"गॉड इज वुमन" शांताबाई यादव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२७ एप्रिल २०२१

"गॉड इज वुमन" शांताबाई यादव

"गॉड इज वुमन"  शांताबाई  यादव  


फेसबुक लिंक http://bit.ly/3xmFvTf

कोरा लिंक http://bit.ly/3aIP19j
शांताबाई यादव. मुक्काम हासूर सासगिरी ४१६५०६.तालुका गडहिंग्लज, हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका खेड्यात बाईचं केशकर्तनालय आहे, असं माझ्या कानावर आलं. खेड्यांत, शहरांत मोटरसायकल, कार चालवणाऱ्या बायका दिसतात; पण या बायकांकडं पूर्वी जितक्या कुतूहलानं पाहिलं जाई, तसं आज पाहिलं जात नाही. पण केवळ पुरुषांचंच म्हणून गणलं जाणारं हजामतीचं काम करणारी बाई कोठेतरी असेल, हे जरा आश्चर्यच वाटत होतं. कारण, परपुरुष-परस्त्री असल्या कल्पना अभिमानानं मिरवणारी आपली खेडी. आजही गावगाड्यात पुरुष समोरून येताना दिसला तर बाईनं पदर डोक्यावर घ्यायचा रिवाज आहे. अशा वातावरणात सतत पुरुषाशी संपर्क येणारा व्यवसाय ही बाई का करत असेल? पुरुषही या बाईकडे केस कापायला, दाढी करायला कसे जात असतील? खरंच अशी बाई असेल का? की आपल्या कानावर आलेली अफवा आहे, असे प्रश्न मनात येत होते. तरीही ओळखीनं ओळख काढत त्या बाईचा अपुरा पत्ता मिळवला आणि अवलिया बाईला शोधायला निघालो.

