माझ्या सार्वजनिक जीवनातील अगदी सुरुवातीच्या काळापासून माझे सहकारी असलेले ॲड. एकनाथ साळवे यांचे दु:खद निधन झाल्याचे ऐकून अतिशय वाईट वाटले. एकनाथ साळवेंना विधिमंडळ सदस्य म्हणून सुमारे ११ वर्षे अगदी जवळून पाहता आले. तद्नंतरही त्यांची साथ आणि स्नेह सतत लाभला.
सार्वजनिक कारकीर्दीच्या प्रारंभी त्यांनी शिक्षकी पेशा सोडून कायद्याची पदवी घेतली आणि दलित, आदिवासी, शेतकरी, खाणकामगार यांना न्याय देण्यासाठी उभे राहिले. महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून त्यांनी आपले आयुष्य वंचित आणि उपेक्षितांच्या हिताकरीता झोकून दिले.
देशात सामाजिक ऐक्य असावे आणि लोकशाहीची फळे समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचावीत यासाठी परिवर्तनाचे आंदोलन उभारले. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सत्यशोधक किसान मंचाच्या माध्यमातून ते रचनात्मक संघर्ष करीत राहिले.
ॲड. एकनाथ साळवे हे एक अतिशय विनम्र, स्वच्छ प्रतिमा असलेले, पुरोगामी व प्रतिभावान सामाजिक नेते होते. अत्त दीपो भव: ह्या बुद्धमंत्राचे आचरण व्हावे अर्थात स्वत: मध्ये प्रज्ञेचा दीप प्रज्वलित व्हावा आणि वैचारिक परावलंबन नष्ट व्हावे ही त्यांची जीवननिष्ठा होती. मानवाधिकारांचे रक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी ते सतत आग्रही राहिले.
सामाजिक क्रांतीचा वसा घेतलेला विदर्भातील एक अभ्यासू आणि वैचारिक सहकारी गमावल्याचे दु:ख मला होत आहे. साळवेंच्या आत्म्याला चिरशांती मिळो व त्यांच्या कुटूंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना.