महावितरण कर्मचाऱ्यांसाठी कोवीड कक्षाची स्थापना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ एप्रिल २०२१

महावितरण कर्मचाऱ्यांसाठी कोवीड कक्षाची स्थापना

नागपूर, दिनांक १३एप्रिल २०२१-
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावा लागतो आहे. कोरोना बाधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी परिमंडळ स्तरावर कोविड कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती महावितरण नागपूर परिमंडलाचे मुख्य अभीयंता दिलीप दोडके यांनी दिली.
कोरोना विषाणूची बाधा झाल्याने मागील वर्षभरात नागपूर परिमंडळात ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या कालावधीत एकुण ५२७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली.२६० कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले.२७ कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहे.२३२ कर्मचारी गृह विलगीकरणात आहेत.
मागील वर्षी कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव वाढल्यावर देखील महावितरण कडून वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यात आला. सद्यस्थितीत सुद्धा करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे परंतु महावितरणचे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांचा वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी कार्यरत आहे. पण हे करीत असताना महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी कोरोना बाधीत होत आहेत. कोरोना बाधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी रूग्णालयात बेड मिळवून देण्यासाठी मदत करणे, कंपनीचे विमा विषयक कामाबाबत मदत करणे, कोविड बाधित कर्मचारी यांची माहिती संकलित करणे , आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देण्या बाबत मदत करणे. आदी कामे या कोवीड कक्षामार्फत केली जाणार आहेत. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने हे या कोवीड कक्षाचे समंवयक अधिकारी म्हणून काम पाहतील. या समितीमध्ये कार्यकारी अभीयंता (प्रशासन), उप विधी अधिकारी तसेच मानव संसाधन विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे अशी माहिती मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके यांनी दिली.