यवतमाळात 167 शाळाबाह्य मुले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ एप्रिल २०२१

यवतमाळात 167 शाळाबाह्य मुले
यवतमाळ/ सतीश बाळबुधे
गेल्या महिन्यात दहा दिवस चाललेल्या शाळाबाह्य सर्वेक्षणात जिल्हाभरात एकूण 167 मुले आढळून आले आहेत. त्या बालकांना लगतच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. यात सर्वाधिक 93 मुले, तर 74 मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे शाळाबाह्य आढळून आलेल्या 41 जणांनी आतापर्यंत शाळेचे उंबरठेसुद्धा ओलांडले नव्हते. केवळ दहा दिवसांतच एवढी बालक आढळून आले, तर ही मोहीम नियमित ठेवल्यास आणखी शाळाबाह्य मुले सापडण्याची शक्यता आहे.
शासनाने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे निर्देश देण्यात आले होते. या निर्देशांनुसार 1 ते 10 मार्चपर्यंत 6 ते 18 वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थी शोधून शाळेत दाखल करावयाचे होते. त्या अनुषंगाने शासनाने विविध समित्यांचे गठण केले होते. या सर्वेक्षणासाठी शाळांतील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींना प्रगणक, तर मु‘याध्यापकांना सनियंत्रणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ऐन कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. यात जिल्हाभरात एकूण 167 बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. यात एकूण 93 मुले आणि 74 मुली आहेत. दोन वेगवेगळ्या प्रकारचे गट पाडण्यात आले होते. कधीही शाळेत दाखल न झालेले (ई 1) आणि शाळेत अनियमित येत असलेले (ई 2) असे दोन गट होते. यात शाळेत दाखल न झालेली 41 मुले आहेत. तर उर्वरित 126 मुलांनी शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे, परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे शाळेत अनियमित उपस्थिती होती. सर्वेक्षणात आढळून आलेल्या 167 मुलांना आता नजीकच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. यामध्ये आर्णी 5, बाभुळगाव 16, दारव्हा 34, दिग‘स 27, घाटंजी 33, कळंब 2, नेर 13, पुसद 1, राळेगाव 2, उमरखेड 2, वणी 11 आणि यवतमाळ येथे 21 बालक आढळून आले आहे. यानंतरही शाळाबाह्य बालकांची शोधमोहीम चालूच ठेवण्यात येणार असून, अशा स्वरूपाचे बालक आढळून आल्यास नजीकच्या शाळेत त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

बालरक्षकांवर मुले शोधण्याची जबाबदारी
शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम करण्याच्या दृष्टीने बालरक्षक म्हणून शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शाळास्तरावर करण्यात आलेल्या ह्या बालरक्षकांना वर्षभरात कुठेही शाळाबाह्य बालक आढळून आल्यास त्यांना थेट शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबतची जबाबदारी बालरक्षक म्हणून त्यांच्यावर शिक्षण विभागाने सोपवली आहे.