किल्ले लळिंग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२९ एप्रिल २०२१

किल्ले लळिंग

 किल्ले  लळिंग 

____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
____________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/3u2T73T
लळिंग जि धुळे,आज लळिंगगडावर आढळतात ते केवळ इतिहासाचे, त्यांच्या एकेकाळच्या वैभवाचे अवशेष. मुस्लिम शैलीतील बांधकामाच्या खुणा पाहताना लळिंगगडाच्या मातीमध्ये किती तरी मोठा गतकाळ इतिहासजमा झाल्याची जाणीव होते.

किल्ले  लळिंग

मुंबई-आग्रा महामार्गाने धुळय़ाहून नाशिकच्या दिशेने जाऊ लागलो की, अदमासे दहा किलोमीटरवर एक डोंगररांग आडवी येते. या डोंगररांगेला छेदत हा महामार्ग वाहतो. खरे तर तो इतिहासकाळापासून उत्तरेकडील इंदूर, आग्रा, दिल्ली शहरांकडे धावतो आहे. या अशा ऐतिहासिक वाटेवरच लक्ष ठेवण्यासाठी एक बळीवंत दुर्गठाणे कधीचे इथे ठाण मांडून बसलेले आहे, नाव लळिंग!
महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराण्यांमध्ये खान्देशातील ‘फारुकी’ घराणे एक मोठे. या घराण्याने या प्रदेशावर तब्बल पाचशे वर्षे राज्य केले. या घराण्याची काही काळ राजधानी असलेला हा दुर्ग लळिंग!
धुळय़ाहून नऊ किलोमीटरवर हा किल्ला. पायथ्याशीच लळिंग नावाचेच छोटेसे गाव.  
या गावातच इतिहासाचे काही धागेदोरे दडलेले आहेत. गावातील महादेवाचे मंदिर हेमाडपंथी. चांगले हजारएक वर्षे प्राचीन! पण या मंदिराचा मुखमंडप, सभामंडप सारे पडून गेलेले किंवा पाडलेले. केवळ गर्भगृहच तेवढे काय ते शिल्लक. पण तरी या शिल्लक भिंती, त्यावरील कलात्मक कोनाडे, प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे सारे एकेकाळचे वैभव सांगते आहे.
गावातून बाहेर पडताच लळिंगचा डोंगर भिडतो. लळिंगची उंची समुद्रसपाटी पासून ५९३ मीटर आहे! सह्य़ाद्रीच्या ऐन धारेवरील किल्ल्यांच्या मानाने ही उंची मात्र बेताचीच. मळलेली वाट गडाकडे निघते. वाटेत काही ठिकाणी पायऱ्यांचे अवशेष दिसतात. दोन ठिकाणी दगड रचलेल्या तटबंदीच्या भिंतीही आडव्या येतात. काही ठिकाणी प्रवेशद्वाराचीही रचना वाटते. अध्र्याएक तासात आपण गडमाथ्याजवळ पोहोचतो. गडाजवळ आलो, की खोदीव पायऱ्या दिसतात. पुढे कडय़ात काही खोदकामेही आहेत. ही खोदकामे पाण्याच्या टाक्या आहेत, की लेण्या हे मात्र समजत नाही. या खोदकामा शेजारूनच चार पावले उजवीकडे चालत गेलो, की आले गडाचे प्रवेशद्वार!
मुख्य दरवाजाची कमान कधीच ढासळली आहे. पण त्याभोवतीच्या भिंती, तट मात्र अद्याप शाबूत. यातील उजव्या भिंतीवर असलेले शरभाचे शिल्प आपल्याशी बरेच हितगूज करत असते.
लळिंगचा घेर आटोपशीर. मध्यभागी एक छोटीशी टेकडी, तिच्यावरच गडाचा बालेकिल्ला आणि उर्वरित सपाटीचा भाग तटाकडेने धावणारा. या तटाकडेच्या फेरीसाठी मुख्य प्रवेश द्वारापासून डावी-उजवीकडे दोन वाटा फुटतात. अगदी सुरुवातीला उजव्या हाताला वळावे. लळिंगला निघाल्यापसून सतत खुणावत असणारे कमानींचे बांधकाम इथे पुढय़ात उभे असते. पूर्व तटालगतचे हे बांधकाम. तटावरच विटांचे काम केलेले. त्यामध्ये गवाक्षांच्या कमानी नटवलेल्या. भिंतीच्या डोक्यावर पुन्हा पाकळय़ांच्या नक्षीची ओळ! शेजारच्या तटावरही मारगिरीच्या या चर्या! मुस्लीम स्थापत्यशैलीतील ही सारी कलात्मकता! बाहेरून भव्य वाटणाऱ्या या वास्तूची आतील बाजू पडलेली असल्याने तिचा नेमका अंदाज येत नाही.
या कलेला अजून नाजूक करणारे दृश्य इथल्याच एका कमानीतून खाली तळात दिसते. गडाच्या उत्तर अंगास खाली एक खोदीव, बांधीव स्वरूपाचा तलाव आहे आणि त्याच्या काठावर एक घुमटवजा मनोरा उभा आहे. सारेच रेखीव!

