फळांचा राजा आंबा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२९ एप्रिल २०२१

फळांचा राजा आंबा

🍋 फळांचा राजा आंबा 🍋


फेसबुक लिंक http://bit.ly/3eJnTIJ
फळांचा राजा अशी ओळख असणारे व आपल्या आंबट-गोड चवीने व रसाळ गुणधर्मामुळेच लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वामध्ये लोकप्रिय असणारे फळ म्हणजे आंबा होय. हिंदीमध्ये ‘आम’ इंग्रजीमध्ये ‘मँगो’, संस्कृतमध्ये ‘आम्र’ तर शास्त्रीय भाषेत ‘मॅन्जीफेरा इंडिका’ म्हणून आंबा परिचित आहे.

फळांचा राजा आंबा

आंब्याचं वेड म्हणजे वेगळंच असतं. कुणाला आंब्याचा राजा हापूसचीच हौस असते, तर कुणाला रसाळ पायरी आवडतो. आंब्याच्या प्रकारानुसार त्याचं रंगरुप, आकारमान, चव सगळंच बदलतं. पण एकूणच हे सगळे आंबे ओळखायचे तरी कसे?
🍋 हापूस 🍋
देवगड हापूस--देवगड पट्ट्यातला हा आंबा खूपच लोकप्रिय आहे. समुद्रापासून १२ किमी अंतरावरच्या विजयदुर्ग ते मालवण या पट्ट्यात हा आंबा होतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची साल खूप पातळ असते. अगदी केळ्यासारखा तो हाताने सोलता येतो. तो पिकल्यावर देठाकडे साधारण खड्डा पडतो. आंब्याच्या त्वचेवरती पांढरट, तांबड्या रंगाचे स्पॉट असतात. साधारणतः हा आंबा गोल असतो.
🍋रत्नागिरी हापूस🍋
रत्नागिरी पट्ट्यात होणारा हा आंबा साधारण ८०-९० टक्के तयार झाल्यावर थोडा लवकरच झाडावरुन काढला जातो. त्याची साल थोडी जाड असते. आंब्याला गोलाई असते. आणि त्याची चव, त्याचा वास सगळेच देवगडपेक्षा वेगळं असतं.
🍋 राजापूर हापूस 🍋
या आंब्याचीही साल जाड असते. तो आकाराला थोडासा लांबट असतो. त्यावर पांढऱ्या-करड्या रंगाचे दाट स्पॉट दिसतात. या आंब्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं.
🍋रत्ना🍋
कोकण कृषी विद्यापीठाने विकसीत हापूस आणि इतर आंब्याच्या जातीचं संकर करुन रत्ना ही जात विकसित केली. हा आंबा दाट हिरवा असतो. गोल आणि आकाराने मोठा असतो. त्याची साल जाड असतो, बाठ पातळ असते. त्याला रसही जास्त निघतो.
🍋गोवा माणकुर🍋
आकाराने हा आंबा मोठा असतो. त्याच्या देठाकडे तांबूस पिवळट शेड असते. याची चव उत्तम असते. त्यात फायबर असतं. पण हा आंबा जास्त टिकत नाही. पिकल्यापासून दोन दिवसात संपवावा लागतो.
🍋रायवळ🍋
आकाराने हा आंबा थोडासा बारीक असते. थोडासा मऊ असतो. प्रत्येक झाडाप्रमाणे वेगवेगळा असतो.
🍋तोतापुरी🍋
हा आंबा चांगलाच लांबट असतो. तो बरेच दिवस टिकतो. त्याची साल गुळगुळीत असते. त्यातून रसही जास्त मिळतो.
🍋पायरी🍋
हा आंबा साधारणतः थोडासा लांबट असून त्याला टोक असतं. त्याची साल कडकडीत आणि जाड असते. त्याचा रंग पिवळट, लालट असतो. पण हा रंग सगळ्याच पायरी आंब्याला असेल असं नव्हे. जर झाडाला पानं जास्त असतील तर रंग हवा तसा चढत नाही. पायरी तयार झाला की देठाकडे चांगलाच खोल खड्डा पडतो. हा आंबा पिकल्यावर लगेच खावा लागतो. तो जास्त‌ टिकू शकत नाही.
🍋 आंब्याच्या इतर जाती🍋
नीलम,केसर, दशेहरी, मल्लिका, सिंदूरी, माल्डा, चंद्रकरण, थंबूर, लंगडा, बदामी, गुलाब खास इ.
औषधी गुणधर्म –
कैरी व आंबा या दोन्ही अवस्थांमध्ये या फळात औषधी गुणधर्म सापडतात. कैरी ही आम्लधर्मी स्तंभक आहे. तर कैरीची साल ही कषायगुणात्मक व उत्तेजक असते. पिकलेला आंबा हा मधुर, स्निग्ध, सुखदायक, बलदायक पचायला जड, वायुहारक, थंड, शरीराची कांती वाढविणारा, जठराग्नी प्रदीप्त करणारा असतो. यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, क जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ, प्रथिने, आद्र्रता, मेद, पिष्टमय पदार्थ ही घटकद्रव्ये असतात.
     आंबा खाण्यापूर्वी तो थोडा वेळ थंड पाण्यात भिजू द्यावा. त्यामुळे पूर्णपणे स्वच्छ करता येतो व   देठाजवळचा   चिक व्यवस्थित काढून टाकता येतो
.

____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
___________________________