किल्ले राजगड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२८ एप्रिल २०२१

किल्ले राजगड

 किल्ले राजगड 

____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
____________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/2QvDBPA
राजगड त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यांत श्रेष्ठ आहे.त्याचा घेर बारा कोसांचा आहे. त्याच्या मजबुतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही. या डोंगरदऱ्यांतून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे कुणीही फिरकू शकत नाही..’ स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाबरोबरच्या साकी मुस्तैदखान याने शिवरायांच्या राजगडाबद्दल ‘मासिरे आलमगिरी’ या ग्रंथात केलेले हे वर्णन आहे!
पुणे-बंगलोर महामार्गावर पुणे जिल्हय़ातील नसरापूरहून एक फाटा वेल्हय़ाकडे वळतो. या मार्गावरच मार्गासनी हे गाव लागते. या गावातून साखर, गुंजवणे, वाजेघर, पाली आणि भूतोंडे गावाकडे एक वाट जाते. या सर्व गावांच्या बरोबर मध्यभागी, डोईवरच साऱ्या मुलखावर नजर ठेवून हा किल्ला कधीचा ठाण मांडून बसला आहे.
पालीकडून येणारा गडाचा राजमार्ग! पायथ्याच्या पाल ऊर्फ पाली गावातही राजवाडा होता. त्याचे अवशेष आजही दिसतात. या गावातच गडाचे मुख्य हवालदार भोसले कुटुंबीयांचे वंशज आजही राहतात. या पाली मार्गाने गडावर निघालो, की तासादोन तासांत आपण पाली दरवाजात हजर होतो.


चौदाशे मीटर उंचीचा हा डोंगर मुरुंबदेवाचा म्हणून मुळात ओळखला जाई. हा मुरुंबदेव बहुधा ब्रह्मदेवाचा अपभ्रंश! यासाठी दाखला म्हणून गडावरील ब्रह्मर्षी ऊर्फ ब्रर्मश्वराचे मंदिर दाखवले जाते हा किल्ला साधारण २००० वर्षापूर्वीचा आहे. डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमीपुत्र सातकर्णी याने दिले. शिवरायांना तोरणा गडावर काही धनसंपत्ती प्राप्त झाली आणि याचाच उपयोग स्वराज्यासाठी करत त्यांनी शेजारच्या या मुरुंबदेवाच्या डोंगरावर एक बुलंद गड आकारास आणला. एक उंच पर्वत, ज्याला बलदंड अशा तीन भुजा आणि मधोमध एक पुन्हा कातळ पर्वत! ‘मुरुंबदेवा’चा हा भूगोलच नैसर्गिकदृष्टय़ा अभेद्यपण सांगणारा असा. या पर्वतावर शिवरायांनी त्यांच्या राजधानीचा संकल्प सोडला. आणि मग डोंगराच्या तीन सोंडांवर पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या तीन अभेद्य माच्या तयार झाल्या. या माच्यांच्या मधोमध असलेल्या एका कातळ पर्वतावर बालेकिल्ला उभा राहिला आणि पाहता पाहता स्वराज्याची राजधानी थाटली. किल्ले राजगड!

हा सारा देखावा आकाशातून पाहू गेलो तर तो एखाद्या पंख पसरलेल्या पक्ष्याप्रमाणे भासतो. जणू हिंदवी स्वराज्याचा हा गरुडच आहे.
इसवी सन १६४८ ते १६७२ तब्बल पंचवीस वर्षे महाराजांनी इथे वास्तव्य केले. शिवरायांच्या सहवासाचे सर्वाधिक भाग्य जिजाबाईंच्या खालोखाल राजगडालाच मिळाले असेल.
अनेकदा वाटते, महाराजांचे हे वास्तव्य राजगडाच्या अभेद्यपणातून होते, की त्याच्यावरील प्रेमातून!..त्यांच्या या वास्तव्यात या गडाने छत्रपती राजारामांचा जन्म अनुभवला, तसाच सईबाईंचा मृत्यूही सोसला. अफझलखानाच्या वधासाठी महाराज याच गडावरून बाहेर पडले आणि आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी पहिले पाऊलही राजगडावरच टाकले. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकिय केंद्र.गडावर आळ दरवाज्याच्या माथ्यावर हे एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे. एका हरिणाला उताणे पाडून दोन वाघ त्यावर पाय रोवून गर्वाने पाहत आहेत असे ते शिल्प आहे. १५६५ मधे विजयनगरचे हिंदु साम्राज्य दक्षिणेतील इस्लामी शाह्यांनी तालीकोटच्या लढाईमधे धुळीला मिळवले.त्याचे प्रतीक म्हणून आदिलशहा आणि निजामशहा ह्यांनी आपल्या सरहद्दीवरील मुरुंबदेवगडावर कोरले.ह्याला पुरावा म्हणजे "चित्रे शकावली" मधील-"शके १५६४ चित्रभानु नाम संवत्सरे,मावळचे हद्दीत शाहमृग नावाचा पर्वत होता.तेथे शिवाजी माहाराजे याणी ठाणे घालून इमारत केली आणि राजगड नाव ठेवले"आढळणारी ही नोंद.दोन वाघ हे आदिलशाह आणि निजामशाह ह्यांचे प्रतिक तर हरिण म्हणजे विजयनगरच्या हिंदु साम्राज्याचे प्रतिक. हे राजगडावरचे दुसरे शिवपूर्वकालीन शिल्प आहे.
बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.

____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
____________________________