी व गावातील व्यक्ती संसर्गित होताहेत. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत ग्रामीण भागात वाढ होत आहे. म्हणून कोणीतरी यांना आवरा हो असे म्हणण्याची पाळी गावकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत कार्यक्षेत्र मानून ग्रामपंचायत स्तरावर कार्य समित्यांचे गठन केले आहे. गावातील शाळा विलगीकरणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कोरोना बाधीतांच्या  गृहवीलगिकरणाची व्यवस्था असो की नसो, घरीच विलगीकरणात राहत आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका बळावला आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन बाधीतांच्या घराच्या भिंतीवर स्टीकर लावून मायक्रो कन्टोनमेंट झोन जाहीर करावे. ज्यांच्याकडे गृह विलीनीकरणाच्या सुविधा नाहीत त्यांना गावातील शाळेत विलगीकरणासाठी  ठेवावे. संबंधित यंत्रणेने गृह विलगीकरणात असलेले बाधित गावात फिरतात, त्यांच्यावर करडी नजर ठेवून, त्यांच्यावर दंड ठोठावून, फौजदारी गुन्हे दाखल करावे. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. बाधितांच्या घराच्या भिंतीवर स्टिकर लावले जात नसल्यामुळे किंवा कोण बाधित आहेत हे गावातील नागरिकांना तसेच  शेजाऱ्या पाजाऱ्यांना माहित नसल्यामुळे. गावातील बाधित नसलेले व्यक्ती त्यापासून स्वतःचा बचाव कसे करतील? त्यांच्या संपर्कात ते आले तर संसर्गाचा धोका अधिक वाढेल. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने व गाव आपत्ती समितीने याबाबत पावले उचलावी. गृह विलगीकरणात असलेले बाधित व्यक्ती गावात या ना त्या कारणाने हिंडत असतात अशा लोकांना पायबंद घालून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. याकडे ग्रामपंचायत व पोलीस खात्याने लक्ष द्यावे .अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेश शर्मा यांनी केली आहे.

कोरोना व्यक्तींच्या घराच्या भिंतीवर स्टिकर लावले जात नसल्याबाबत तसेच गृह विलगीकरणात असलेले बाधित व्यक्ती गावात हिंडत असल्याचे तक्रारीबाबत अर्जुनी-मोर तालुक्याचे तहसीलदार विनोद मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बाधित व्यक्तींच्या घराच्या भिंतीवर स्टीकर लावण्याच्या नियोजनाबद्दल तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. ज्या गावात अशा प्रकारची स्टिकर लावले जात नाहीत. त्या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा निर्देश देऊ, असे सांगितले. तसेच गृह विलगीकरणात असलेली व्यक्ती गावात जर हिंडत असतील तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

तर नवेगावबांधचे ग्राम विकास अधिकारी पी. आर. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, उद्यापासून गावात स्टिकर लावले जातील. असे सांगितले. तर नवेगावबांध ग्रामपंचायतचे सरपंच अनिरुद्ध शहारे यांच्याशी संपर्क साधला असता, स्टीकर लावण्याची कार्यवाही करू तसेच ज्यांच्या घरी गृह विलगीकरणाच्या  सुविधा नाहीत, त्यांची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेत करण्यात येईल. कोरोना बाधित व्यक्तींनी घराबाहेर पडू नये, गृह विलगीकरणात असलेले कोरोना बाधित नागरिक गावात फिरताना आढळल्यास त्यांच्यावर दंड आकारणी व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. असा इशारा देऊन, दवंडी द्वारे गावात सूचना देण्यात येईल असे सांगितले.दरम्यान तहसीलदार विनोद मेश्राम यांनी याबत प्राथमिक आरोग्य केंद्र धाबेपवनी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी वरून याबाबत निर्देश दिल्यामुळे, गावात आज पासून स्टिकर लावण्यास सुरुवात केली आहे,हे येथे उल्लेखनीय आहे.