"गॉड इज वुमन"  शांताबाई  यादव

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातला महागाव परिसर. त्या परिसरात एका साखर कारखान्यासमोर एक सलूनचं दुकानं दिसलं. आत जाऊन चौकशी केली.
‘पाव्हणं. या भागात गड्यांची केस दाढी करणारी बाई कोन्त्या गावात हाय?’
‘शांताबाई व्हय? इथनं वैराटवाडीत जावा. तिथनं हसूरवाडी. मग सासकीर. तिथं हाय बघा ती. तिथं जाऊन कुणालाबी इचरा फेमस हाय.’ सलूनवाल्यानं सागितलं.
त्याच्या बोलण्यानं मला धीर आला. म्हणजे ती बाई अस्तित्वात आहे, याची खात्री पटली. त्यानं सांगितलेल्या रस्त्यानं निघालो.
चावडीजवळ चौकशी केली, ‘शांताबाईच घर कुठं आहे?
रस्त्याच्या कडेलाच घर होतं. घरासमोर गेलो. आत ६५ वर्षांची म्हातारी बसलेली. मला म्हणाली, ‘ ये आत.’ मग मला बसायला सांगून आत गेली. पाणी घेऊन आली. खोलीत कापलेले केस पडले  होते. भिंतीवर दोन मानचित्रे टांगलेली होती. स्मृतिचिन्हेही दिसत होती.
मी तिला ओळख सांगितली. तिला भेटायला आल्याचं सांगितलं. थोडा वेळ गेल्यावर मी म्हणालो,
‘मला तुमचं आक्रितच वाटत होतं मावशी.’
‘म्हंजी हजामतीचं म्हणतूस? आरं बाबा सगळं पोट कराय लावतं बघ माणसाला.’ तिनं पोटावर हात मारला.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,शांताबाई श्रीपती यादव. तिच्या नवऱ्याचं गाव, अरदाळ. तिच्या नवऱ्याला भाऊबंदकीच्या भांडणात गावं सोडावं लागलं. तो जगण्यासाठी हसूर या गावात आला. या गावातील लोकांनी गावात कारागीर नसल्यामुळं त्याला राहायला जागा दिली. मग गावात बलुतं गोळा करून गावकऱ्यांच्या  हजामती करून उदरनिर्वाह करू लागला. लोक पैशांऐवजी धान्य द्यायचे. अशीच बलुत्याची पद्धत तेव्हा गावात होती. हे दोघे नवरा-बायको आणि चार मुली असा सहा माणसांचा संसार. एक दिवस श्रीपती आजारी पडला. अनेक ठिकाणी औषधपाणी केलं, पण गुण आला नाही.
शांताबाईचा संसार उघड्यावर पडला. समोर मोठं संकट उभं राहिलं. त्या गावात शेतमजुरी करून जगावं तर तसे तालेवार शेतकरी नव्हते. त्यामुळं मजुरीच काम मिळणार नव्हतं. मग विचार करत असतानाच मनात विचार आला, आपणच जर केस दाढी कापायचा व्यवसाय सुरू केला तर? पण या विचारासोबत तिच्या अंगावर काटा आला. समाज निंदानालस्ती करेल, अशी भीतीही वाटली. तिचा बाप नामांकित कारागीर होता. लहान असताना बापाचं हजामत करणं तिनं मन लावून पाहिलं होतं. तिला विचार करताना असं वाटलं, जमेल आपल्यालाही हजामत करायला. मग तिनं शेजारच्या म्हातारीला मनात आलेला विचार बोलून दाखवला. तिनंही संमती दिली. ती स्वत:च्या नातवाला घेऊन शांताबाईकडे आली. घरात असलेल्या नवऱ्याच्या कात्रीने त्याचे केस कापण्याचा प्रयत्न केला. एका रेषेत जमलं नाही, मग चमनगोटा (पूर्ण केस कापले) केला. मग, त्या म्हातारीच्या नवऱ्याचे केस कापले. त्या म्हाताऱ्या बाईनं तिला आधार दिला. गावात ज्यांची हजामत करायची आहे, त्यांना शांताबाईच्या घरी घेऊन येऊ लागली. संकटकाळी हा जगण्याचा नवा मार्ग सापडला. पण शांताबाई हे काम चोरून करत होती. हे गुपित फक्त ठरावीक लोकांनाच माहीत होतं. एक दिवस शांताबाईची जगण्याची ही धडपड गावचे पुढारी हरिभाऊ कडूकर यांना समजली. ते तालुक्याचे सभापतीही होते. एका सकाळी ते शांताबाईच्या दारात येऊन म्हणाले, 'लेकी, मला समद माहीत झालंय. आजपासनं माझी हजामत त्वा करायची.’
त्यांचं बोलणं ऐकून शांताबाई घाबरली. हरिभाऊना कसं समजलं? एवढ्या मोठ्या माणसाची हजामत आपण कशी करायची? पण त्यांनी खूप आग्रह केला. मग शांताबाईनं सराईत कारागीर करतो, तशी त्यांची हजामत केली. त्यांनी दवंडी पिटून साऱ्या गावाला बोलावून सांगितलं, ‘शांता आपल्या पांढरीची लेक हाय. आजपस्नं समद्यानी तिच्याकडं हजामती करायच्या आणि तिच्या पोटाला बक्कळ घालायचं.’ त्यांनी गावासमक्ष शांताबाईलाही सांगितलं, ‘लेकी, गाव पांढर तुला काय कमी पडू देणार न्हाय. कुणाला भिव नकोस. वस्तरा चालवून जग. वेळ पडली, तर वस्तरा उलटा करायला मागंपुढं बघू नकोस.’ त्यानी सलूनचं साहित्य घेऊन दिलं. त्या दिवसापासून हसूर सासकीरे गावात स्वत:ला श्रीपती समजून शांताबाईच त्याची जागा चालवू लागली. Ⓜ
गावातील काहींना हा बदल रुचणारा नव्हता. पण तिच्या पाठीशी सभापती कडूकर असल्यानं तिला उघड कोणी विरोध केला नाही. सगळ्या गावकऱ्यांची ती शांताक्का झाली. तिचा संसार पुन्हा मार्गी लागला. आधुनिक विचाराची सुरुवात शहरात होते, पण शांताबाईच्या कामानं एका खेड्यात त्याची सुरुवात झाली.
गेल्या ३५ वर्षांपासून तिचे सलून सुरू आहे. Ⓜ
आगळीवेगळी वाट चोखाळणाऱ्या शांताबाईची अनेक संस्था-संघटनांनी दखल घेतली आहे. तिचे सत्कारही केले आहेत. नवरा मेल्यानंतर खचून न जाता त्याचाच सलूनचा व्यवसाय करणारी शांताबाई एकमेव महिला आहे. याच व्यवसायावर तिने चार मुलींची लग्ने केली आहेत. ती आता थकली आहे, तरीही तिचा व्यवसाय सुरू आहे.
मी शांताबाईसोबत बोलत असतानाच एक जण आला.
‘का रं मारूती?’ तिनं विचारलं.
‘अक्का गावाला चाललुया. दाढी करायची हाय.’
‘ये की मग.’ शांताबाई उठली. खुंटीला अडकवलेली पिशवी घेतली. तिच्यातून ब्रश, वस्तरा, साबण काढला. मारुती पाटावर बसला. त्याच्यासमोर बसून तिनं त्याच्या तोंडाला साबण लावला आणि त्याची दाढी करू लागली. मी आश्चर्यानं तिच्याकडं बघायला लागलो. मारुतीला विचारलं, ‘तुम्हाला भीती नाही का वाटत? बाई वस्तरा कापल म्हणून.’
‘हं... आवं २५ वर्षांपासून हिच्याकडं दाढी करतुया मी. कायतरीच इचारताय तुम्ही.’ मी असं विचारलेलं त्याला आवडलं नव्हतं. तिच्यावर त्याचा विश्वास होता.Ⓜ
आम्ही बोलत होतो, तोवर एक बाई येऊन बसली होती. तिनं सांगायला सुरुवात केली, ‘लय जिद्दीची बाई हाय ही. एक एक दिवस चूल पेटली नाही, पण कोणाच्या दारात गेली नाय. काम केलं तवाच मागितलं. एवढ्या तरण्याताठ्या पोरी जगवल्या, पण कुणाचं आरं म्हणून घेतलं नाय. कसं दिस काढलं असत्याली तिलाच माहीत? आता पार पडली.’Ⓜ
तिच बोलणं ऐकून शांताबाईच्या डोळ्यांतून पाणी यायला लागलं.