या वाटेवरच पुढे एक बुलंद बुरुज. यावर तोफेसाठीचा गोल कट्टा दिसतो. हे सारे पाहात पुन्हा प्रवेशद्वारापासून डाव्या हातास निघावे. सुरुवातीला काही खोदीव हौद दिसतात. पुढे टेकडीलगत चुन्यात बांधलेले तेला-तुपाचे रांजण येतात. गडावर जसे दारूगोळय़ाचे, धान्याचे कोठार, पाण्याचे हौद, तसेच हे तेला-तुपाचे रांजण! गडकोट ही कायम संघर्षांची -युद्धाची भूमी. अशा या युद्धभूमीवर मग जखमींच्या उपचारासाठी या तेला-शुद्ध तुपाचे साठे ठेवावे लागतात.
लळिंगच्या टेकडीभोवती दक्षिण अंगास काही टाक्या खोदलेल्या आहेत. पण गडावरील साऱ्याच हौदातील पाण्याने जणू वैर मांडलेले. हिरवा, पिवळा, काळा असे निरनिराळे रंग, वासही चार हात दूर ठेवणारे. काय करणार; या गडाची काळजी घेणारे त्याचे मालकच कधी शेकडो वर्षांपूर्वी हे घर सोडून खाली उतरले. तिथे मग हे पाणी रुसून बसणार नाहीतर काय!
दक्षिण अंगाकडील गडाचा तट त्याच्या डोक्यावरील पाकळय़ांचे तोरण मिरवत पुढे येतो. गडाच्या अंगा-खांद्यावरच्या या जागोजागीच्या फारुकी खुणा! कमानींच्या या पाकळय़ां मधूनच मग दक्षिण-पश्चिमेकडील अनेक दुर्गशिखरे डोकावतात. पिसोळगड, कंक्राळा, डेरमाळ असे कितीतरी; गाळणा या साऱ्यांतील बिनीचा शिलेदार! खान्देशची ही दौलत पाहातच पश्चिम तटावर उतरावे.
या अंगाला गडाचा दुसरा दरवाजा. छोटासा कमानीचा तटात  खोलवर लपलेला. तिथे उतरण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग.
डाच्या मधोमध असलेली टेकडी म्हणजे लळिंगचा बालेकिल्ला. वाडय़ांची जोती, घरांचे अवशेष, दुर्गामातेचे मंदिर, धान्य कोठाराची इमारत, त्या भोवतीचे पाण्याचे हौद ही सारी या बालेकिल्ल्याची संपत्ती!,लळिंगवरची ही सारी बांधकामे फारुकी काळातील. इसवी सन १३७० मध्ये राजा मलिकने या फारुकी घराण्याच्या राज्याची स्थापना केली. इसवी सन १३९९ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा नसीरखानकडे लळिंग आणि भोवतालचा प्रदेश आला. त्यानेच लळिंगला राजधानीचा दर्जा दिला. त्याने फारुकी राजवटीचा विस्तार बऱ्हाणपूपर्यंत केला. परंतु इसवी सन १४३६ मध्ये बहमनी सरदार मलिक-उल-तुजारबरोबर झालेल्या युद्धात या नसीरखानचा लळिंग किल्ल्याखालीच पराभव झाला. पराभवाच्या या अपमानातच १७ सप्टेंबर १४३७ मध्ये त्याचा गडावर मृत्यू झाला. फारुकींची सत्ता बुडाल्यावर पुढे बराच काळ हा किल्ला मुघलांकडे होता. इसवी सन १७५२ मध्ये झालेल्या भालकीच्या लढाईतून खान्देशातील अनेक गडांबरोबर लळिंगच्या प्रवेशद्वारावर मराठी जरीपटका फडकू लागला.इ.स.१७५२ मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत आला . त्यामुळे मराठी साम्राज्यात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या(प्रथम) अधिपत्याखाली लळिंगचा कारभार चालत असे.हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत मराठी सत्तेचा अंतहोई पर्यंत म्हणजेच इ.स. १८१८ पर्यंत होता त्यानंतर लळिंग इंग्रजांच्या ताब्यात गेला व संपत्तीच्या प्राप्तीसाठी त्यांनी नासधूस केली. इतिहासाचा हा एवढा मोठा कालखंड आज जणू इथे लुप्त झाला आहे.Ⓜ
____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
____________________________