किल्ले केंजळगड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२८ एप्रिल २०२१

किल्ले केंजळगड


       किल्ले केंजळगड


फेसबुक लिंक http://bit.ly/32WIVhg
केंजळगड हा सातारा जिल्ह्यातील कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील एका डोंगरावर आहे. एका बाजूला धोम येथे कृष्णा नदीवर धरण आहे, तर दुसरीकडे नीरा नदीवर देवघर येथे धरण व जवळच रायरेश्वराचे पठार आहे.

किल्ले केंजळगड

मोहनगड, खेळजा अशी नावे असलेल्या केंजळगडाला फारसा इतिहास नाही. शिलाहार राजा भोजने निर्माण केलेल्या अनेक किल्ल्यांपैकी हा एक! गडाभोवती असलेल्या काही खोदीव गुहा त्याच्या या प्राचीनत्वाचेच दाखले देतात. यानंतर निजामशाही, आदिलशाहीचा या गडावर अंमल होता. त्यांचेही उल्लेख इतिहासात येतात.
शिवकाळात ह्या गडाचा इतिहास मिळतो तो असा. केंजळगड घेण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांचा चालू होता. पण गड हार मानीत नव्हता. केळंजा महाराजांच्या प्रदेशाला लागूनच असल्याने येथे नेहमी लढाई होई.
त्यामुळे केळंजागडाची स्थिती नाजूक होती पण वाई या आदिलशाही ठाणे मधून केळंजाला पुरेशी मदत होत नव्हती. तेंव्हा खान सर्जाखान याने २ नोव्हेंबर १६६३ रोजी वाई येथील कारकूनाला केळंजाला मदत करण्याविषयी पत्र पाठवले. ते असे
,
" किल्ले केळंजा येथील सरगुन्हो व नाइकवाडी यात यानी मालूम केले की, आपणास देह व गावगना तनखा व ठिकाणे आहेती. यैसियासी गनिमाने तह वेळी करता तमाम पडले. हकास जागा नाही, रातीदिवसा किल्ल्यावरी असावे, पोटास् न पावता लोक कैसे राहतील. किले मजकुर सरहदेचा हमेशा लढाई पडताती यैसियासी देह व ठिकाणे येथे जे दस्त होईल ते दुमाले करुन पुरविलि पाहिजेल ते ठाणाहून ( वाई ) देवीले पाहिजे म्हणैउनू मालुम केले."Ⓜ
आदिलशाही देखील मोठ्या जिकिरीने केंजळगड राखून होते. मराठ्यांना कडवा विरोध करणारा केंजळगड अखेर २४ एप्रिल १६७४ रोजी मराठ्यांनी सुलतानढवा करुन केंजळगड हा आदिलशाही गड ताब्यात घेतला.
शेवटच्या काळात इथे आलेल्या माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन या इंग्रज अधिकाऱ्याने या गडाविषयी एक वाक्य नोंदवून ठेवले आहे, ते असे,‘..जर हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला तर जिंकणे अशक्य आहे!’
हा निश्चयच मराठय़ांनी त्या शेवटच्या लढाईत दाखवला आणि ब्रिटिशांना अनेक दिवस झुंजवले. अखेर २६ मार्च १८१८ रोजी जनरल प्रिझलरने केंजळगडाची ही झुंज थांबवली. गड ब्रिटिशांकडे गेला तो पुढे स्वातंत्र्य मिळेपर्यंत!


या गडावरून घडणारे भूगोलाचे दर्शनही चार क्षण खिळवून ठेवणारे आहे. उत्तरेकडे रोहिडा, पूर्वेकडे पांडवगड, मांढरदेव, दक्षिणेस पाचगणीचे टेबललँड, महाबळेश्वरची गिरिशिखरे, कमळगड आणि पश्चिमेकडे ऐसपैस पसरलेले रायरेश्वरचे पठार असे डोंगर-दऱ्यांचे खेळ थक्क करून सोडतात

_________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
_________________________