चंद्रपूर शहरात ३८ हजार ५९३ जणांनी घेतली लस - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ एप्रिल २०२१

चंद्रपूर शहरात ३८ हजार ५९३ जणांनी घेतली लस

चंद्रपूर, ता. १७ :  अतिशय वेगाने संसर्ग पसरणाऱ्या  कोव्हिड-१९ विषाणूची साखळी तोडणे हाच एकमेव पर्याय आजघडीला शिल्लक असून, या संकटाच्या काळात, कोरोनावरील लस हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. कोरोना लसीकरणाची सुरुवात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात एकूण १४ लसीकरण केंद्र सुरु केले होते. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत एकूण ३८ हजार ५९३ जणांनी पहिली आणि दुसरी लस घेतली आहे. यात कोविशिल्ड ३५ हजार १२० तर, कोव्हॅक्सीन ३ हजार ४७३ जणांना देण्यात आली. 

पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील ५ हजार ५६३ योद्धांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ५ हजार २८५ आरोग्य सेवकांना पहिला डोज, तर ३ हजार ३३५ जणांना दुसरा डोज देण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलिस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ३ हजार ५५३ कोरोना योद्धांचे नामांकन करण्यात आले होती. यातील ३ हजार २७३ जणांना पहिला डोज व १७२० जणांना दुसरा डोज देण्यात आला आहे. अशा प्रकारे आरोग्य सेवक व फ्रंट लाईन वर्कर मिळून ९ हजार ११६ नोंदणीकृत लाभार्थ्यांना पहिला व दुसरा असे १३ हजार ६१३ डोज देण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यात  १ एप्रिल पासून ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक व ६० वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. आतापर्यंत १७ हजार ७१० ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोज तर ३८० नागरिकांना दुसरा डोज देण्यात आला आहे. तसेच ६ हजार ८२५ व्याधीग्रस्त नागरिकांना पहिला डोज, तर ६५ जणांना दुसरा डोज देण्यात आला. म्हणजेच एकूण ३८ हजार ५९३ जणांनी पहिली आणि दुसरी लस घेतली आहे. 

डोज  घेतल्यानंतर काही दिवसांनी  आपल्या शरीरामध्ये कोरोनाविरूद्ध लढा देण्यास आवश्यक शक्ती विकसित होईल. त्यामुळे,  लस घेतल्यानंतर लगेचच कोणताही निष्काळजीपणा न करता सतत मास्क वापरणे, हात धुणे व सहा फुटाचे अंतर ठेवून सोशल डिस्टन्सचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे. 


आर.टी. पी.सी.आर. व अँटीजेन चाचणी केंद्र

चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात सहा आर.टी. पी.सी.आर. चाचणी केंद्र तर चार अँटीजेन चाचणी केंद्राची सोय केली आहे. शहरात वन आकदमी, मूल रोड, काईस्ट हॉस्पिटल तुकुम,  शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अभ्यंकर प्राथमिक शाळा बालाजी वॉर्ड, भिवापूर वॉर्ड, सरदार पटेल प्राथमिक शाळा, रामनगर येथे आर.टी. पी.सी.आर. चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. याशिवाय अँटीजेन चाचणीची व्यवस्था शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. १ इंदिरा नगर, सरदार पटेल प्राथमिक शाळा रामनगर, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. ४ बगड खिडकी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. ५ बाबूपेठ येथे करण्यात आली आहे.