येथे मुस्लिमही शिकतात भगवद् गीता अन् गायत्री मंत्र - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०९ एप्रिल २०२१

येथे मुस्लिमही शिकतात भगवद् गीता अन् गायत्री मंत्र

 येथे मुस्लिमही शिकतात भगवद् गीता अन् गायत्री मंत्र

फेसबुक लिंक http://bit.ly/3d2cbsP
" यदा यदा ही धर्मस्य .. .', भगवद् गीतेतील काही श्लोक आणि गायत्री मत्रांचे दररोज पठण ... हे कोणत्या मंदिर वा मराठी शाळेतलं चित्र नाही , तर घुमान जवळ असलेल्या कादियॉं येथील जामिया अहमदिया या धार्मिक शिक्षण संस्थेतील आहे .. . तिथे शिकविली जाते सर्वधर्मांविषयी सहिष्णुता , देशभक्ती आणि सलोखा ... .
पंजाबच्या भूमीत घुमानपासून अठरा किलोमीटर अंतरावर इस्लामचं एक पवित्र रूप पाहायला मिळालं . संत नामदेव महाराजांनी धर्माची सीमा ओलांडली . त्यांचाच वारसा म्हणता येईल , अशा हजरत मिर्झा गुलाम अहमद या अवलियाने सव्वाशे वर्षांपूर्वी मुस्लिमांच्या अहमदिया पंथाची कादियॉं येथे स्थापना केली . त्याची पताका आता देशविदेशात फडकत आहे .

येथे मुस्लिमही शिकतात भगवद् गीता अन् गायत्री मंत्र

कादियॉंचं वैशिष्ट्य लोक अभिमानाने सांगतात की , जेव्हा भारत - पाकिस्तानची फाळणी झाली , त्या वेळी देशभर दंगली , कत्तली झाल्या ; पण कादियॉं हे असे एक गाव होते , तिथे मुस्लिमांचं रक्षण हिंदू आणि शिखांनी केले आणि मुस्लिमांनी या धर्मातील नागरिकांचं . इथे हाच सलोखा आजही कायम आहे . त्यामुळेच अहमदियाच्या मशिदीजवळच एक मंदिर आणि गुरुद्वारा आहे . या गावात कधीही जात- धर्मावरून वाद झालेले नाहीत .
आपल्या शब्दांतून वा कर्मातून कोणीही दुखवले जाऊ नये , देशाच्या प्रती प्रत्येकाने भक्तिभाव दाखवावा, जगाला प्रेम अर्पावे , असं मानणारा हा अहमदिया पंथ आहे . त्याची शिकवण देण्यासाठी कादियॉंमध्ये जामिया अहमदिया हे विद्यापीठाप्रमाणे शैक्षणिक संकुल उभारण्यात आले आहे . तिथे शिक्षण देण्याची भाषा अरबी आणि उर्दू असली तरी , केवळ इस्लामची शिकवण दिली जात नाही . हिंदू, शीख , बौद्ध आदी धर्मांचीही शिकवण दिली जाते. गीतेचे अध्याय आणि गायत्री मंत्र शिकविला जातो .
विद्यार्थ्यांसाठी सात वर्षांचा अभ्यासक्रम इथे चालविला जातो . आम्ही एका वर्गाला भेट दिली त्या वेळी मुलांनी यदा यदा ही धर्मस्य तसेच ॐ
भूर्भुव : स्व : . .. अर्थात गायत्री मंत्र आणि अन्य श्लोकांचे पठण केले.
" खिदमत ए खुल्क ' म्हणजे प्रत्येकाची सेवा हे ब्रीद असलेल्या अहमदिया पंथाचे मुख्य कार्यालय कादियॉंमध्ये आहे . त्याद्वारे शैक्षणिक संस्थाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम चालविले जातात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात ते आपला सेवाधर्म बजावतात . सेवा , शांतता आणि प्रेम यांचं अनोख रूप अहमदिया पंथाची शिकवणीतून दिसून येते .
बनारसमध्ये संस्कृत शिक्षण
जामिया अहमदियामध्ये कमरूल हक खान आणि महंमद नसीरूल हक हे दोन तरुण शिक्षक विद्यार्थांना संस्कृत विषय आणि गीता शिकवतात . या दोघांनीही बनारसमधील संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयात संस्कृतचे शिक्षण घेतले आहे . कमरूल हे शास्री म्हणजेच पदवी उत्तीर्ण आणि नसीरूल हक हे आचार्य म्हणजे पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आहेत.
संस्कृतमध्ये चर्चा
नसीरूल हे स्वतःचे नाव नसीर आचार्य सांगतात . त्यांनी संस्कृत भाषेतील शैक्षणिक कामगिरीबद्दल बनारसमधील संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाने सुवर्णपदक देऊन गौरविले आहे . त्यांची भेट आज सकाळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते , संस्कृतचे प्रकांड पंडित डॉ . सत्यव्रत शास्री यांच्याशी कादियॉंमधील " सराय वसीम ' या अभ्यागत निवासात झाली. दोघांमध्ये संस्कृत भाषा, दुर्मिळ ग्रंथ यावर अर्धा तास चर्चा झाली. विशेष म्हणजे ही चर्चा हिंदी , इंग्रजी नव्हे; तर संस्कृत भाषेत होती