Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र दिनांक 09.02.2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.02.2023 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र Marathi News Nagpur - All India Radio   @marath...

ads

गुरुवार, जानेवारी १९, २०२३

शिखर शिंगणापूर शंभू महादेवाची कथा | SHIKHAR SHINGNAPUR

 शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव 
SHIKHAR SHINGNAPUR 

शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक हुडकून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसर्‍यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण. स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला 'दक्षिण कैलास' असे म्हणतात.
शिखर शिंगणापूरची कथा हि गुप्तलिंगापासूनच सुरु होते. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती माता भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटता क्षणी त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वती मातेने श्री शंभू महादेवांची क्षमा मागितली. पार्वती मातेच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वती मातेचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती माता यांचा #विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला. गुप्तलिंग हे सातारच्या छत्रपतींच्या शाही घराण्याचे खाजगी देवस्थान आहे. या ठिकाणी श्रमदानातून आणि छत्रपतींच्या फंडातून जीर्णोद्धार केला गेला आहे. गुप्तलिंगावर आजही दोन कुंडे प्रवाहित आहेत. एक जटा कुंड ज्या ठिकाणी श्री शंभू महादेवानी आपल्या जटा आपटल्या होत्या आणि दुसरे आहे भागीरथी कुंड जे पार्वती मातेचे कुंड म्हणून ओळखले जाते. गुप्तलिंगाच्या मंदिरापर्यंत जाण्याकरिता प्रशस्थ पायऱ्यांची वाट आहे.
सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्‍या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.
महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधण राजाने वसवले आहे असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठ्ठे मोठ्ठे नंदी आहेत. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभार्‍यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात. टेकडीवरील शिवमंदिराकडे जाताना शांतिलिंग स्वामींची समाधी व त्यापुढे खडकेश्वराचे मंदिर लागते. धवलगिरी किंवा स्वर्णाद्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखरावरील तटबंदीयुक्त शिवमंदिराला चार दरवाजे आहेत. आवारात अनेक दीपमाळा, मुख्य मंडपात पाच दगडी नंदी, भागाऱ्यात शिवशक्तीची प्रतीके मानलेली दोन स्वयंभू लिंगे आहेत. मंदिरपरिसरात पोर्तुगीज बनावटीच्या दोन घंटा असून त्यांच्यावर रोमन लिपीत अनुक्रमे १६७० व १७२० सालांचा उल्लेख आहे. मंदिराच्या पश्चिमेकडे बली महादेवाचे, म्हणजेच अमृतेश्वर हे हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराच्या दक्षिणेकडे शहाजीराजे भोसले आणि त्यांच्या घराण्यातील इतरांच्या प्रतीकात्मक समाध्या आहेत.

शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी १६०० मध्ये बांधला. या मंदिराविषयी आणखी एक की, जीजाबाईंना शिवनेरीवर सोडून चिंताक्रांत शहाजीराजे परतत असतांना या मंदिरात दर्शनासाठी आले होते. तेव्हा त्यांना दृष्टांत मिळून सारे काही ठीक होईल असे शंकरांनी सांगितले. या गोष्टीची आठवण म्हणून जरी पटक्याबरोबर भगवा झेंडाही लावण्याचे त्यांनी ठरवले.


या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.
या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हादया, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.

असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही!

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.