‘लेका लय जण येत्याती तुझ्यासारखी. कुठ कुठं नेऊन हार-तुरं घालत्याती. त्यास्नी वाटतंय, म्या कायतरी येगळं केलंया. पर मला जगायचं हुतं. नवऱ्याच्या माघारी पोरींना संबळायचं हुतं. म्हणून वस्तरा घेतला हातात. लोकांच्या दाढ्या करून जगलो बघ. माणसं इचारत्यात, ही कामं करताना लाज वाटत नव्हती का? लाज कसली? लाज धरली असती, तर इख खाऊन मरावं लागलं असतं पोरींना घेऊन. बाळा जवानीत हुतो तवापासनं हे काम करतुया, पण गावानं भावाची माया दिली. अक्काशिवाय कोण बोलवतं न्हाय मला.’ शांताबाई सांगत होती.
तिची भेट घेऊन निघालो. घराच्या बाहेर उभी राहिलेली शांताबाई मला हात उंचावून निरोप देत gहोती. ‘लेका ये पुन्हा’, असं सांगत होती. चाकोरीच्या पलीकडं गेलेली, पुरुषांचा हुकमी म्हणून गणल्या गेलेल्या केशकर्तनाच्या व्यवसायात ३५ वर्षे रमलेली, स्त्रीवादाच्या आधुनिक विचारापासून दूर असलेली पण या वादाच्या अभ्यासकांचा विषय बनलेली, एक बाई चार मुलीसोबत संसाराचा गाडा स्वत:च्या हिमतीवर हाकू शकते, असा विश्वास  पुरुषसत्तेच्या छायेखाली वावरणाऱ्या तमाम बायांच्या मनात पेरणारी शांताबाई. जिचं नावं वाऱ्याच्या वेगानं सर्वत्र गेलं आहे आणि तिच्यासोबत तिला आसरा देणाऱ्या गावाचाही.

गाडीच्या आरशात मला शांताबाई दिसत होती. उजव्या बाजूला तात्याबाचा डोंगर होता. डाव्या बाजूला भीमाचा डोंगर होता. मी जिला शोधत आलो होतो, ती आगळवेगळं आयुष्य जगणारी शांताबाई, मला डोंगराएवढी मोठी भासत होती.
स्वाभिमानाने जगण ह्या साठी मला आवडला हा लेख म्हणून पोस्ट करत आहे 
स्त्री-पुरुषांमधील विषमत्तेची रेषा ५० वर्षांपूर्वी शांताबाई यांनी पुसून टाकली. त्यांनी विविध अडचणींवर मात केली. आपल्यातील वेगळी स्त्री त्यांनी बाहेर काढली.म्हणुन ती "गाॅड इज वुमन"

_____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_____________________________