देवगडचा किल्ला समुद्रात शिरलेल्या टेकडीच्या निमुळत्या होत गेलेल्या टोकावर वसलेला आहे. त्यामुळे त्याला ३ बाजूंनी समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. देवगड किल्ला दोन भागात विभागलेला आहे. (१) टेकडीवरील बालेकिल्ला व (२) समुद्राला लागून असलेला किल्ल्याचा भाग. देवगड गावात किल्ल्याबद्दल विचारल्यास थेट टेकडीवरील बालेकिल्ल्याचा रस्ता दाखवतात आणि सामान्य पर्यटकही तेवढाच किल्ला पाहून परत जातात.
टेकडीवरील पठारावरून बालेकिल्ल्याकडे जातांना आपल्याला प्रथम बालेकिल्ल्याची पूर्व पश्चिम पसरलेली तटबंदी व त्यातील ३ बुरुज दिसतात. देवगड किल्ल्याला ३ बाजूंनी समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. चौथ्या म्हणजेच टेकडीच्या बाजूने संरक्षण देण्यासाठी कातळात ३ मीटर रुंद व २.५ मीटर खोल खंदक खोदलेला आहे. या खंदकाच्या एका बाजूवर तटबंदी उभारल्यामुळे तटबंदीची उंची वाढलेली आहे. इतर किल्ल्यांच्या खंदकाप्रमाणे या खंदकात पाणी साठवले जात नव्हते. कातळात खोदलेल्या या खंदकातील दगड (चिरे) वापरून गडाची तटबंदी व बुरुज बांधलेले आहेत.
तटबंदीच्या पूर्व टोकाला २ बुरुजांच्या मध्ये गोमुखी दरवाजा लपवलेला आहे. दरवाजाच्या आतील बाजूस तटबंदीतच हनुमानाची मूर्ती बसवलेली आहे. त्याच्या शेजारीच प्रवेशव्दाराच्या बुरुजावर जाणारा जीना आहे. या बुरुजावरून संपूर्ण किल्ला दृष्टीक्षेपात येतो. येथून किल्ल्याच्या अर्ध्या भागात असलेली पोर्ट ट्रस्टची कार्यालये व दिपस्तंभ दिसतात. प्रवेशव्दाराच्या समोरच गणपतीचे जिर्णोध्दारीत मंदिर आहे. त्यातील पूरातन गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन तटबंदीच्या कडेकडेने बालेकिल्ला पहाण्यास सुरुवात करावी.
प्रथम उजव्या बाजूस एक छोटी दोन खणी चिरेबंदी वास्तू दिसते. पुढे गेल्यावर कातळात खोदलेली २ सुकी टाकी दिसतात. किल्ल्याच्या पश्चिम टोकावर असलेल्या बुरुजावर चढण्यासाठी रुंद पायर्या आहेत. या बुरुजात जंग्या आहेत, तसेच तोफा ठेवण्यासाठी झरोके देखिल आहेत. याच बुरुजावर झेंडा लावण्यासाठी सोय केलेली आहे. बुरुजावरून खाली उतरून सरळ चालत गेल्यावर घरांचे चौथर्यांचे अवशेष दिसतात.पुढे एक चिर्यात बांधून काढलेली चौकोनी विहिर आहे, तिच्या भोवती चिर्याचे कंपाऊंड केलेले आहे. विहिरीच्या पुढील भागात पोर्ट ट्रस्टची कार्यालये व दिपस्तंभ आहे. या भागात जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे पुन्हा प्रवेशव्दारापाशी परत यावे.
प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर डावीकडील आमराईत सिमेंट मध्ये बांधलेल्या पायर्या दिसतात. या पायर्यांनी ५ मिनिटात आपण समुद्राला लागून असलेल्या रस्त्यावर पोहोचतो. येथे कस्टमचे कार्यालय आहे; त्याच्या विरूध्द बाजूस म्हणजे डावीकडे वळून ( उजव्या बाजूस समुद्र व डाव्या बाजूस डोंगर ठेऊन) चालत राहील्यास ५ मिनिटात आपण पोर्ट ट्रस्टच्या गेटपाशी पोहोचतो. गेटच्या अलिकडे समुद्राच्या बाजूला एक भिंत आहे. या भिंतीच्या मागे किल्ल्याचे समुद्राकडील प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यावर एकदम प्रवेश करता येऊ नये म्हणून प्रवेशव्दारा समोरच भिंतीची रचना करण्यात आली आहे व डाव्या बाजूस चिंचोळी वाट ठेवलेली आहे. पूर्वीच्या काळी या प्रवेशव्दारा समोरच समुद्रात बोटींसाठी धक्का असावा.येथून पुन्हा रस्त्यावर येऊन कार्यालयांपाशी पोहोचावे. येथे दोन तोफा समुद्राकडे तोंड करून ठेवलेल्या आहेत. या दोन तोफांमधून जेटीवर जाण्यासाठी पायर्या आहेत. जेटीवरून समुद्रात बांधलेले किल्ल्याचे चार बुरुज दिसतात. कार्यालय ओलांडून पुढे गेल्यावर शेवटच्या टोकावर एक मोठा बुरुज आहे. येथून बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी पायर्या आहेत तसेच तटबंदी आहे.(या भागात जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे पुन्हा प्रवेशव्दारापाशी परत यावे). येथे आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. येथून आल्या मार्गाने परत बालेकिल्ल्यावर जावे किंवा सरळ रस्त्याने गेल्यास आपण ३० मिनिटात देवगड गावात पोहोचतो.
२) मुंबई - गोवा महामार्गावरील नांदगाव येथे उतरून तेथून एसटी आणि ६ आसनी रिक्षांनी देवगडला जाता येते.माहिती सेवागृप
३) कोकण रेल्वेने देवगडला जाण्यासाठी नांदगाव हे जवळचे स्टेशन आहे. नांदगावहून एसटी आणि ६ आसनी रिक्षांनी देवगडला जाता येते.
अ) स्वत:च्या वहानाने थेट देवगड बालेकिल्ल्याच्या दारात जाता येते.
ब) देवगड एसटी स्थानका जवळून किल्ल्यावर जाण्यासाठी रिक्षा मिळू शकते.परत येतांना मात्र चालतच यावे लागते.
क) देवगड एसटी स्थानकासमोरून सरळ जाणार्या रस्त्याने समुद्राच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर थोड्याच वेळात तीव्र उतार चालू होतो. साधारण १० मिनिटात आपण समुद्राजवळ पोहोचतो. पुढे समुद्र उजवीकडे ठेवत त्याच रस्त्याने थोडे चालत गेल्यावर दत्त मंदिर लागते, तेथेच डाव्या हाताला एक रस्ता टेकडीवर जातो.(या फाट्यावरच एक बौध्द मंदिर आहे.) या रस्त्याने फाट्यापासून १५ मिनिटात आपण बालेकिल्ल्यापाशी पोहोचतो. देवगड एसटी स्थानक ते देवगड बालेकिल्ला चालत जाण्यासाठी ३० मिनिटे लागतात. वर (पहाण्याची ठिकाणे माहिती वाचावी) सांगितल्या प्रमाणे देवगड किल्ल्याचा समुद्राजवळील भाग पाहून जर आपण खालच्याच (समुद्राजवळील) रस्त्याने परत आलो तर १० मिनिटात आपण दत्त मंदिर वरून टेकडीवर जाणार्या रस्त्याच्या फाट्यावर येतो