बाजीरावाना अजुन थोडे आयुष्य मिळायला हवे होते - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२८ एप्रिल २०२१

बाजीरावाना अजुन थोडे आयुष्य मिळायला हवे होते

 बाजीरावाना अजुन थोडे आयुष्य मिळायला हवे होते 

फेसबुक लिंक http://bit.ly/3nu3Ph6
१७३७ डिसेंबरचा मध्य चिमाची आपांचे शाहू महाराजांना पत्र आले -
"रायाची पत्रे ४ रमजानची (१६ डिसेंबर) आली. नबाब (निजाम) भूपाळगडी कोंडला आहे. दाणावैरण बंद. असा समय त्यास कधी घडला नाही. अतिसंकटी पडला आहे. त्याचे साहीत्यास औरंगाबादची फौज येणार ती तिकडे गोवून पडावी म्हणजे नबाबाचा पाडाव ऊत्तम होतो. ३ रमजानी एक युद्ध झाले. दुसरे कालही एक जाले. बरासा तमाशा नबाबाने पाहीला. महाराजांचे प्रतापे नबाबावर सलाबत चढली. करोलचा मारा देत आहो. मोगलांचा आरगानरगा (पूर्ण वेढा) केला आहे. दाणा, गल्ला, वैरण, काडी कूल बाद झाली आहे. बंगसाचीच गत यास जाली आहे. स्वामींच्या आशिर्वादे निजाम या ठिकाणी बुडत आहे. अगर सुटका झाली तरी उत्तमच होईल. किल्लेबंद झाल्यामुळे अब्रू राहीली नाही.
"
आधी फेब्रुवारी १७२९ मध्ये पालखेडवरती निजामाला धूळ चारली. तब्बल १० वर्षांनी पुन्हा निजामाला जेरबंद करुन त्याची अब्रू घालवली. निजाम बुडला तरी ठिक नाही बुडला तर त्याची जीवघेणी मानखंडना झाली आहे असे चिमाजी अप्पा म्हणतात. तब्बल तीन आठवडे निजामाचा कोंडमारा केला. निजामाच्या सैन्याला भोपाळच्या किल्यात आश्रय घ्यावा लागला. निजामा जवळ तोफा होत्या आणि भोपाळ तलावाचे नाले दरम्यान होते म्हणून मराठे जास्त सलगी करु शकत नव्हते. अन्यथा निजामाचा बेडा पार व्हायचाच. जवळचे धान्य संपल्याने निजामाच्या सैन्याने चक्क जनावरे फाडून खायला सुरुवात केली. निजामाच्या सैन्याचे ठिक होते पण बाजीरावांविरुद्ध निजामाच्या मदतीला आलेले रजपूत शाकाहारी अन्नाविना उपाशी तडफडू लागले. दुर्बुद्धी झाली आणि निजामाच्या कच्छपी लागलो असे त्यांना वाटू लागले. अखेर ७ जानेवारी रोजी अपमानास्पद तहा वरती स्वाक्षर्‍या करुन निजामाला सुटका करुन घ्यावी लागली.
बाजीरावांना थोडे अधिकचे आयुष्य मिळाले असते तर कदाचित अटकेवरील झेंडे त्यांच्याच कारकिर्दित बघायला मिळाले असते. २८ एप्रिल १७४०, मध्य प्रदेशात खरगोण जिल्ह्यातील नर्मदा काठावरील रावेरखेडीे येथे उष्माघातामुळे आजारी पडून बाजीरावांचा मृत्यु झाला. आज त्यांची २७६वी पुण्यतीथी.Ⓜ


बाजीरावाना अजुन थोडे आयुष्य मिळायला हवे होते