कोव्हीड मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्याचा पन्नास लाखांचा विमा सुरक्षा कवच काढा : शिरिष तपासे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२८ एप्रिल २०२१

कोव्हीड मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्याचा पन्नास लाखांचा विमा सुरक्षा कवच काढा : शिरिष तपासे

सेवादल काँग्रेसचे शहर अध्यक्ष शिरीष तपासे यांचे आयुक्ताना निवेदन


कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जातात. त्यासाठी महानगर पालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. सध्या येथे २० ते २२ कर्मचारी अहोरात्र काम करीत आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. हे कर्मचारी सतत मृतदेहाजवळ असतात. अशावेळी आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गरीब घरातील अशा कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनामार्फत पन्नास लाखांचे विमा सुरक्षा कवच काढल्यास त्यांच्या कुटूबींना आधार राहील, अशी मागणी सेवादल काँग्रेसचे शहर अध्यक्ष शिरीष तपासे यांनी महापौर आणि महानगर पालिका आयुक्त आयुक्ताना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोरोना प्रादुर्भाव चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात उद्भवलेला आहे. त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याचा ताण २० ते २२ कर्मचाऱ्यांवर येत आहे. या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविल्यास अंत्यविधी वेळेत होऊन नातलंगची गैरसोय दूर होईल. महानगर पालिकेचे कर्मचारी हे सेवाकार्य नियमित करीत असताना २३ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास डिझेल वेळेत न पोहचल्याने अंत्यविधीला उशीर झाला. यावेळी मृताच्या नातलगांनी मजूर कर्मचारी मिलिंद शंकरराव पुट्टेवार (वय 26 वर्षे) यास शिवीगाळ करुन हाताबुक्यांनी मारहाण केली. अशा घटना घडू नयेत, यासाठी मोक्षधाम स्मशानभूमी येथे सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा, कोव्हीड मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दहा लाखांचे विमा सुरक्षा कवच काढण्यासह रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या कोव्हीड योध्यांना सुरक्षा द्यावी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत.
यावेळी सागर वानखेडे, तालुका अध्यक्ष सेवादल, अमोल राजूरकर, अजय मेश्राम, संजय लेडागे, मनीष तिवारी, गोविल मेहरकुरे, सौरभ ठोंबरे, निलेश तपासे व सेवादल पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.